Friday, June 20, 2008

मौशुमी

लाइट गेले, त्यामुळे पंखा बंद झाला आणि पंखा बंद करायचं अन मला जाग यायचं स्विच एकच असल्यासारखं मी खाडकन झोपेतनं जागा झालो. खोलीत चांगलाच उजेड दिसला. हात लांब करुन मोबाईलवर किती वाजले ते पाहिलं. ०९:०० अस दिसताच शिSSSSट अस जोरात ओरडुन पांघरुण बेडच्या दुसर्‍या कोपर्‍यात भिरकावुन दिलं. झोपेतनं नुकतच उठल्यावर बहुतेक वेळा आवाज जड असतो. तो इफेक्ट जायच्या आत बॉसला फोन लावला. बर वाटत नाहीये, त्यामुळे ऑफिसला थोडासा उशीरा येईन अस त्याला सांगितलं. लाइट गेल्यामुळे गिझरचा काही उपयोग नाही. त्यामुळे गार पाण्याने पटकन आंघोळ उरकली. बरं वाटत नाहीये अशी थाप मारली खरी पण ह्या गार पाण्यानी खरचचं आजारी पडायचो असा विचार करत घराबाहेर पडलो.

ऑफिसमधे पोहचेस्तोवर १२ वाजुन गेले होते. डेस्कजवळ आल्यावर पाहिलं तर माझ्या जागेवर एक मुलगी बसली होती. अरे मी चुकुन दुसर्‍याच फ्लोअरला आलो की काय असा विचार करत होतो तेवढयात बॉसनी मागुन येऊन पाठीवर थाप मारली. काय हिरो बर वाटतय का आता? मी आवाज शक्य तितका खोल नेत म्हणालो हां.. ठीक आहे आता. ओके.. मौसमी अशी त्याने माझ्या जागेवर बसलेल्या मुलिकडे बघुन हाक मारली. येस सर अस म्हणत ती पटकन उभी राहिली. ती सर म्हणाल्यावर मी लगेच ओळखलं की ही नक्कीच फ्रेशर आहे. ये अनिश है और अनिश ये मौसमी.... आजसे ये हमारे टीम मे काम करेगी. मग बॉसने तिला काय काय माहिती द्यायची आहे, तिला काय काय येतं ह्याची कॅसेट वाजवायला सुरुवात केली. ओके, आय नो, गॉट इट, आय विल टेक केअर ऑफ इट अशी समारोपाची वाक्यं टाकुन सुद्धा काही उपयोग झाला नाही. शेवटि ए आणि बी अशा दोन्ही साइडची कॅसेट वाजवुन मगच त्याने आमचा पिच्छा सोडला.

मग मी वळुन तिच्याकडे नीट पाहिलं. एकदम टपोरे डोळे होते तिचे. मी तिला बस म्हणालो आणि पलिकडची एक रिकामी खुर्ची ओढुन स्वत:साठी घेतली. मला पटकन तिचं नावच आठवेना. स्वत:चा खुप राग आला. सॉरी आय फरगॉट युअर नेम...मी खजिल होत म्हणालो. ओह.. नो प्रॉब्लेम, मायसेल्फ मौशुमी... अस म्हणत तिनी हात पुढं केला. ते "मौशुमी" ती इतकं छान म्हणाली की बास......... मग हा बॉस मौसमी काय म्हणतो तिला. ते अगदी "मोसमी वारे"तलं मोसमी वाटतं. बरं झालं मी हिला नाव विचारलं; नाही तर मी पण येडछाप सारखं तिला मौसमी म्हणालो असतो. है शाब्बास असं मनाशी म्हणत मी स्वत:ची पाठ थोपटुन घेतली आणि आपला बॉस हा एकदम भुक्कड आहे ह्याची परत एकदा खात्री पटली. "मायसेल्फ अनिश" शक्य तेवढया स्टाइलने म्हणण्याचा प्रयत्न केला.

