Sunday, July 26, 2009

पुस्तक परिचय (तेलाविषयक)

नुकतीच जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ह्यांची दोन पुस्तकं वाचली. दोन्ही पुस्तकं खूप आवडल्यामुळे त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करत आहे.

१. हा तेल नावाचा इतिहास आहे: काळं सोनं असं ज्याला संबोधलं जातं त्या तेलाचा मनोरंजक इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. अमेरीकेत पहिली तेलविहीर खणल्यानंतर अल्पावधीतच तेलाची मागणी प्रचंड वाढली. अमेरीकेतील उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (थोरले) ह्यांनी सुरु केलेली स्टँडर्ड ऑईल कंपनी, तेलातून मिळालेल्या प्रचंड नफ्यामुळे बलाढय बनली आणि तिची मक्तेदारी निर्माण झाली. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आणि त्यांना ह्या कंपनीवर अंकुश ठेवण्यासाठी काही कायदे निर्माण करावे लागले.

पुस्तकाच्या पूर्वार्धात रॉकफेलर आणि त्यांच्या स्टँडर्ड ऑईल कंपनीची वाटचाल ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. जगाची तेलाची भूक वाढल्यावर इतर देशांमधे तेल उत्खननाचे प्रयत्न सुरु झाले. अमेरीका, इंग्लंड सारख्या मोठमोठ्या देशांतील तेलकंपन्यांमध्ये जिथे जिथे तेलाचे साठे मिळण्याची शक्यता आहे अशा भूभागांसाठी तीव्र चुरस निर्माण झाली. रशियामधे तेलाचे प्रचंड साठे सापडले पण अमेरीकेबरोबर वैर असल्यामुळे पर्यायी तेलसाठ्यांचा शोध सुरु झाला.

इब्न सौद हा पश्चिम आशियातील एका भूभागाच्या (सौदी अरेबिया) टोळीचा म्होरक्या होता. मक्का आणि मदिना ही मुस्लिम धर्मियांसाठीची अतिशय पवित्र ठिकाणं त्याच्या ताब्यात होती. हज यात्रेसाठी येण्यार्‍या भाविकांकडून करापोटी जी रक्कम मिळायची तेच त्यांच्या राज्याचं उत्पन्नाचं मुख्य साधन होतं. पण जागतिक महायुद्धामुळे भाविकांचं प्रमाण कमी झालं आणि इब्न राजाला चांगलाच फटका बसला. असं म्हणतात की त्यावेळी राज्याचा खजिना एका ऊंटाच्या पाठीवर मावेल एवढाच राहिला होता. अशा हलाखीच्या परिस्थितीत, भूगर्भ शास्त्रज्ञांनी सौदीच्या भूमीत तेलाचे प्रचंड साठे आहेत असा निर्वाळा दिला. अमेरीकन तेल कंपन्यांनी इब्न सौदशी पुढील ६० वर्षांचा करार केला (तो २००३ मधे संपला). इथे एक मजेदार किस्सा सांगितला आहे. इंग्लंड आणि अमेरीका दोघेही ह्या इब्न सौदला खुश करण्याचा प्रयत्न करत होते. अमेरीकेनी
एका मोठ्या जहाजावर त्यांच्यासाठी पार्टी ठेवली आणि इंग्लंडने रत्नजडीत रोल्स रॉईस त्यांच्या भेटीसाठी पाठवली. इंग्लंडमधल्या गाड्यांचं स्टिअरिंग उजव्या बाजूला असतं आणि इब्न सौद हे नेहेमी ड्रायवरच्या शेजारीच बसत, मागे नाही. ड्रायवरच्या डाव्या बाजूला बसणं त्यांना अपमानास्पद वाटलं आणि त्यांनी ती गाडी तशीच त्यांच्या भावाला देऊन टाकली. गाडी भेट (लाच) देताना ही साधी गोष्ट इंग्लंडच्या लक्षात आली नाही.

