Friday, May 21, 2010

काही छंद

बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील.

मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार. आम्हाला आमचा खजिना हमखास बस स्टँडच्या भव्य कचराकुंडीत सापडायचा. म्युन्सिपाल्टीचे लोक पहात नसतील एवढ्या बारकाईने आम्ही एक एक कचर्‍याचा थर काडीने किंवा तत्सम अवजाराने बाजूला करायचो. एखादा नवीन टिक्का मिळाला की हिरा मिळाल्याएवढा आनंद व्ह्यायचा. नेमकं एक दिवस एका ओळखीच्यांनी आम्हाला संशोधन करताना पकडलं. इमान-इतबारे त्यांनी घरी वार्ता पोहोचवली. घरचे तसे उदार मनाचे असल्याने काही बोलले नाहीत फक्त गमतीनी विचारलं की रिकाम्या काडेपेट्याच गोळा करता ना रे बाबांनो? माझे काही मित्र सिगरेटच्या पा़किटाच्या आतला चंदेरी कागद जमा करायचे. मला ते अगदीच भुक्कड वाटायचं. सगळ्याच सिगरेटच्या पा़कीटातील चंदेरी कागद सारखाच असणार. आणि मुळात (रिकाम्या) काडेपेट्या गोळा करतानाच एवढी अपराधीपणाची भावना होती की सिगरेटच्या पाकीटाला हात लावायची पण हिंमत नाही झाली (तेव्हा :-) ). मग डेली कलेक्शन घेऊन घरी आलं की काडेपेट्यांचं मुखपृष्ठ धुऊन, व्यवस्थित पुसून, कापून ते एका खास वहीत चिकटवून टाकायचो. भावाचं नशीब नेहमीचं जोरात असायचं. त्याच्याकडे रोज माझ्यापेक्षा निदान ३-४ तरी नवीन टिक्के निघायचे. मग मी मनातून थोडा खट्टू व्ह्यायचो. झोपताना उद्या त्याच्यापेक्षा नक्की जास्त टिक्के मिळवीन असं स्वप्नं रंगवायचो.

अशा तर्‍हेने बरीच वर्षं संशोधनात घातल्यावर कालपरत्वे ती वही हरवून गेली. आज वाटतं की ती वही जपून ठेवायला हवी होती. असो, हा छंद अगदी परवडेबल होता त्यामुळे बरीच वर्षं टिकला. काही लोक देशोदेशीची नाणी गोळा करत. तेव्हा आमच्या दूरदूरच्या नात्यातसुद्धा कोणी परदेशी नव्हतं, त्यामुळे हा छंद काही जवळपास फिरकला नाही. खरा छंद माणसाला पार वेडं लावतो, बेचैन करून टाकतो. असाच एक दुसरा छंद म्हणजे वर्तमानपत्रात, क्रिडा साप्ताहिकात आलेले क्रिकेटर्सचे फोटो जमा करणं (आणि अर्थातच एका खास वहीत ते चिकटवणं) पण लवकरच त्यातला रस संपला. सकाळमधे चिंटू किंवा लोकसत्तात काहीतरी शौर्यगाथा का यशोगाथा असं काहीतरी यायचं पण तिकडे काही वळायची कधी इच्छा झाली नाही.

मधेच काही दिवस प्रसिद्ध लोकांच्या स्वाक्षर्‍या गोळा करायचं खूळ डोक्यात आलं. मला आठवतंय त्याप्रमाणे पहिली सही अरूण दातेंची घेतली. एकूण सह्यांचा आकडा काही दहाच्या वर गेला नाही. कारण एक तर मी अहमदनगरमधे रहात असल्याने साहित्यिक,कलावंत, खेळाडू मंडळी काही विशेष फिरकायची नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम संपल्यावर किंवा मध्यंतरात ह्या लोकांच्या मेकअप-रूम मधे जाऊन सही घ्यायला जाम संकोच वाटायचा. एकदा आमच्या नगर वाचनालयात व.पु. आले असं कळल्यावर धावतपळत गेलो. मी कधी वपुंचा फोटो पाहिला नव्हता पण दारातच मु़ख्य ग्रंथपालांसोबत एक पाहुणा दिसला. ग्रंथपालांनी विचारलं - काय रे कोण पाहिजे? मी म्हटंलं की इथे वपु आले होते असं ऐकलं. त्यांची सही घ्यायची होती. ग्रंथपाल म्हणाले की ते मगाशीच गेले पुण्याला. तेवढ्यात ते पाहुणे म्हणाले की माझी सही चालेल का? मी तेवढा प्रसिद्ध नाहीये पण करतो सही तुझ्या वहीत. सही पाहिल्यावर लक्षात आलं की हे तर रमेश मंत्री. अर्थात, तेव्हा मला ह्या नावाचे कोणी लेखक आहेत हेदेखील माहित नव्हतं.