फार काळ इंग्लिशमधे बोलावं लागलं की मला गुदमरल्यासारखं होतं. "आपको शिफ्ट मे आना पडता है क्या?" असं विचारुन तिनीच माझी सुटका केली. "अरे नही नही.... आज थोडा बीमार था, इसलिये लेट आया." तेवढयात तिचा मोबाइल वाजला. एक्सक्युज मी म्हणत तिनी फोन घेतला. "हां आई पोहोचले मी ऑफिसमधे वेळेवर. हो हो काहीच प्रॉब्लेम नाही आला. आई मी जरा कामात आहे. लंच-ब्रेक मधे करीन फोन. ओके? चल बाय.." अस म्हणत तिनी फोन ठेवला. च्या मारि... ही तर मराठी आहे की. छातीवरुन एकदम इंग्लिशचं दहा आणि हिंदीचं पाच किलोचं वजन उतरल्यासारखं वाटलं. ती माझ्याकडे बघुन हसली. संभाषणाची गाडी परत हिंदी/इंग्लिशकडे जाण्याआधी मी पटकन विचारलं "कुठे रहाता तुम्ही?"
"औंधला!"
"अच्छा!!! मग ऑफिसला कशा येता? वायुने?" (आमच्या ऑफिसच्या बसचं नाव वायु आहे)
"नाही पीएमटीने. सोमवारपासुन येणारे वायुने."
"ओह... आय सी". मग मी तिला प्रोजेक्टची थोडी-फार माहिती दिली. कामाचं स्वरूप समजावलं. तिला काय काय शिकावं लागेल ते पण सांगितलं. हे सगळं ती तिच्या काळ्याभोर,टपोर्‍या डोळ्यांनी माझ्याकडे पहात लक्षपुर्वक ऐकत होती. त्यामुळे मला दडपण आल्यासारखं होत होतं. दहा-पंधरा लोकांसमोर प्रेझेंटेशन देताना येतं तसं टेन्शन यायला लागलं होतं मला. कधी एकदा हे ज्ञानदानाचं कार्य संपवुन संभाषणाची गाडी परत इन्फॉर्मल टॉकवर नेतो असं झाल होतं. तेवढयात बॉसनी तिला बोलावलं. मग टीममधल्या इतरांशी ओळखी, राहिलेलं डॉक्युमेंट सबमिशन, इंडक्शन ह्यातच तिचा उरलेला दिवस गेला. जाताना मला आवर्जुन बाय करुन गेली. मी ऑफिसमधे बारा वाजता उगवल्यामुळे नेहेमीसारखं सात वाजता निघणं काही बरोबर दिसलं नसतं.

आम्हाला दोघांना एकाच मॉडयुलवर काम करायचं असल्यानं तिला माझ्या शेजारचाच पीसी मिळाला. थोडयाच दिवसात माझ्या लक्षात आलं की मौशुमी खुप बडबडी आहे. एकदम छान टयुनिंग जमलं आमचं मग. एकदा असचं बोलता बोलता तिला म्हणालो "पहिल्यांदा तुझ्या नावावरुन मला वाटलं की तु बंगालीच आहेस. पण तुला तुझ्या आईशी बोलताना ऐकलं तेव्हा कळालं की तु मराठी आहेस ते." त्यावर माझ्याकडे रोखुन पहात ती म्हणाली "अरे मी अर्धवट आहे."
"म्हंजे?"
"म्हणजे मी अर्धी बेंगॉली आणि अर्धी मराठी आहे. माझे पपा बेंगॉली तर ममी मराठी आहे. लव मॅरेजे त्यांचं.. मग झाले की नाही मी अर्धवट." डोळे मिचकावत ती म्हणाली.
"तुझ्या ह्या असल्या लॉजिकनी मला तर पुर्णचं वेडा म्हणावं लागेल." ह्यावर ती एकदम खळखळुन हसली. "यु आर टु मच ऍनी!!!" ऍनी........वा काय मस्त शॉर्टफॉर्म केलाय माझ्या नावाचा. नाहीतर माझे आई-बाबा. बाबा अन्या म्हणतात (एकदम चमन वाटतं ते) तर आई त्याच्यापेक्षा भारी नावानी हाक मारते - "अनु" म्हणुन. किती वेळा सांगितल आईला की ते मुलीचं नाव वाटतं. पण त्यावर तिचं एकच ठरलेलं उत्तर "तुम्हा मुलांना नाही कळणार आईचं प्रेम कधी". आता काही तरी संबंध आहे का त्याचा प्रेमाशी? पण आईला कोण समजावणार?

एक दिवस माझ बॉसशी कडाक्याचं भांडण झालं. माझा एकदम मुडच गेला मग. मी उदासपणे कॅंटीनमधे बसुन चहा पित होतो. तेवढयात मौशुमी आली. माझा उतरलेला चेहेरा पाहुन म्हणाली "काय रे तुझा असा रामदीन का झालाय?"
"रामदीन? म्हंजे?"
"अरे कोणी असा दीनवाणा किंवा बापुडा चेहेरा करुन बसलं की आम्ही त्याला रामदीन किंवा दिनदयाळ म्हणतो." मला मनापासुन हसु आलं.
"बरं काय झालं ते पटकन सांग बघु." मग मी तिला काय झालं ते सगळं सांगितल.
"एवढच ना? मग त्यात इतकं उदास व्हायला काय झालं? झालं गेलं विसरुन जा आता. पहिले तुझा मोबाइल स्विच ऑफ कर. गोविंदाचा एक धमाल पिक्चर आलाय. तो पहायला जाऊ. उद्याचं उद्या पाहु. मला काहीही कारणं नकोयेत तुझी." मग आम्ही तो पिक्चर पाहिला. एकदम दिलखुलास हसत होती ती प्रत्येक जोकला. माझा पण मुड एकदम फ्रेश झाला. पिक्चर संपल्यावर म्हणाली "चल आता मी तुला कलकत्त्याला नेऊन आणते."
"म्हंजे?"
"चल रे तु फक्त. प्रश्नच फार असतात तुझे."
ती मग मला चतुश्रुंगी पासल्या 'राधिका' नावाच्या बंगाली मिठाईच्या दुकानात घेऊन गेली. मी रसगुल्ले खाल्ले होते आधी पण तिनी मला 'खीरकदम' आणि 'संदेश' खाऊ घातले. खीरकदम तर जाम आवडलं आपल्याला. एकदम टकाटक मुड झाला मग माझा. शेवटी जाताना मी तिला थॅंक्स म्हणालो. त्यावर म्हणाली "अरे थॅंक्स नको म्हणुस. आता माझा जर कधी मुड गेला तर तुला पण माझ्यासाठी असचं काहितरी करावं लागेल."