नंतर ह्या पुस्तकात, तेल असण्यार्‍या देशांच्या दोन महत्वाच्या संघटनांची (ओपेक आणि आओपेक) माहिती देण्यात आली आहे. तेलकंपन्यांची मनमानी आणि भाववाढ/घट करताना जिथून तेल उपसत आहे त्या देशांना कसलीही किंमत न देणं ह्याला आळा बसावा ह्या हेतूनं ह्या संघटनांची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला जरी तेलकंपन्यांनी ह्या संघटनांना महत्त्व दिलं नाही तरी काही वर्षातच ओपेकने त्यांच्या नाकी दम आणला. सद्दाम हुसेननी कुवेतवर आक्रमण करुन ते तेलसाठे बळकावयचा सतत प्रयत्न केला त्याचंही वर्णन केलं आहे. सद्दाम जरी अमेरिकेसाठी वाईट असला तरी आंतरराष्ट्रीय परिषदेत त्याने कायम भारताची बाजू घेतली होती हेही लेखकाने नमूद केलं आहे.

पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यात भारताच्या ओएनजीसी ह्या पेट्रोलियम कंपनीचा आढावा घेण्यात आला आहे. के.डी.मालवीय ह्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आज ओएनजीसी उभी आहे. स्वकीयांचा तसेच अमेरिकेसारख्या देशांचा विरोध पत्करून त्यांनी उत्खनन चालू ठेवले त्याचं उत्तम वर्णन लेखकानं केलं आहे. भारत आणि इराणदरम्यान (पाकिस्तानमधून) तेलवाहक पाईपलाईन टाकायचं काम सुरु होणार होतं. आश्चर्य म्हणजे पाकिस्तानकडून मोठ्या मुश्किलीनी आपण परवानगी मिळवली होती पण केवळ अमेरिकेच्या दबावामुळे आपण ते काम थांबवलं.

तेलाचा शोध, त्याची उपलब्धता आणि त्यावरुन खेळलं जाणारं जागतिक राजकारण ह्याचा सुंदर आढावा ह्या पुस्तकात घेण्यात आला आहे.

२. एका तेलियाने: गिरीश कुबेर ह्यांचं पुढचं पुस्तक म्हणजे एका तेलियाने. ह्या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे - शेख अहमद झाकी यामानी . हा माणूस सौदी अरेबियाचा तेलमंत्री होता. उच्चविद्याविभूषित आणि तेलाच्या राजकारणातले बारकावे समजणारा. पुस्तकाच्या मागील बाजूस त्याची सुंदर ओळख करुन देण्यात आली आहे.
" हा आजारी पडला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची. हा प्रसन्न झाला तर अनेक देशांमधे दिवाळी साजरी व्हायची. ह्याच्या भेटीसाठी अनेक देशांचे प्रमुख तासन् तास ताटकळत बसायचे."

अमेरिकेने पश्चिम आशियातील तेलउत्पादक देशांना नेहेमी कमी लेखलं. त्यांना अविकसित समजून त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे ह्या देशांमधे अमेरिकेच्या विरोधात प्रचंड द्वेष निर्माण झाला. ह्या महासत्तेला शह देण्याचं काम लिबियाचे सर्वेसर्वा कर्नल गडाफी आणि यामानी ह्यांनी पद्धतशीरपणे केलं. यामानींचा जन्म १९३० मधे मक्केत झाला. राजे फैजल (इब्न सौद ह्यांचे पुत्र) ह्यांनी त्यांची तेलमंत्री म्हणून निवड केली. ती यामानी ह्यांनी अगदी सार्थ ठरवली. राजे फैझल ह्यांचं यामानींवर स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम होतं. यामानी ओपेक आणि सौदी अरेबिया सरकारचे २५ वर्षं मंत्री होते (१९६२-१९८६). ह्या काळात त्यांनी तेलखात्याचा कारभार अतिशय कुशलतेने सांभाळला.