अर्थात हे सगळं इंटरनेटची क्रांती होण्यापूर्वीचं. आजच्या काळात जर कोणी काडेपेट्याचे टिक्के शोधताना दिसलं तर मला भयानक आश्चर्य वाटेल. पण त्या छोट्या दोस्तासोबत कदाचित टिक्के शोधत परत बालपणाची सफरही करेन. इंटरनेट आल्यावर तर वेड छंद लागले. सगळ्यात आधी चॅटिंगचा. "ए एस एल प्लीज" हे तर चॅटिंगचं ब्रीदवाक्य होतं. प्रत्येक सायबर कॅफेमधे MIRC नावाचं सॉफ्टवेअर असायचं. त्यावर चॅटिंगचा अक्षरशः धुमाकूळ चालायचा. नंतर याहू, हॉटमेल मेसेंजर लोकप्रिय झाले. माझे काही मित्र तर रोज १०-११ तास चॅटिंग करायचे. एक दिवस तर एकानी कहर केला. सलग वीस तास चॅटिंग केलं पठ्ठ्यानी. सगळ्यांनी फक्त त्याचा सत्कार करायचंच बाकी राहिलं होतं. तेव्हा इंटरनेट बरंच महाग होतं. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य जनतेला हे लाड परवडायचे नाहीत. मित्रांनी, मी कधी नावही ऐकलं नव्हतं अशा, देशाच्या मुलींसोबत प्रेमाच्या आणाभाकादेखील घेतल्या होत्या :-). मला काही चॅटिंगमधे (सुरूवातीचा थोडा काळ सोडला तर) फारसा इंटरेस्ट वाटला नाही. (इथे कोणाला कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशी म्हण आठवत असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करतो :-) )

नंतर मग आयएमडीबीवर जाऊन इंग्लिश चित्रपटाची माहिती वाचत बसणं, विकीपिडीयावर जाऊन जे नाव आठवेल त्याची माहिती वाचणं, टोरंटची क्रांती झाल्यावर धपाधप पिक्चर डाऊनलोड करणं असे जे छंद लागले ते आजपर्यंत कायम आहेत.

Sunday, May 9, 2010

ऑफिसमधे वेळ कसा घालवावा?

१. मॅच चालू असेल तर क्रिकइन्फोवर जाऊन सारखं स्कोअरकार्ड रिफ्रेश करत रहाणं (ते आपोआप काही वेळानी रिफ्रेश होत असेल तरीही) . दोन्ही संघातल्या प्रत्येक खेळाडूचं उगीचच प्रोफाईल पहात बसणं.

२. थोड्या थोड्या वेळानी ईसकाळवर जाऊन एखाद्या लेखावर आपण दिलेली कमेंट प्रसिद्ध झाली की नाही ते पहाणं. (खवचट कमेंट असेल तर ईसकाळवाले लवकर प्रसिद्धपण करत नाहीत)

३. रोज सगळे बँक अकाऊंट्स, लोन अकाऊंट चेक करत बसणं.. फारच बोअर होत असेल तर १०० रुपये सेविंग अकाऊंट मधून करंट मधे आणि परत करंटमधून सेविंगमधे ट्रान्सफर करणं.

४. वीकीपीडियात जाऊन ज्याचं नाव डोक्यात येईल त्याची माहिती सर्च करून वाचत बसणं.. त्या लेखात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर टिचकी मारुन उगीचच त्याची माहिती वाचत बसणं...

