मे महिन्यातील दुपार.. लांबलचक हायवे... एसी फुल स्पीडमध्ये चालू तरीही मानेवरून घामाचे २-३ थेंब ओघळतायेत.. खरं तर त्या थेंबांचा मानेवर होणारा गार स्पर्शही बरा वाटतोय. नेमकी गाडीत पाण्याची बाटलीही नाही. सकाळीच २ अंडी आणि वर २-३ कप चहा घेतलेला. त्यामुळे शरीराच्या आतली उष्णता बाहेरच्या तापमानाशी स्पर्धा करत होती. बाहेर इतकं कडक ऊन की त्यात क्षणभरही उभं राहीलं तरी जळून खाक होऊ की काय अशी भिती वाटली. आधीच जास्त असलेलं अंतर उन्हामुळे आणखीनच लांब वाटायला लागलं.
इतक्यात दूरवर एक लाल ठिपका दिसला. जसजसं त्या ठिपक्याच्या जवळ जात होतो तसं लक्षात येत गेलं की तो नुसता लाल नाही तर लालभडक ठिपका आहे. बाहेर आग ओतत असलेल्या सूर्यकिरणांपेक्षा लाल. आता तो लाल ठिपका पूर्ण विस्तारला गेला आणि लक्षात आलं की हा तर गुलमोहोर. नकळत गाडीचा वेग कमी झाला. लालभडक फुलांनी डवरलेला गुलमोहोर डोळयात मनसोक्त साठवून घेतला. थोड्या थोड्या अंतरावर असेच गुलमोहर दिसत गेले आणि तो मनमोहक लाल रंग डोळ्यांवाटे शरीरात उतरत गेला.
मनात विचार आला की लाल रंग खरं तर आक्रमकतेचं प्रतीक. मनाला अशांत करणारा रंग. लालभडक रक्त पाहीलं की काही जणांना चक्कर येते. पण हाच रंग जेव्हा धगधगत्या उन्हात गुलमोहरावर पाहिला तेव्हा डोळे निवल्यासारखे वाटले. मित्र म्हटला काय त्या चेरी ब्लॉसमचं कौतुक करायचं.. आपला गुलमोहोर किती सुंदर दिसतो त्यापुढे. अगदी खरं. पुढचे काही दिवस मी येता जाता रस्त्यांवर गुलमोहोर शोधत होतो आणि त्या देखण्या झाडाच्या दर्शनानी सुखावण्याचा पुन:प्रत्यय येत राहीला.
लहानपणी ह्याच गुलमोहराला लटकणा-या तलवारीच्या आकारासारख्या त्याच्या फळानी आम्ही लढाई करायचो. समोरच्याचा वार जर चुकवता आला नाही तर ती बारकी काठीपण जाम लागायची. कधी कधी झाडावर चढून त्याची लालचुटूक फुले खायचो. एकदा असंच चढत असताना सरकन एक सरडा शेजारून निघून गेला. खोडाच्या काळपट रंगात त्याचा रंग मिसळून गेल्याने तो दिसलाच नाही. अजूनही ते आठवलं की अंगावर काटा येतो.
ऑफिसला जायला घराबाहेर पडलो आणि वळणावरच गुलमोहोर दिसला. अरेच्चा!!! कधी लक्षचं नाही गेलं की ह्याच्याकडे. पुन्हा दुसऱ्या वळणावर एक गुलमोहोर. दहा किलोमीटरच्या अंतरात किमान दहा दिसले. काही पूर्ण लाल फुलांनी बहरलेले तर काही अर्धे लाल आणि अर्धे हिरवट. ऑफिसला किंवा कामासाठी शहरातल्या रस्त्यातून जाताना गडबडीत ह्या सुंदर गुलमोहराकडे लक्षचं जात नसावं. त्या दिवशी हायवे वरून जाताना दुसरं काहीच पाहण्यासारखं नसल्यामुळे कदाचित गुलमोहरानी लक्ष वेधलं असावं.
गुलमोहराबाबत अतिपरिचयात अवज्ञI तर होत नसेल ना? पुष्पगुच्छात फुलवाले गुलमोहराची फुले का बरं मिसळत नसावीत? किंवा आपणसुद्धा घरातल्या फुलदाणीत कृत्रिम फुलांऐवजी मुबलक उपलबद्ध असणारी गुलमोहराची फुले का बरं वापरत नाही? १४ फेब्रुवारीला लोक गुलाबाच्या फुलाला दहा-वीस रुपये देण्यापेक्षा छानपैकी गुलमोहराच्या फुलांचा गुच्छ का नाही देत? हा पर्याय अगदीच काही वाईट नाही. नीट पाहिलं नाही कधी पण कदाचित ती फुलं झाडावर लांबूनच छान दिसत असावीत. नाहीतर हा सरळ सोपा उपाय लोकांनी नक्कीच सोडला नसता.
घराला, हॉटेलला गुलमोहोर नाव पाहिलंय. भारी वाटतं एकदम. पण कोणा मुलाचं नाव गुलमोहोर नाही ऐकलं. गुलाब, जाई, जुई, शेवंती (शेवंता) आहे पण गुलमोहोर नाही. कदाचित ते फारचं मोठ वाटेल. त्याचा अपभ्रंश तर अगदीच भुक्कड होईल. गुलमोहरावर कविता पण ऐकल्याचं आठवत नाही.
“शहरसे जा रहा था दोपहर इतनेमे दिखा खुबसुरत गुलमोहर
हटा नही पाया उससे नजर मनमे दौड गयी खुशी की लेहर”
अशा टाईपची कविता गुलजार वगैरेना सुचली नसेल का कधी?