राजे फैझल ह्यांच्याबद्दलही लिहीलं आहे. टेलिफोन, रेडीओ, टीव्ही, स्त्री-शिक्षण अशा अनेक सुधारणा त्यांनी सौदी अरेबियात आणल्या. अर्थातच त्यांना मुल्ला-मौलवींकडून प्रचंड विरोध झाला. मुलींच्या शाळेची जबाबदारी तर त्यांनी आपल्या पत्नीवरच टाकली होती. यामानी ह्यांच्या प्रत्येक निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला. दोघांमधे गैरसमज नसल्यामुळे राजे फैझल ह्यांचे यामानींविरुद्ध कान कोणीही भरवू शकले नाही. १९७३ मधे झालेल्या तेलसंकटामुळे यामानी सगळ्या जगाला माहिती झाले.

अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्रप्रमुखांनी इब्न सौद ह्यांना शब्द दिला होता की ते इस्त्राईलची बाजू घेणार नाहीत. तो शद्ब मोडून अरब-इस्त्राईल युद्धात अमेरिकेने इस्त्राईलला मदत केली आणि अरब राष्ट्रांमधे अमेरिकेविरोधात संतापाची लाट उसळली. लिबियाचे कर्नल गडाफी ह्यांनी सगळ्या तेल कंपन्यांचं राष्ट्रियीकरण करुन टाकलं. ते फारच आक्रमक आणि अमेरिका-विरोधी होते. तेलाचे भाव एकदम दुप्पट करण्याची मागणी त्यांनी ओपेकच्या मिटींगमधे केली. एकदा तर ओपेकची मिटींग लिबियात भरलेली असताना त्यांनी सगळ्या देशाच्या मंत्र्यांचं अपहरण करण्याची योजना आखली होती. पण यामानींना ह्याचा सुगावा लागला आणि त्यांनी शिताफिने तिथून ग्रीसमधे पलायन केल्याने पुढचा प्रसंग टळला. पण काही दिवसांनी ओपेकच्या सर्व मंत्र्यांचं कार्लोस द जॅकल ह्या कुख्यात दहशतवाद्यानं अपहरण केलं त्याला फक्त यामानी आणि इराणच्या तेल मंत्र्यांना मारायचं होतं. पण परत एकदा यामानींनी शिताफीनी सुटका करुन घेतली.

ह्या पुस्तकात सौदी अरेबिया बरोबरच इराणमधलं सत्ता-स्थित्यंत्तर, पॅलेस्टिनी नेते यासर अराफत आणि जॉर्डनचे राजे हुसेन आणि इस्त्राईल) ह्यांच्यातल्या संघर्षाचं वर्णन आहे. पॅलेस्टिनी बंडखोरांनी जॉर्डनमधे घुसखोरी केली होती आणि तिथून ते इस्त्राईलवर हमला करायचे. ह्या दोघांमधे जॉर्डनची जनता पुरती कावून गेली होती. ह्या पॅलेस्टिनी बंडखोरांची एवढी दहशत होती की एकदा जॉर्डनमधल्या एका पोलिसाची त्यांनी हत्या केली, त्यांचं मुंडकं कापलं आणि त्याचा फुटबॉल करुन खेळले. यामागे जॉर्डनच्या लोकांवर दहशत बसवायचा त्यांचा हेतू होता. शेवटी राजे हुसेन एवढे वैतागले की त्यांनी जोरदार हमला करून जवळपास ५००० बंडखोरांना मारलं. असं म्हणतात की तेव्हा इस्त्राईलनी जेवढे पॅलेस्टिनी बंडखोर मारले नसतील तेवढे राजे हुसेन ह्यांच्या सैन्याने मारले.