५. आयएमडीबीवर जाऊन जे डोक्यात येईल त्या चित्रपटाची माहिती वाचत बसणं.. मग त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची खाजगी माहिती, आत्तापर्यंतचे चित्रपट ह्यांची माहिती वाचत बसणं.

६. मटावर जाऊन जेवढं काही वाचणं हापिसात शक्य आहे तेवढं वाचणं आणि उरलेलं घरी जाऊन पहाणं.

७. मायक्रोसॉफ्ट वर्डमधे जाऊन एखाद्या इंग्लिश शब्दाचे समानार्थी शब्द बघत बसणं (शिफ्ट + एफ७ दाबून).. एखाद्या समानार्थी शब्दावर टिचकी मारून त्याच्या समानार्थी शब्दांच्या यादीत मूळ शब्द येतोय का नाही ते पहाणं.

८. आणि महत्त्वाचं म्हणजे - उरलेल्या वेळात हापिसचं काम करणं..

Monday, April 5, 2010

मुक्तपीठ आणि कमेंट्स

माझ्या दृष्टीने सध्या तरी सर्वात विनोदी लेखन म्हणजे सकाळच्या मुक्तपीठमधले लेख आणि (त्याहीपेक्षा) त्यावर पडलेल्या भन्नाट कमेंट्स. पब्लिक बिचारी उत्साहाने लेख लिहिते आणि तलवारी पाजळत असलेले कमेंट बहाद्दर त्यांच्या लेखाची पार खांडोळी करतात. :-) काही उदाहरणे:

* एक बाई मुलीच्या बाळंतपणासाठी चीनला जाऊन आल्या आणि मुलीला त्या बाळाला हौन्गकौंगचा आयडी मिळावा अशी इच्छा होती त्यामुळे ती हौन्गकौंगच्या एका दवाखान्यात भरती झाली. त्यामुळे त्या बाळाला चीनचा व्हिसा मिळायला ज्या अडचणी आल्या त्याचं वर्णन बाईनी लेखात केलं होत. त्यावर पडलेल्या ह्या कमेंट्स:

१) मुलीचं जाहीर माप काढलेले दिसतंय

२) कोणी सांगितले होते नसते उद्योग करायला? ज्यांना प्रोब्लेम्स नसतात त्यांना असे प्रोब्लेम्स ओढवून घ्यायची सवय असते. इतके पैसे तिथे उधळलेत त्या पैशात १०० गरीब महिनाभर जेवले असते

३) मुलगी हट्टी आहे हे सांगण्यासाठी लेखन प्रपंच केलेला दिसतोय , तरी या आजीनी एका दगडात बरेच पक्षी मारले आहेत.

४) आजीबाई तुमचे जावई बापू डोक्याने जरा कमी दिसतात. स्वताच्या नवजात बाळाला, ओल्या बालांतीन बायकोला आणि पूजनीय सासुमा ला अशा संकटात ढकलण्याच्या आधी नीट सगळी चौकशी करायला नको होती? यांच्या लहरीवर चालायला चीनची वकीलात म्हणजे काय पिताश्रींची जायदाद वाटली का त्यांना? बालिशच आहेत जरा.

५) मराठी मुली मग त्या भारतात असो नाही तर बाहेर (बाहेर जास्तच ) नवर्याला आपल्या तालावर नाचवणारच (ते सुधा स्वभाव माहित असल्यामुळे नाचतात) आणि असले प्रसंग उभे करणार मग ह्या हट्टीपणाला मनाशी ठाम वगैरे शाब्दिक आवरणं चढवून सांगितली तरी फरक पडत नाही

६) या लेखातून आजीबाईना आपण व आपले जावई किती श्रीमंत आहे हे दाखवायचे होते

७) कालपर्यंत USA जावई पुराण सुरु होते , आजपासून नवी मालिका सुरु होत आहे - CHINA जावई पुराण.

