Thursday, April 21, 2016

पावनखिंड - एक अविस्मरणीय अनुभव

तसा मी लहरी महंमद आहे.. कधी कुठलं खुळ डोक्यात शिरेल त्याचा नेम नाही.. हल्ली पायाला भिंगरी(आणि गाडीला चाकं) लागलीये त्यामुळे फिरायच खुळ डोक्यात शिरलंय...

गेल्या विकांतालाच फॅमिलीसोबत पावनखिंडीला जायचं ठरलं.. शनवार, रविवार पुरले नसते म्हणून  (माझ्या बॉसच्या भाषेत स्वतःचा कॉन्शस मारून :-))शुक्रवारची सुट्टी टाकली.. गुरुवारी निदान दहा वेळा तरी मला म्हणाला की अरे एन्जॉय कर वेकेशन, बस तेरा कॉन्शस तुझे अलाऊ कर रहा है ना, फिर ठीक है.. हे असं बोलून बोलून उगाचच मनात अपराधिपणाची भावना निर्माण केली त्यानी... "हृषी फ्रायडेसे छुट्टीपे जा रहा है" असं सारखं बोलून दाखवायला लागल्याने "अरे भाई सिर्फ फ्रायडेकोही छूट्टीपे हूँ" हे कैलेंडर त्याच्यासमोर नाचवत सांगावं लागलं.. असो....

आम्ही पावनखिंड रिसॉर्टच आधीच ऑनलाइन बुकिंग केलं होतं... (2100/- पर हेड, पर डे - इन्क्लूडिंग लंच, डिनर, ब्रेकफास्ट इत्यादि.. लहान मुलांच साधारण 845/- पर हेड 【सहा वर्षाखालील】) त्यांच्या वेबसाईटवर अत्यंत स्पष्ट शब्दांत त्यानी सगळी माहिती दिली आहे.. ते पाहून, आपलं रिक्वायरमेंट किंवा टेक्नीकल डोक्युमेंट पण इतकं व्यवस्थित नसतं असा एक विचार उगाचच मनात येवून गेला (परत एक हकनाक अपराधिपणाची भावना)

डे 1:
-------
मुलांचं (आणि माझं) उठून आवरेस्तोवर निघायला पार साडेदहा वाजले आणि सगळ्यांच्या (मी)शिव्या खात पावनखिंडीकडे कूच केलं...

आता गाडीला इंधन लागो न लागो मला मात्र प्रवासात सारखं काहीतरी खायला नाहीतर प्यायला (चहा/कॉफी) लागतं... त्यामुळे कोल्हापूर हायवेचा पहिला टोलानाका क्रॉस केला आणि आम्ही पहिला ब्रेक घेतला.. मग मजल दरमजल करत कऱ्हाडपर्यन्त पोचलो आणि तिथे जेवण केलं...  कऱ्हाडपासून साधारण सहा किलोमीटरवर (हॉटेल पंकजच्या पुढे) सर्विस रोडनी उजवीकडे एक कळे ( म्हसोलि/येवती) फाटा लागतो .. तिकडे वळालो आणि मग सिंगल लेन रस्ता लागला (नाशिक हायवेसारखा गजबजलेला अजिबात नाहिये तो) रस्ता अतिशय उत्तम आहे.. पुण्या(वाकड)पासून साधारणपणे अडिचशे किलोमीटरवर पावनखिंड रिसॉर्ट आलं...

पार्किंग अतिशय मोठं आहे... एखाद्या सराईत ड्रायवरसारखं लगेच मी झाडाखाली सावली बघून गाडी पार्क केली... रिसॉर्टवाल्यांकडे एक ढकलगाडी आहे, त्यात सामान भरून आम्ही रूमकडे रवाना झालो...

रूम्स (आणि मुख्यतः वॉशरूम्स) कमालीच्या स्वच्छ होत्या... पुणेरी मैनेजमेंट असल्याने प्रत्येक ठिकाणी सूचना (पक्षी:पाट्या) दिसल्या (टू बी ऑनेस्ट, त्या अतिशय हेल्पफुल ठरल्या) जाळीच्या दरवाजावर "हा दरवाजा नेहेमी बंद ठेवा", वॉशरूमच्या बेसिनवर "इथले पाणी अतिमृदु आहे, त्यामुळे थोडासाच् साबण पुरतो.. एक्सट्रा साबण बेसिनला चिकटून राहील आणि तो जाणार नाही" अशा प्रकारच्या मार्मिक सूचना लिहिल्या होत्या...