ओपेक असो किंवा अमेरिका असो, सगळ्यात जास्त महत्त्व सौदी अरेबियाला. कारण तिथे निघणारं तेल हे इतर ओपेक देशांच्या एकत्र तेलापेक्षा जास्त होतं. त्यामुळं सौदी अरेबियाची पश्चिम आशियातल्या राजकारणात नेहेमी मध्यवर्ती भूमिका राहिली आहे. यामानींनी लिबिया, सिरीया सारख्या माथेफिरू अरब देशांना जवळपास २५ वर्ष कुशलतेने हाताळलं आणि ओपेकला सामर्थ्यवान बनवत गेले. १९७३ च्या ऑईल क्रायसिमधे ओपेक देशांनी उत्पादन कपात २५ टक्क्यांपर्यंत वाढवली आणि पाश्चिमात्य देशांना जेरीस आणले. अमेरीकन लोकांना कधी माहित नसलेल्या तेल-टंचाईला सामोरं जावं लागलं. तेव्हा अमेरिकन गाड्या लिटरला ४-५ किमी धावायच्या. (हॅमर सारखी गाडी तर लिटरला १ किमी देखील धावत नसे) तेल संकटामुळे फ्युएल-इफिशियंट गाड्या बनवणं त्यांना भाग पडलं. (जपान आधीपासूनच अशा फ्युएल-इफिशियंट गाड्या बनवत होता.) ह्या काळात पेट्रोल-पंपावर लांबलचक रांगा लागत होत्या. त्यात परत अमेरिकन लोक रांगेत असताना एक क्षणसुद्धा गाडी बंद करत नव्हते. शेवटी सरकारला एक दिवसाआड पेट्रोल देण्याची सक्ती करावी लागली. (म्हणजे सम आकडा असलेल्या गाड्या एका दिवशी तर विषम नंबर असलेल्या पुढच्या दिवशी). इंग्लंडमधे तर तीनच दिवसांचा आठवडा जाहीर करण्यात आला. घड्याळ दोन तास पुढे करण्यात आलं. त्यामुळे मुलांना सकाळी ७ च्या ऐवजी पहाटे पाचलाच शाळेसाठी निघावं लागे. त्यामुळे अपघात वाढले आणि पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचंच बंद केलं. ह्या काळात यामानींनी प्रमुख देशांचा दौरा केला (फ्रान्स, जपान, इंग्लंड, इत्यादी.) आणि त्यांना विश्वासात घेऊन तुमचा तेल पुरवठा पूर्ववत चालू राहिल असं आश्वासन दिलं. अखेर ओपेक (म्हणजे यामानी) पुढे अमेरिकेला माघार घ्यावी लागली.

यामानींनी नेहेमी तेलउत्पादक आणि तेल कंपन्या/ग्राहक देश ह्यांच्यात समन्वय साधला. इराण, लिबिया तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बॅरल अशी प्रचंड भाववाढ मागत असताना त्यांना शांत ठेवायचं काम यामानींनी केलं. १९७५ मधे राजे फैझल ह्यांची हत्या झाल्यावर (ह्यामागे अमेरिका असल्याचा संशय आहे) सौदीला परत त्यांच्यासारखा दुरद्रुष्टि असणारा राजा लाभला नाही. नव्या राजाचा अर्थातच यामानींवर आकस होता. १९८६ मधे त्यांना टीव्हीवर कळाले की त्यांना तेलमंत्रीपदावरुन काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर सौदीचा र्‍हास सुरु झाला.

तेलातून मिळणारा पैसा किती असावा? असं म्हणायचे की सौदी राजपुत्र एवढे माजले होते की गाडीतला अ‍ॅश ट्रे भरला की ते नवीन गाडी घ्यायचे. पैसा अक्षरशः नाकातोंडात जायला लागला होता. एका सौदी बँकरने सांगितले की त्याच्या स्वतःच्या घरात ५ माणसं आहेत. त्यांच्यासाठी ६ नोकर आणि ९ गाड्या. त्याच्या म्हणण्यानुसार हा अतिपैसा आहे. ह्याची इतकी सवय झाली आहे की उद्या तो नसेल तेव्हा काय करणार?