८) अ) मुलगी मूर्ख दिसते आहे. ब) जावई स्वताच्या डोक्याचा वापर करताना दिसत नाही तो केला असता तर त्याला अगोदरच कळले असते कि डीलीवरीची ची तारीख आणि नवीन वर्ष एकाचवेळी आहेत आणि गोंधळ होऊ शकतो. क) बाई तुम्ही पण दिव्य आहात जाण्यायेण्याला वेळ लागतो हे माहित असूनही गप्प राहिलात ड) परत असले काही तरी लिहून आमचा वेळ वाया घालवू नका।

९) अरेरे!!! काय हा दैव दुर्विलास! आजी आता जावयांना दुसरा chance घ्याला सांगा आणि या वेळी नीट सगळे प्लान करा.

* एका बाईनी आपल्या मैत्रिणीच गुणगान करणारा लेख लिहिल्यावर त्यावर आलेल्या ह्या कमेंट्स:

१) कहर केला ताई तुम्ही! तुमचा आणि मैत्रीणीचा एक फोटो पाठवून द्या. देवघरात लावतो उद्यापासून

२) मुक्तपीठला आशयघन लेख मिळत नाहीत काय? "साभार परत" योजना करायला हवी.

३) त्या दोन्ही मैत्रिणींच्या एकमेकांबद्दलच्या भावना , मते,अनुभव काहीच न देता फक्त कोण काय शिकले आहे आणि काय काम करते आहे ह्याचेच वर्णन जास्त आहे. मैत्री बद्दल लिहायचे तर त्यात त्यांची मुले, पुतणे, सुना किती कार्यक्षम आहे ह्याची लिस्ट काय कामाची?

४) मला वाटत, ह्यांची मैत्रीण राजकारणात येत आहे आणि त्यांची जाहिरात म्हणून हा लेखनप्रपंच. अन्य कोणताही हेतू या लेखातून दिसून येत नाही

५) पूर्वीची autobiography पुस्तके अशीच लिहिलेली दिसतील. प्रवास वर्णने तर विचारू नका. शिंप्याकडे जाऊन सूट कसा शिवला याचेच ३-४ पाने. त्यावेळी वाचायला दुसरे काहीच नसे. लिहू द्या सगळ्यांना.पण किती माहिती सार्वजनिक करायची हे बघा.

* एकीनी तिच्या वस्तू हरवल्यावर तिला कशी देवमाणस भेटली आणि तिला त्या वस्तू कशा परत मिळाल्या त्यावर लेख लिहिला आणि त्यावरच्या ह्या कमेंट्स:

१) बाकी काही नाही फक्त हे अधोरेखित झाले की तुम्हाला वस्तू सांभाळता येत नाहीत।

२) जगाचा चांगुलपणा जरी असला तरी तुमचा वेन्धळेपणा इथे नक्कीच जाणवतो

३) काकू वस्तू सांभाळायला शिका!!! प्रत्येक वेळी चांगली लोक भेटतीलच असे नाही! नाहीतर पुढच्या वेळेस कश्या वस्तू परत मिळाल्या नाही या साठी लेख लिहावा लागेल.

४) पण तुम्ही तुमच्या गोष्टींची योग्य काळजी घेतली पाहिजे म्हणजे हा मनस्ताप वाचेल. अनुभव १ आणि अनुभव ३ तर हलगर्जीपणाच दाखवतात. So pls take care. जगातील लोक चांगले आहेत पण आपण आपल्या हलगर्जीपणामुळे त्यांचा वेळ घालवतोय.....

५) जगात चांगुलपणा आहे ते ठीक आहे पण भटकंतीचीच हौस आहे तर स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्यायलापण शिका।

६) मला जर तुमची वस्तू मिळाली तर परत देणारच नाही ...लेखाची वाट पाहत बसेल.

७) मावशी सारख्या गोष्टी हरवत जाऊ नकात ...काळजी घ्यावी ...लोकांना काही दुसरी कामे नाहीत काय तुमच्या गोष्टी शोधात बसायला आणि तुम्हाला परत करायला?

८) अहो काकू 'तो' नाही 'ते' म्हणावं अस पतीला एकवचनी संबोधण बर दिसत नाही..

९) लोकांची प्रामाणिकपणाची परीक्षा घेऊ नका, कृपा करून...