पुण्याच्या शिरगांवकर दांपत्याने (नवरा इंजीनियर आणि बायको आर्किटेक्ट) 94 साली हे रिसॉर्ट सुरु केलं... ठायी ठायी त्यांची कल्पकता दिसून येते... पाली, सरडे, इतर कीडे आत घुसू नयेत म्हणून दरवाजाला आणि खिडक्याना केलेल्या जाळ्या (माझ्या घराच्या जाळ्या 2 वर्षातच फाटायला सुरुवात झालिये), रूम्समधे आणि बाहेरही रिसॉर्टमधे वापरलेले (मोस्टली सोलर एनर्जीवर चालणारे) छोटे छोटे दिवे, चहा/कॉफीचे कप वापरून झाल्यावर ते टाकून द्यायला केलेल्या दंडगोलाच्या आकाराच्या लोखंडी नळ्या आणि अशा अनेक गोष्टी (ज्या लेखात पुढे ओघानि येतीलच)

फ्रेश झालो आणि लगेचच रिसॉर्टवाल्यानी आम्हाला जवळच्याच एका धरणावर नेलं... ह्यांनी टेम्पो किंवा जीपला वरती अजुन एक मजला तयार केलाय... ज्यायोगे तुम्हाला आजुबाजुचं जंगल एका वेगळ्याच अँगलनी बघता येतं... मला तर मुंबईच्या डबलडेकरमधे वरती बसल्याचा फील आला, रियली टू गुड़....

डैमच्या बैकवॉटर पाशी गेल्यावर रिसॉर्टच्या ड्रायवर कम गाईड काकांनी आम्हाला बाजूच्या घनदाट जंगलातून पायी एक लांब टूर घडवली  (इंग्लिश पिक्चर बघायची सवय असल्यानी, इथे एनाकॉन्डा तर येणार नाहीना अशी सारखी भीती वाटत होती).... काही लोक त्या पाण्यातून ट्यूबने (किंवा ज्यांना पोहता येतं ते पोहत) दुसऱ्या टोकाला पोहोचले... इथे महाराष्ट्रात सगळीकडे पाण्याची वानवा असताना ते भरपूर पाणी पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं...(लातूरला जसं ट्रेननी पाणी पोहोचवलं तसच इथलं मुबलक पाणी मराठवाड्यात घेवून जावं का असा एक समाजोपयोगी विचार मनात आला)  साधारण पाच सहा किलोमीटर तंगडतोड करून गाडिपाशी परत आल्यावर त्यांनी कूलर मधलं गारेगार पाणी देवून सगळ्यांची तहान भागवली...

रिसॉर्टवर (डबलडेकर मधून) परत आल्यावर त्यांनी लगेच चहा/कॉफी सेंटरकड़े नेलं... इथे रिसॉर्टच्या साधारण मध्यभागी त्यांनी ते बनवलय... चहा आणि कॉफीचे थर्मास भरून ते वेळोवेळी रिफिल करतात... ह्या कौलारू सेंटरच्या प्रत्येक दिशेचं एक कौल त्यांनी काढून ठेवलय, ज्यायोगे दिवसा तिथे मुबलक प्रकाश येईल आणि लाईटची गरज भासणार नाही.... तसेच, रूम्समधे इंटरकॉम दिलेला नाही, रूम सर्विससाठी तुम्हाला डायनिंग हॉल पर्यन्त जावं लागतं (आणि त्याच्या आधीच हे टी/कॉफी सेंटर लागतं)
त्यामुळे कमितकमी मनुष्यबळामधे हे लोकं एवढं मोठं रिसॉर्ट मैनेज करतात ..

नंतर आम्ही रिसॉर्टच्या एंटरटेनमेंट सेक्शनला गेलो... तिथे कराओके होतं, शंभरच्या वर गाणी आणि आपला भसाडा आवाज ऐकायला कोणी नाही ह्या संधिचा फ़ायदा उठवून रोमॅंटिक, दर्दभरे, किशोर/मुकेश/रफ़ी/महम्मद अझीज/नितीन मुकेश/उदित/सोनू/कुमार सानू असे वाट्टेल त्या कॉंबिनाशनचे गाणे गाऊन घेतले... इतर लोक आल्यावर मग टेबल टेनिस, सापशिडी आणि कैरम खेळलो...

