Friday, March 16, 2018

मन करा रे प्रसन्न...

आताशा असे हे मला काय होते
.
.
.
.
कशी ही अवस्था कुणाला कळावे
कुणाला पुसावे कुणी उत्तरावे...
किती खोल जातो, तरी तोल जातो
असा तोल जाता, कुणी सावरावे..


ह्या संदीप खरेच्या कवितेसारखी कधीतरी अवस्था होते. सगळं छान, मजेत चाललेलं असतं. अचानक तो क्षण येतो जेव्हा उदास वाटायला लागतं, मनावर नैराश्याचे मळभ दाटून येते.

असं का होत असावं? सगळं मनाजोगतं चाललेलं असताना नकळत आपल्या आयुष्याकडून अपेक्षा तर वाढत जात नसतील? मग जरा काही मनाविरुद्ध झालं की औदासिन्य हळूच मनात शिरकाव करत असेल.
मनाला कितीही बजावत राहिलो की आपल्याला कायम सकारात्मक विचार करायचा आहे तरीही नैराश्याची हलकीशी सावलीदेखील पटकन मन ग्रासून टाकते.

आजकाल आपल्या दिनचर्येचा बराचसा भाग सोशल मीडियाने व्यापलेला आहे. सकाळी उठल्यापासून पार डोळे जड होऊन मिटायला लागेस्तोवर आपण व्हाट्सएप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक चेक करत असतो.
ह्या व्हर्च्युअल जगात दिवसरात्र वेळ घालवल्यामुळे प्रचंड शीण येतो, जो अर्थात आपण सोयीस्कररित्या दुर्लक्षतो.

ह्या सोशल मिडीयाच्या नादात अनेक गोष्टींना मुकत असल्याची आज मला प्रकर्षाने जाणीव होतेय.
घरात कॅरम बोर्ड, उनो, पत्ते, बुद्धिबळ आहे. पण कित्येक महिन्यांत त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाहीये. हे खेळ खेळत असताना जे थेट ह्युमन इन्ट्रॅकशन होतं त्याला तोड नाही.
एका कलीगने 3 महिन्यांपूर्वी एक सुंदर पुस्तक दिलंय, ज्याचं अजून मी पहिलं पानही वाचलं नाही.
केबल/सेट टॉप बॉक्ससाठी वर्षाला हजारो रुपये भरतोय पण अनेक उत्तमोत्तम चित्रपट, डॉक्युमेंट्रीज बघायलाही वेळ मिळत नाहीये.
वाचन, लिखाणासारख्या छंदांकडे दुर्लक्ष होतंय.
वेळ नाहीये हे अर्थातच खरं नाहीये, सोशल मीडियाच्या नादात ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं जात नाहीये.

बऱ्याचदा असं होतंय की समोर फूट-दोन फुटांवर बसलेल्या माणसाच्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं. जगभर पसरलेल्या लोकांशी चॅटिंग करण्यात आपण बिझी असतो.
आणि हे फक्त आपण नाही तर बऱ्याचदा समोर बसलेला माणूसही तेच करत असतो.
एकमेकांशी समोर बसून गप्पा-टप्पा, हास्य-विनोद करणं हळू हळू कमी होत चाललंय.

ह्या सगळ्या जाणिवा जेव्हा तीव्रतेने बोचायला लागतात, तेव्हा पटकन नैराश्य/विरक्ती येते. 
काहीतरी चुकतंय, हरवतंय ह्याची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते.
मग जालीम उपाय म्हणून तत्परतेने आपण काही व्हाट्सएप ग्रुप्स सोडतो, फेसबुक डीऍक्टिव्हेट करतो, ट्विटर/इंस्टाग्राम अनइंस्टॉल करतो.
अत्युच्च प्रतीचे नैराश्य/विरक्ती आली असेल तर व्हाट्सएप अकाउंट डिलीट करतो. स्मार्टफोन सोडून नोकिया आशा वगैरे बेसिक हँडसेट वापरायला लागतो.
अर्थात, ही तात्पुरती मलमपट्टी असते. काही दिवसांत येरे माझ्या मागल्या होऊन ती जखम, खपली धरायच्या अगोदरच, अधिक तीव्रतेने भळाभळा वाहणार असते.

खरं पाहता, हा नक्कीच कायमस्वरूपी तोडगा नाही. वर्षानुवर्षाच्या सहवासातून जोडली गेलेली माणसं ही आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही, बोलू शकत नाहीत. हे सर्वजण बहुतांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच संवाद साधत असतात. त्यामुळे सोशल मिडियापासून कायमची फारकत घेण्याला काहीच अर्थ नाहीये.

ह्या प्रश्नावर सखोल विचारमंथन केल्यावर असं लक्षात आलंय की ह्या सगळ्याचा सुवर्णमध्य गाठणं महत्वाचं आहे.
एखाद दोन दिवस सोशल मिडियावरचे अपडेट्स पाहिले नाही तर जगबुडी नक्कीच येणार नाही. ह्या गोष्टी फावल्या वेळातच केल्या पाहिजेत.

पण त्याआधी फावल्या वेळाची व्याख्या नक्कीच ठरवायली हवी. जेव्हा खरोखरच तुम्हाला करण्याजोगे काही काम नसेल तो खरा फावला वेळ.
आता काम म्हणजे काय फक्त ऑफिसचं काम नाही, इतरही बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत.
सोशल मिडीयाच्या अडिक्शन पायी तब्येतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय.