१०) पुणेरी पाटी - "शनिवार पेठ रहिवासी XXX कुटुंबाला सूचना - इकडे कोणतीही वस्तू विसरू नये, परत केल्याचे पैसे पडतील"

११) अहो जरा काळजी घ्या नाहीतर कधीतरी तुम्हीच हरवाल आणि मग नवरा प्रार्थना करेल (सभ्य गृहस्थ असावेत) की बायकोला कोणी शोधून परत पाठवू नये... ही ही ही ही ही!!!!

१२) तुमच्या स्वताच्या चुकीने हरवलेल्या वस्तू जर परत मिळाल्या म्हणजे जगात चांगुलपणा आहे हे म्हणणे मला पटत नाही, स्वत: काशी करायची आणि मग जगाला नावे ठेवायची (चांगली किंवा वाईट) हे बरोबर नाही.

Tuesday, March 23, 2010

झोप आणि डुलकी

झोप हे एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं मला कायम वाटत आलंय. कुठेतरी वाचल्याच आठवतंय की गांधीजी फक्त तीन तास झोपायचे - १२ ते ३. एवढ्या कमी वेळात तर माझी डुलकी पण होत नाही. उगीच नाही त्यांना महान म्हणत. डुलकी वरून आठवलं की काही लोकं डुलकीला "डूकली " म्हणतात. ते पण एवढ्या आत्मविश्वासाने की आपल्यालाच शंका यावी की खरा शब्द डूकली आहे की काय. असो, झोप आणि डुलकीमधला फरक म्हणजे डुलकी ही उभ्या उभ्या, बसल्या जागी घेता येते. तुम्ही बसमध्ये किंवा लोकल मध्ये प्रवास करताना, हापिसात जेवण झाल्यावर बसल्या जागी काढता ती डुलकी. झोप म्हणजे पंखा फुल स्पीडवर लावून, जाड पांघरूण घेऊन १०-११ तास घेता ती खरी झोप. डुलकीला त्याची सर नाही. मला तर बस/लोकल मध्ये बसल्या मिनटाला झोप यायला लागते. त्यात जर खिडकीपासली जागा असली तर सोन्याहून पिवळ.

पूर्वी तर मला बस मध्ये अशी जोरदार झोप यायची की खिडकीच्या दांड्यावर डोकं आपटून निदान २-३ वेळा तरी कपाळमोक्ष व्हायचा. बसमधून उतरल्यावर कपाळ हे एका साईडनी टम्म फुगलेलं. पण त्याची फिकीर नाय करायची. झोप सलामत तर कपाळ पचास. बरोबर एखादी पिशवी असली आणी त्यात जाड स्वेटर किंवा त्या टाईप काही असलं की मग ती पिशवी खिडकीच्या दांड्यावर ठेवून त्याचा उशीसारखा वापर करून ताणून देता येते. कंडक्टरपण असला निवांत येतो की त्याला ओरडून सांगावस वाटत, बाबा रे मला झोपायचं, तेव्हा पटकन माझ तिकीट काढ. मी मुद्दाम खिडकीपासली जागा पकडतो, कारण त्या दांड्यावर डोक ठेवून निवांत झोपता येत. चुकून कधी दोन लोकांच्या मध्ये किंवा कडेला बसावं लागलं की खरी बोंब होते. बराच वेळ (म्हणजे १५-२० मिनट) मोठ्या मुश्कीलिनी डोळे बळच ताणू ताणू झोप आवरायचा प्रयत्न करतो खरा पण नाईलाज को क्या इलाज!! शेवटी चष्मा वरच्या खिशात जातो आणी समोरच्या दांड्याला घट्ट पकडून ताठ बसायचा प्रयत्न करत झोपेच्या प्रवासाला सुरुवात होते.