सध्या यामानी लंडनमधे राहतात आणि तेलाच्या राजकारणापासून दूर झाले आहेत. सौदीच्या नवीन राजाने त्यांना तेलमंत्रीपद स्विकारण्यासाठी आमंत्रण पाठवलं पण त्यांनी नकार कळवला.

जगाच्या राजकारणाचं मध्यबिंदू असणारं हे तेल आणि त्याचा इतिहास अतिशय मनोरंजक आहे. विषय किचकट असूनही गिरीश कुबेरांनी तो सोपा आणि सहज समजेल असा मांडला आहे. इतिहास आणि जागतिक राजकारणाची आवड असणार्‍यांनी ही दोन्ही पुस्तकं जरूर वाचावी.

चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist)

मागच्या आठवड्यात मित्राने झेटगिस्ट (Zeitgeist) नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म पहायला दिली. ही फिल्म २००७ मधे पीटर जोसेफ नावाच्या माणसाने बनवली. झेटगिस्ट एक जर्मन शब्द आहे. ज्याचा डिक्शनरीप्रमाणे अर्थ होतो - the spirit of the time; general trend of thought or feeling characteristic of a particular period of time. जवळपास दोन तासांची ही फिल्म खालील तीन भागात मांडली आहे.

भाग १. आत्तापर्यंत सांगितली गेलेली सर्वोत्कृष्ट कथा (येशूच्या अस्तित्वाचा शोध): पुरातन काळापासून (धर्म अस्तिवात यायच्या आधीपासून), सूर्याला लोक प्रचंड मानतात. सूर्य हा प्रकाशाचा स्त्रोत असल्यामुळे लोकांचं दैनंदिन जीवन तो उगवल्यानंतरच सुरु व्हायचं. झाडं, शेतातील पिकं सूर्यप्रकाश मिळाल्यावरच वाढायची. अर्थातच, त्यामुळे सूर्याला (म्हणजे प्रकाशाला) चांगल्या गोष्टींचं/प्रवृतींचं प्रतीक तर अंधाराला वाईट मानायला सुरुवात झाली. त्यामुळे हळूहळू सूर्याला देवत्व बहाल केले गेलं. अतिप्राचीन इजिप्त संस्कृतीमधे होरसला सूर्यरुपी देव मानत. ह्या होरसशी प्रचंड साधर्म्य असणारे कित्येक देव नंतर इतर संस्कृतींमधे उदयाला आले. अटिस, डायनिसस, मित्रा, येशू, इत्यादि ( ह्यामधे कृष्णाचापण संदर्भ देण्यात आला आहे). ह्या सर्वांमधे साधर्म्य आहे ते म्हणजे - ह्या सर्वांचा जन्म कुमारी मातेपासून २५ डिसेंबरला झाला . ह्या सर्वांना १२ भक्त होते, मेल्यानंतर ३ दिवस पुरण्यात आलं आणि नंतर संजीवनी (resurrection) मिळाली. तसेच ह्या देवांनी केलेल्या चमत्कारांमधे सुद्धा विलक्षण समानता आहे. प्रश्न असा पडतो की २५ डिसेंबरच का? तर २१ आणि २२ डिसेंबरच्या दरम्यान दिवस सगळ्यात छोटा असतो (winter solstice). त्यानंतर साधारण तीन दिवसांनी म्हणजे २५ डिसेंबरपासून दिवस वाढायला सुरुवात होते. म्हणजे (सूर्य देवाचा) प्रकाश वाढायला सुरुवात होण्याचा हा दिवस. त्यामुळेच ह्या सर्व देवांचा जन्म २५ डिसेंबरला दाखवला गेला. ह्या मुद्याप्रमाणेच ओरियन पट्टयामधलया आकाशातल्या तीन तारकांना तीन राजांची उपमा देणे, १२ राशी (म्हणजेच १२ फॉलोअर्स), काही वर्षांनंतर जग संपणार अशी जी ख्रिश्चन धर्मियांमधे धारणा आहे ( तशी ती हिंदूमधेही आहे म्हणा... कलियुगात जगबुडी होणार वगैरे) ते खरं पाहता साधारणपणे प्रत्येक २१५० वर्षांनंतर पृथ्वी एक घर सोडून मागील राशीत जाते अशी संकल्पना आहे. त्यानुसार सध्या मीन राशीत असलेली पृथ्वी काही वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. ह्या स्थित्यंतरालाच लोक जगबुडी मानत आहेत. अशा अनेक फसव्या धार्मिक कल्पनांवर ह्या फिल्ममधे कडाडून हल्ला चढविण्यात आला आहे. येशू होऊन गेला ही तद्दन खोटी गोष्ट असून केवळ मूठभर लोकांनी समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला बनाव आहे आणि येशू ही सरळसरळ होरसची कॉपी आहे असं दाखवण्यात आलं आहे.