रोज सकाळी लवकर उठून फिरायला जाणं, सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायम करणं हे अत्यावश्यक आहे.
घरच्या, बाहेरच्या कामांची यादी करून ती वेळच्यावेळी निपटवणे गरजेचं आहे.
आता, उदाहरणार्थ, प्रवास करताना सहप्रवासी चांगला नसेल तर त्यावेळी नक्कीच सोशल मिडियावर वेळ घालवणं योग्य आहे. पण जरका सहप्रवासी इंटरेस्टिंग असेल आणि त्याच्याकडून ४ अनुभवाच्या, मौलिक गोष्टींचं ज्ञान मिळणार असेल तर त्याच्याशी थेट संवाद साधणं जास्त महत्वाचं.

अति सर्वत्र वर्जयेत ह्या उक्तीनुसार वागलं तर सगळ्या गोष्टींचा नक्कीच उत्तम मेळ घालता येईल.
आपल्या मागल्या पिढीने विचारही केला नसेल अशी भौतिक सुखं आपल्या पायाशी लोळण घेत आहेत. पण ह्या सगळ्यापेक्षा अपेक्षित असं मानसिक समाधान लाभतंय का ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे.

शेवटी काय, जीवन सुंदर, अर्थपूर्ण, समतोल बनवणं महत्वाचं. ते जर साधता येत नसेल तर नैराश्य तुमच्या दाराशी उभं आहेच.

2 comments:

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...

तुझा हा ब्लाॅग वाचून माझी पहिली प्रतिक्रिया... ‘Ahhh I am not the only one..’ :-)
कळतंय पण वळत नाही.अगदी मनातलं समोर वाचते आहे असं वाटलं मला.
आपल्या पिढीतल्या सगळ्यांना बहुदा असं नैराश्य येत असेल नाही का? कारण आपण हे virtual जग नसतानाचं जगसुद्धा अनुभवलं आहे. आणि आपण जे तेव्हा भरभरून अनुभवलं ते मिस करतो आहोत किंवा त्याहीपेक्षा तो अनुभव चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधतो आहोत असं वाटतं मला कधी कधी.

पण खरं सांगू मला आपल्या पुढच्या पिढीकडे बघितलं की खूप जास्त guilty वाटतं. आपल्याला जे नैराश्य आत्ता येतंय ते त्यांना लहानपणीच ग्रासेल की काय अशी भीती वाटते. अर्थात त्यात चूक आपलीच असणार आहे.

थोडं विषयांतर आहे पण माझा एक अनुभव सांगते.

मी एक पुस्तक वाचलं होतं. तूही वाचलं असशील कदाचित. Fiction होतं. त्यात लेखकाने असं imagine केलं होतं की प्रत्येकाचा स्वत:चा असा एक स्वर्ग असतो. म्हणजे हा स्वर्ग त्या माणसाला अपरिचित नसतो उलट त्याच्या आधीच्या आयुष्याचाच एक भाग असतो.
एखादी जागा, एखादा दिवस, एक क्षण, असा एखादा अनुभव जो तुम्हाला कायम जगावासा वाटेल! जिथे तुम्ही कायमचे विसावायला तयार असाल तो तुमचा स्वर्ग!! मला खूप आवडली ही कल्पना आणि मी डोळे बंद केले माझा स्वर्ग शोधण्यासाठी....
आणि मी आमच्या बार्शीच्या घरी पोहोचले. गौरी गणपतींचे दिवस... घरात १५/२० माणसं... माझी माणसं... हसण्याचे आवाज... वाफाळता चहा... गप्पांचा फड... घराबाहेरच्या बागेत पूजेसाठी फुले आणि दुर्वा गोळा करणारी आम्ही भावंडं... फणेरपेटीसमोर उभी राहून तयार होत असलेली माझी आजी... वख्खईचा मांडलेला डाव... दुपारची जेवणं... संध्याकाळी आजीबरोबर गायलेल्या गवळणी आणि भजन... गौरींसमोर मांडलेला सारीपाटाचा डाव... तो खेळतानाची वादावादी.... गच्चीवर रेडिओ ऐकत तासन् तास मारलेल्या गप्पा... आणि परतीच्या प्रवासातली शांतता...
पण आता मला कुठे परतीचा प्रवास करायचा होता! आणि मला माझा स्वर्ग सापडला. गौरी गणपतींचे बार्शीतले चार दिवस हे माझ्या आयुष्यातले खरंच भरभरून आनंद देणारे दिवस होते. इतके की मला तिथेच तेच दिवस कायम जगायला आवडेल.
माझ्या आई बाबांनी आणि इतर सगळ्यांनी कळत नकळत माझ्यासाठी तो स्वर्ग तयार केला. कुठलाही virtual touch नव्हता तेव्हा.. फक्त प्रेमाचा आनंदाचा स्पर्श..

मला माझ्या मुलासाठी एखादा स्वर्ग तयार ठेवतां येईल का? हा प्रश्न मला खूपदा पडतो. उत्तर माहिती नाही. पण अजून वेळही गेलेली नाही!

असे बरेच विचार येत असतात मनांत. पण सगळ्यांना शब्दांची साथ मिळत नाही.