नंतर "चला जेवायला" ह्या अत्यंत उत्साहवर्धक ( आणि खुप वेळापासून वाट पहात असलेल्या) हाकेला ओ देत डायनिंग सेक्शनकड़े पळालो...भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, लोणी, ताक, भात, वरण असा दमदार मेनू (नॉनव्हेज वाल्यांसाठी तांबड़ा/पांढरा रस्सा, मटन) होता... तुडुंब जेवल्यावर हात धुवायला बम्बाच पाणी आणि खाली घंगाळं असा राजेशाही थाट होता(इथे उष्टे पेले, वाट्या, ताट, चमचे आणि ताटातलं उरलं सुरलं टाकायला वेगळे सेक्शन आहेत.)

दिवसभराच्या प्रवासाने आणि संध्याकाळच्या पायपीटीने दमल्यामुळे अंथरूणाला पाठ टेकताच झोप लागली (बाय द वे, इथे एसी, नॉन-एसी, डीलक्स, सुपर डीलक्स अशा रूम्स नाहीत... उन्हाळ्यात, एप्रिल
मधेहि, पंख्याचं वारं पुरत.. कारण इथे अजिबात उकाडा जाणवत नाही)

डे 2
-----
सकाळी उठून पहिले चहा/कॉफी प्यायला गेलो (त्याची वेळ त्यांनी 6.30 ते 8.30 अशी ठेवलिये.. स्वभावधर्माला अनुसरून मी शार्प 8. 25 ला तिथे पोहोचलो :-))
त्यानंतर ब्रेकफास्टची वेळ 8.30 ते 10.30... ह्यावेळी मात्र मी स्वतःत कमालीची इम्प्रूवमेंट घडवून शार्प 10 ला तिथे पोहोचलो... तरीही ब्रेकफास्ट करणारा मी रिसॉर्टचा शेवटचा मेंबर होतो  (मी काही फारसं मनाला लावून नाही घेतलं म्हणा ते पण रिसॉर्ट स्टाफ च्या कपाळावरच्या आठया मात्र मी उत्सुकतेनि मोजून घेतल्या)  लुसलुशित आलू पराठे लोण्यासोबत चापून , परत एक कॉफी ओरपून घरच्यांसोबत डबलडेकरमधे पावनखिंडीकडे कूच केलं

पक्का डांबरी रस्ता आणि दुतर्फा घनदाट जंगल अशा निसर्गरम्य प्रवासाला आमची सुरुवात झाली...इथे गवा, साळीन्दर, सांबार असे विविध प्राणी दिसतात असं आमचा ड्रायवर कम गाईड सांगत होता.. आम्हाला मात्र चार्ल्स डार्विन काकांचा आवडता प्राणी माकडच ठिकठिकाणी दिसत होता.. एके ठिकाणी सगळ्या गाड्या अचानक थांबल्या.. आमचे गाईड म्हणाले, "वरती बघा जांभळं".. खरोखरच जांभळानी लगडलेल्या अनेक फांद्या आमच्या हातात आल्या... आपण नेहेमी खातो त्यापेक्षा लहान (साधारण बोराच्या आकाराची) जांभळं आम्ही तोडून खाल्ली... सरप्राइजिंगलि, अतिशय गोड होती ती...

पुढे विशाळगडाकडे जाणाऱ्या घाटात गाड्या पुन्हा थांबल्या... आमच्या गाडीत एक मोठा स्पीकर होता, त्यावरून रिसॉर्ट ओनरच्या आवाजात पावनखिंडीची माहिती देणारी कैसेट सुरू झाली...ती थोडक्यात सांगतो