भाग २. ११ सप्टेंबर (९/११) चं रहस्य: : ११ सप्टेंबर, २००१ ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर जो हल्ला झाला तो ओसामा बिन लादेन आणि अल कायदानी केला असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या समजाला छेद देणारं सत्य ह्या भागात मांडलं गेलं आहे. अमेरीकन सरकारला ह्या हल्ल्याची पूर्वकल्पना होती. त्यांनी जाणीवपूर्वक विमानं घुसू दिली. पेंटागॉनवर ज्या अतिरेक्याने हल्ला केला त्याला तर नीट विमान चालवताच येत नव्हतं. ७ नंबरच्या बिल्डींगवर विमान हल्ला झाला नसूनही ती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धडाधड कोसळली. हल्ला झालेल्या तीन जागांपैकी दोन जागांवर कुठेही विमानाचे अवशेष सापडले नाहीत. एका फुटेजमधे तर विमान बिल्डींगच्या अगदी जवळ येतंय आणि ते धडकायच्या आतच खालच्या एका मजल्यावर स्फोट होताना दाखविला आहे. लादेनचं फुटेज - ज्यात त्यानी ह्या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली - त्यातला लादेन हा बहुरूपी असून त्याच्या आणि खर्‍या लादेनमधले ठळक फरक सांगितले आहेत. ह्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी जी समिती बसवण्यात आली तिचा अध्यक्ष बुशच्या मर्जीतलाच होता. चौकशी समितीला बुशनी उडवाउडवीचीच उत्तरं दिली. ह्या सगळ्याचं चित्रीकरण करायला प्रसारमाध्यमांना बंदी घातली गेली. ९/११ चौकशी समितीच्या अहवालाची प्रत पहायची परवानगी नाकारण्यात आली.

प्रश्न असा पडतो की अमेरिकेला असं करुन काय मिळालं? तर अमेरिकेला अफगाणिस्तानमधे शिरकाव करता आला. त्यायोगे ह्या तेलपिपासू राष्ट्राला सिरीया आणि इराण ही तेलसंपन्न राष्ट्रे ताब्यात घेता येतील (इराक वर तर अगोदरच कब्जा झाला आहे).