आता शिस्तीत काही झोपण जमत नाही. मग, एका बेसावध क्षणी, पहिल्यांदा डाव्या बाजूला जोरात मान पडते. शेजारचा माणूस पहिल्यांदा नुसताच खांद्यानी आपल्या डोक्याला ढुशी मारतो. मी खाडकन जागा होतो आणि ओशाळ होत, परत सरळ झोपायचा प्रयत्न करतो. डाव्या बाजूनी असा प्रसाद मिळाल्यावर आपसूकच मान किंचित उजवीकडे कलते. आता ढुशी मारण्याची वेळ उजवीकडे बसलेल्यावर येते. दोन्हीकडून टोले खाल्ल्यावर आता मान खाली घेऊन समोरच्या दांड्यावर डोकं ठेवतो. पण छे!! तस झोपण काही जमत नाही. हळूच बाजूच्या दोघांकडे नजर टाकतो, ज्याचा चेहेरा कमी रागीट दिसत असेल, त्या बाजूला हळूच मान कलते. ह्यावेळी मात्र झोप बऱ्यापैकी सावध असते. फार फार तर १ - २ वेळा त्यांच्या खांद्यांवर मान जाते पण ह्यावेळी हुशारीनी, त्यांनी ढुशी द्यायच्या आत, पटकन मान सरळ करतो. मनात पक्क ठरवतो की पुढच्या वेळी काही झालं तरी खिडकीपाशीच बसायचं. मला काही काही लोकांच जाम कौतुक वाटत ते शेवटच्या लांबलचक सीटवर बिनधास्त ताणून देतात. दुसरे प्रवासी येऊन त्यांना उठवायचा प्रयत्न करतात पण हे ढिम्म हलत नाहीत. ही कला मला ह्यांच्याकडून एकदा शिकायचीये.

व्यवस्थित झोप घ्यायला पण पोषक वातावरण हवं. म्हणजे उन्हाळा असेल, दुपार असेल तर आधी मजबूत आमरसाचं जेवण झालेलं पाहिजे आणि मग खोलीत पडदे बीडदे लाऊन, अंधार करून, पंखा/कुलर लावून मग झोपण्यात जी मजा आहे ना त्याला काही तोड नाही. (गांधीजीनी बहुदा ही गोष्ट मिस केली :-)) आणि अशा वेळी बेल वाजली की, पुलं म्हणतात त्याप्रमाणे दरवाजाबाहेर कुबेर जरी त्याचा खजिना द्यायला आला असेल ना तरी त्याचे हात कलम करून टाकावेसे वाटतात. जेवल्या जेवल्या झोपू नये, शतपावली घालावी हे जरी बरोबर असलं तरी शतपावली घातल्यावर साली झोपच उडून जाते. आमरसाच जेवण झाल्यावर जे काय डोळे जड झाले असतात ना त्याला झोप हा एकच पर्याय आहे.

रात्रीच्या झोपेच गणितच वेगळ आहे. ९ आणि १० वाजता झोपतात ती काही खरी झोप नाही. ते उगीच काहीतरी नियम किंवा शिस्त लावून घेण्यासारख आहे. तंगड्या वर करून एखाद पुस्तक वाचत किंवा सिनेमा बघत जेव्हा डोळे जड होतील ना तेव्हा झोपायला जाव. आजूबाजूचा माणूस घोरणारा असेल तर मग सालं झोपेचं खोबर होऊन जात. हे एक बर आहे की आपल्याला झोपेत आपलच घोरणं ऐकू येत नाही. नाहीतर झोपणच मुश्कील झालं असतं.

Monday, March 22, 2010

ओर्कुटिंग

ऑर्कुट ही एक मजेदार सोशल नेटवर्किंग साईट आहे. फेसबुक वगैरे आत्ता आत्ता भारतात जोर धरत आहे. पण ऑर्कुट आपल्या पब्लिक मध्ये जाम लोकप्रिय आहे. मला नेहेमी काही प्रश्न पडतात.

१. समजा अमुक अमुक माणूस पुण्यात रहात असेल आणि तो १ - २ दिवसासाठी दुसऱ्या गावाला जाणार असेल तर लगेच स्टेटस मध्ये " गोइंग टु नगर/कोल्हापूर/नाशिक" तत्सम गोष्टी लोक का बर अपडेट करतात?

२. लग्नाला २ महिने राहिले असतील तर "काउंट-डाऊन बिगीन्स, ६० डेज टु गो", दुसऱ्या दिवशी परत "५९ डेज टु गो" हे असं लग्नाच्या दिवसापर्यंत लोक का बर टाकत बसतात? ह्या उत्साहाच नेमकं उगमस्थान काय असावं?