एका दिशेला दूरवर पन्हाळा किल्ला आहे... शिवाजी महाराजांच्या काळात त्याला एकदा सिद्दी जौहरचा वेढा पडला... बऱ्याच दिवसानंतर किल्ल्यातली धान्यसामुग्री संपल्यावर महाराजांनी रात्रीत 600 मोजक्या मावळ्यांसोबत विशाळगड़ाकडे कूच करायचं ठरवलं... घोड्यांच्या टापांचा आवाज टाळण्यासाठी सगळे भर पावसात पायी निघाले (महाराज पालखीत होते)... शत्रूसैन्याची दिशाभूल करण्यासाठी महाराजांचा वेश परिधान करून शिवा न्हावी काशिद दुसऱ्या रस्त्यानि मोजक्या मावळ्यांसोबत निघाला... काही वेळानी सिद्दीच्या लोकांना महाराज पळाल्याची खबर लागली आणि त्यांनी घोड्यावरून पाठलाग करत शिवाला गाठलं... अंधारात नीट न समजल्याने ते शिवाला महाराज समजून सिद्दिकडे घेवून आले... उजेडात नीट पाहिल्यावर सिद्दीला खरा प्रकार समजला आणि त्याने तिथल्या तिथे शिवाची गर्दन छाटायचा हुकूम दिला...(इथे अंगावर पहिल्यांदा शहारा आला आणि नकळत डोळे पाणावले.. मनोमन शिवाला वंदन करून आतापर्यंत ऐकलेल्यातली सगळ्यात घाणेरडी शिवी सिद्दीला दिली)

मग सिद्दीच् सैन्य खऱ्या महाराजांच्या मागे लागलं... विशाळगडाच्या अलीकडे एका गावात महाराज आणि त्यांच्या मावळ्याना त्यांनी गाठलच.. घमासान युद्ध सुरू झालं... शत्रूसैन्य खुप जास्त असल्यानं बाजीप्रभू देशपांडे ह्या महाराजांच्या सरदारानी "मी इथे 300 मावळ्यांसोबत ह्यांचा मुकाबला करतो तुम्ही विशाळगड़ाकडे  कूच करा... गडावर पोचले की तोफांची सलामी दया म्हणजे आम्हाला तुम्ही सुखरूप पोहोचल्याचं समजेल.. तोवर आम्ही ह्यांना अडवून धरतो" असा हट्ट धरत महाराजांना बळेच जायला भाग पाडलं...(लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे वाक्य आठवले) महाराज नाखुशीनेच तिथून निघाले.. सिद्दिचे हजाराच्यावर सैनिक विरुद्ध बाजींचे केवळ 300 मावळे असं अशक्यप्राय युद्ध सुरू झालं...

इथे मराठ्यांचा गनीमी कावा (परत एकदा) उपयोगी पडला... बाजीच्या सैन्यानी मोठ्या हुशारीनि सिद्दीच्या सैन्याला अरूंद अशा पावनखिंडीत यायला भाग पडलं..बाजींचा जो अंदाज होता त्यापेक्षा बराच जास्त वेळ महाराजांना गडावर पोहोचायला लागला.. पावसामुळे त्यांना वेळ लागला  आणि नंतर विशाळगडाला दुसऱ्या एका शत्रूसैन्याचा वेढा पडला होता.. त्यांच्याशी लढायला प्रत्यक्ष महाराज पालखीतून उतरले असं सांगतात... गडावर पोहोचल्यावर त्वरेने महाराजांनी तोफा डागण्याचा आदेश दिला.. पण पावसाळा असल्या कारणाने सगळ्या तोफा मेण भरून आतमधे ठेवल्या होत्या... त्यांना तयार करून तोफा डागूस्तोवर अजुन वेळ गेला...

साधारण दहा, साडेदहाला लढायला सुरू केलेल्या बाजीच्या सैन्याला तोफांचा आवाज ऐकू यायला संध्याकाळाचा पहिला प्रहर (साधारण चार साडेचार वाजले असावेत) उजाडला...तोवर बाजींच्या अंगाचा असा एकही भाग शिल्लक राहला नव्हता जिथे जखमा झाल्या नसतील... तोफांचा आवाज ऐकून बाजीप्रभू, त्यांचे बंधू फुलाजी ह्यांनी समाधानानी प्राण सोडले.... बाजीप्रभूंसोबतचे तसेच महाराजांसोबतचे किती मावळे ह्या मोहिमेत धारातीर्थी पडले ह्याची आपल्या इतिहासात (दुर्दैवाने)नोंद नाही...(हे सगळं ऐकून डोळ्यातून अक्षरशः पाण्याच्या धारा लागल्या होत्या) धन्य ते महाराज !!! धन्य ते बाजीप्रभू!!! आणि धन्य ते स्वामिनिष्ठ मावळे!!!!