भाग ३. पडद्यामागचे खरे सूत्रधार: ह्या भागात अमेरीकेचा थोडासा इतिहास - इंग्लंड मधून कॉलनीज वेगळं व्हायचं कारण - सांगितला आहे. (इंग्लंडच्या राजाने जेव्हा ह्या कॉलनीजचं चालू चलन रद्द करुन स्वतःचं चलन व्याज आकारुन देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा असंतोष पसरुन ह्या कॉलनीजनी बंड केलं.) फेडरल रिझर्व बँक ही अमेरीकेतील मुख्य बँक आहे (जशी आपली रिझर्व बँक ऑफ इंडिया). ही बँक पूर्णपणे खाजगी असून सरकारचं तिच्यावर अजिबात नियंत्रण नाही. ही बँक सरकारला चलन पुरवते. प्रत्येक चलनामागे ती विशिष्ट व्याज आकारते. ह्याचा अर्थ जेव्हा सरकार बँकेकडून पैसे घेते तेव्हाच ते कर्जबाजारी झालेलं असतं. मग हे कर्ज फेडणार कसं? तर त्यासाठी परत बँकेकडूनच पैसे घ्यायचे. अशा रितीने सरकार बँकेच्या कर्जाच्या विळख्यात अडकत जाते. मग बँक पैसा कुठुन मिळवते? युद्ध हा बँकेसाठी कमाईचा सर्वात फायदेशीर मार्ग आहे. पहिले आणि दुसरे महायुद्ध, व्हिएतनामचे युद्ध ह्यामधे भाग घ्यायला सरकारला सरकारला भाग पाडलं. गंमत म्हणजे बँक दोन्ही पक्षांना शस्त्रे वगैरे खरेदी करायला पैसे (उदा: जर्मनी आणि अमेरीका) उधार देत असे. व्हिएतनामचे युद्ध तर मुद्दामच लांबवलं गेलं आणि त्यायोगे बँक पैसा कमवत गेली. बँकेच्या धोरणांना विरोध करणारे काँग्रेसमन लुईस मॅकफेडन ह्यांची हत्या झाली. फिल्ममेकरच्या मते बँक लोकांकडून आकारत असलेला उत्पन्नावरचा करसुद्धा बेकायदेशीर आहे.

शेवटी असं दाखवलं आहे की ह्या लोकांचा जगभरात एकछ्त्री सरकार स्थापन करण्याचा इरादा आहे. उत्त्तर अमेरीका, युरोप, आफ्रिका आणि एशिया अशा चारही खंडाना एकत्र करुन सगळ्या जगावर सत्ता गाजवण्याचं ह्यांचं स्वप्न आहे. सगळीकडे एकच चलन असेल (कॅनडा, मेक्सिको आणि अमेरीकेनी २००५ मधे एक गुप्त ठराव करून त्याद्वारे अमेरो नावाचं एक कॉमन चलन काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणालाही विशेष माहिती नाही. ) आणि प्रत्येकाच्या शरीरात आरएफआयडी चिप बसवण्यात येईल आणि त्यायोगे कोण कुठे केव्हा काय करत असेल हे सगळं ट्रॅक करता येईल. जो विरोधात जाईल त्याची ही चिप बंद करण्यात येईल आणि त्यायोगे त्याचा जगाशी संपर्कच तुटेल. धर्म, राष्ट्रभक्तीच्या नावाखाली हे लोक सगळ्यांमधे फूट पाडून त्यांच्यावर अंमल गाजवत आहेत.

अतिशय स्फोटक अशी ही डॉक्युमेंटरी फिल्म असं सांगून जाते की एखादी (खोटी) गोष्ट तुमच्या मनावर सतत बिंबवली की तुम्हाला ती खरी वाटायला लागते. शिक्षणाचा दर्जा सुधारावा असं सरकारला अजिबात वाटत नाही कारण जर लोक सुजाण झाले तर ते ह्या सगळ्याला विरोध करतील. त्यामुळे सगळा भर हा मनोरंजन उद्योगाकडे देण्यात येत आहे.

झेटागिस्ट अ‍ॅडेंडम अशी पुढचा भाग निघाली आहे. पण मी तो अजून पाहिली नाही. कोणी पाहिली असल्यास त्याबद्दल जरूर माहिती द्यावी.

(ह्या लेखातील विचार माझे नसून फिल्ममधे काय मांडलं आहे ते येथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.)