३. ऑर्कुटमध्ये तुम्ही जर काही डीटेल्स अपडेट केले तर ते तुमच्या मित्र - मैत्रीणीना त्यांच्या होम पेज वर दिसतात. त्यामुळे लोकं चिन्धी चिन्धी गोष्टी अपडेट करत बसतात. उदाहरणार्थ: स्टेटस मध्ये "आयपील इज कमिंग" किंवा काहीतरी अगम्य इंग्लिश कोट टाकतात. काही लोक तर फर्स्ट नेम आणी लास्ट नेम अपडेट करतात आणी तिथे काहीतरी मेसेज टाकून ठेवतात. आता ही काही अपडेट करायची गोष्ट झाली का? जन्मापासून मरेपर्यंत तुमचं नाव काही बदलत नाही (अपवाद मुलींचा, ते पण फक्त एकदा). बर हे नाव अपडेट केल्यावर हा/ही ओरीजनल कोण होता/होती ते जाम कळत नाहीत. मग लोक त्याला/तिला scrap टाकून विचारतात की बाबा/बाई तू नक्की कोण? ह्यावर त्याने/तिनी सरळ सरळ सांगावं की नाही? पण पब्लिक पण जाम वस्ताद असतं. ओळख बर मी कोण आहे? ह्या टाईपचे खेळ सुरु करतात.

४. काही उत्साही मंडळी तर लग्नाच्या रात्रीच लग्नाचे ५०-६० फोटो ऑर्कुट वर अपलोड करतात. अशा लोकांबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. ह्यावर कडी म्हणजे समजा लोक उटीला हनिमूनला गेले असतील तर रोज रात्री तिकडच्या निसर्गदृश्यांचे फोटो अपलोड करतात. ह्या लोकांना एवढा वेळ आणी मुख्य म्हणजे अशा वेळी ही भलतीच इच्छा कशी होत असावी?

५. काही चतुर लोक तर समजा त्यांना १० फोटो अपलोड करायचे असतील तर रोज एक फोटो अपलोड करतात. म्हणजे होत काय की त्यांच्या फ्रेंड सर्कलला रोज ह्यांचे "रिसेंट अपडेट्स" दिसतात.

६. टेस्टीमोनिअलला ऑर्कुट मध्ये जाम महत्व आहे. म्हणजे क्ष व्यक्तीला य व्यक्तीबद्दल जर काही लिहावस वाटल तर तो त्याच्या/तिच्याबद्दल मजेदार गोष्टी लिहितो. खर तर ही गोष्ट ऐच्छिक आहे. पण काही काही पब्लिक जाम माग लागत की माझ्याबद्दल तू काहीतरी लिही. बर त्याच्या/तिच्याबद्दल खर लिहून पण चालत नाही. य ची अशी अपेक्षा असते की असं काहीतरी लिहावं की त्याचं/तिचं फ्रेंड सर्कल जाम फिदा व्हायला हवं. हा एक दबाव ऑर्कुट वर नेहेमी असतो :-)

७. तुम्हाला रोज/वारंवार भेटणारे लोक समोरासमोर काही बोलत नाहेत, पण तिकडे ऑर्कुट वर scrap टाकत बसतात. हाऊ आर यु? खूप दिवस झाले no scrap from you. त्याला म्हणावस वाटत की भल्या माणसा, आपण इतक्या वेळा भेटतो तेव्हा तर तू काही बोलत पण नाहीस. पण तिकडे ऑर्कुट वर गेल्यावर ह्यांच्या उत्साहाला एकदम उधाण येत.

८. पब्लिक मध्ये जाम स्पर्धा असते की कोणाचे फ्रेंड्स जास्त आहेत. मग मित्राचे मित्र वगैरे आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकतात. आता ज्या माणसाला आपण कधी पाहिलं नाही त्याची रिक्वेस्ट कशी स्वीकारणार? बर समजा झाले तुमचे १००० फ्रेंड्स, पुढे काय? मला नाही वाटत की ऑर्कुटनी सगळ्यात जास्त फ्रेंड्स असाणार्याला काही बक्षीस वगैरे ठेवल असेल.