पावनखिंडीला जायच्या रस्त्यावर साधारण सहा किलोमीटरचा पैच अतिशय खराब आहे... ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी स्वतःच्या वाहनातून सावकाश जाणे श्रेयस्कर...
(कारण ह्यांच्या डबलडेकरला सस्पेंशन नावाचा प्रकार जवळपास नाही म्हंटले तरी चालेल).....पावनखिंडीत उतरायला एक अरूंद अशी लोखंडी शिडी बनवलिये... आम्ही लहान मुलांना घेवून न जाण्याचा निर्णय घेतला होता पण आम्ही खाली उतरल्यावर आमच्या गाईड लोकांनी मुलांना कडेवर घेवून यायला सुरुवात केली.. ते पाहून माझी जाम टरकली... मी लगेच मनात रामरक्षा/भीमरूपी म्हणायला सुरुवात केली..(मला बाकीचं काही येतं नाही, नाहीतर गणपती अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम, पुरूषसूक्त, स्त्रीसूक्त असे सगळे श्लोक नक्कीच म्हंटले असते)

त्या खिंडीत पुढे पुढे जाताना आम्हाला त्रास होत होता तर बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे इथे तासनतास कसे लढले असतील ह्या विचाराने अंगावर सर्रकन काटा आला...   भारावलेल्या अवस्थेत आम्ही सगळे खिंडीतून वर आलो आणि रिसॉर्टवाल्यानी सगळ्यांना कूलरमधून आणलेलं गारेगार, सुमधुर कोकम सरबत दिलं... सगळ्यानी निदान 4, 5 ग्लास तरी सरबत पिलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो...

 येताना मधे आमच्या गाड्या थांबल्या आणि जंगलात थोडंसं आत बार्बेक्यूची मेजवानी मिळाली.. व्हेज वाल्यांसाठी भाजलेले बटाटे, वांगी, स्वीट कॉर्न, ढोबळी मिर्ची तर नॉन व्हेजवाल्यांसाठी चिकन असा जंगी मेन्यू होता... मग जेवायला साग्रसंगीत स्वैपाक आणि वामकुक्षी घेवून झाल्यावर गरमागरम चहाची मेजवानी होती...

रिसॉर्टवर आल्यावर आम्ही स्विमिंगपूल मधे दोन तीन तास डुंबलो आणि मग (भसाड्या आवाजात) कराओके, सापशिडी, कैरम खेळून रात्रीचं जेवण घेतलं...रिसॉर्ट मधे झोके, झोपाळे, मोठ्ठी घसरगुंडी असल्यामुळे मुलांनी खुप एन्जॉय केलं... तुम्ही जर ब्रश, पेस्ट, दाढीचं सामान, बर्मूडा, इत्यादि गोष्टी आणायला विसरला असाल तर रिसॉर्टचं नो सेल्समन वालं एक दूकान आहे... जिथे तुम्ही हव्या त्या वस्तू विकत घेवून त्यांच्या कॅश बॉक्समधे पैसे ठेवू शकता ..

डे 3
------

ब्रेकफास्ट घेवून एडीशनल पैसे देवून (अडवांस पेमेंटव्यतिरिक्त डैमच्या आणि पावनखिंडीच्या सफारीचे फक्त 1750/- द्यावे लागले)...जड अंतःकरणानि आम्ही साधारण साडेदहाला पुण्याकडे प्रस्थान ठेवलं... खाली काही फोटोज शेयर करतोय..


सामान ने-आण करण्यासाठीची ढकल गाडी

रिसॉर्ट

हात धुवायला असलेला बंब 
     
                     

स्विमिंग पूल

घसरगुंडी


चहा/कॉफी सेंटर

पावनखिंड स्मारक


प्रत्यक्ष पावनखिंड


खाली उतरायला केलेला लोखंडी जिना


गावातल्या लोकांनी बाजींच्या स्मरणार्थ लावालेला फ्लेक्सपावनखिंड लढाईची माहिती


रिसॉर्टची डबलडेकर


जंगलातलं बार्बेक्यूपावनखिंडडैमचं बैकवॉटर