पण तिनी तशी संधी कधी दिलीच नाही मला. कायम उत्साही आणि आनंदी असायची ती. एके दिवशी ऑफिसमधे यायला मला परत एकदा उशीर झाला. पाहतो तर काय मौशुमी बॉसला खुप बोलत होती. तु वेळेत काम पुर्ण करत नाहीस. जबाबदारी घेत नाहीस असं काहितरी बोलला तिला तो. त्यावरुन हे जोरदार भांडण चालु होतं. बॉस मात्र आत्ता काहीच बोलत नव्हता तिला. मला एकदम आश्चर्य वाटलं. आम्हाला कायम धारेवर धरणारा हा माणुस तिचं मात्र शांतपणे ऐकुन घेत होता. दुसर्‍या दिवशी तो ऑफिसला आलाच नाही. संध्याकाळी समजलं की त्याचा चार वर्षॉंचा मुलगा अचानक गेला म्हणुन. लगेच आम्ही त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो आणि हॉलच्या कोपर्‍यात मान खाली घालून चुपचाप बसलो. हळुच एकदा मान वर करुन पाहिलं - रडुन रडुन बॉसच्या बायकोचे डोळे सुजले होते. बॉस तर एकदम उध्वस्त झाल्यासारखा दिसत होता. तेवढयात मौशुमी उठली आणि सगळी सुत्र तिनी हातात घेतली. जे कोण लोक भेटायला येत होते त्यांच्याशी जुजबी बोलणं, कोणाला काय हवं नको ते बघणं, लॅंडलाइनवर आलेले फोन घेणं हे सगळं ती न सांगता हॅंडल करत होती. निघताना तिनी बॉसला सांगितल की तुम्ही एवढयात येऊ नका ऑफिसला. आम्ही सर्व हॅंडल करु. नंतरचे जवळजवळ दहा बारा दिवस ती सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत ऑफिसमधे थांबायची. सगळ्यांशी कोऑर्डिनेट करुन बॉसची बर्‍यापैकी कामं/जबाबदार्‍या सांभाळल्या तिनं. तिच्या स्वभावातली ही दोन्ही टोक पाहुन मी अवाक झालो.

चांगल्या माणसांच्या सहवासाला अल्पायुषी असण्याचा शाप असावा बहुदा. काही दिवसांनी तिच्या घरच्यांनी कलकत्त्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. तिलाही त्यांच्यासोबत जाणं भाग होतं. ऑफिसमधे सेंड-ऑफच्या वेळी तिचा सगळ्यात चांगला मित्र म्हणुन मला दोन शब्द बोलायला सांगितल बॉसनी. "मौशुमी थॅंक्स फॉर एव्हरीथिंग" एवढच बोलु शकलो मी. निघताना सगळ्यांचा निरोप घेऊन शेवटी ती माझ्या इथे आली. माझा चेहेरा पाहुन म्हणाली "आता परत तुला रामदीन म्हणायला नको लाऊस हां...". तिला जाताना पाहुन नकळत डोळ्यांतुन पाणि आलं. तिनी जर मला अस रडताना पाहिल असतं तर कोणत नाव दिलं असतं ह्याचा विचार करुन मला एकदम हसु आलं.

Wednesday, June 18, 2008

एक छोटीशी सकाळ

झेलम एक मोठी सुटकेस, एक हॅंडबॅग आणि सामानाने तुडुंब भरलेली कॅरीबॅग कशीबशी सावरत बसमधुन उतरली. चरफडत तिने आजुबाजुला पाहिले. पण कुठेही अमरचा पत्ता नव्हता. पुणं जवळ आल्यापासुन ती त्याला सारखा फोन लावत होती. पण हा बाबा फोन उचलेल तर शपथ. निदान दहा वेळा तरी याला सांगितलं होत की मी पाच-साडेपाचपर्यंत येईन पुण्यात . तेव्हा वेळेवर न्यायला ये मला. आधीच तिची झोप नीट झाली नव्हती. तिला बसमधे कधीच नीट झोप लागत नाही. याउलट अमर बस सुरु झाली की लगेच डुलायला(डुलकी घ्यायला)लागतो आणि कंडक्टर यायच्या आत गाढ झोपुन पण जातो. मग तिकीटं काढणं, मॅडम सुट्टे द्या असं कंडक्टरनी सांगितल्यावर सुट्टे पैसे पर्समधुन शोधणं ही सगळी कामं नेहमी तिलाच करावी लागायची. मधे कुठल्या स्थानकावर गाडी थांबली की मग ह्याला जाग यायची. "तु खाली जाणार असशील तर प्लीज माझ्यासाठी लेज घेऊन ये ना." त्याला पक्कं माहीती असतं की मी खाली जाणारच आहे. जरा कुठे जबाबदारीची जाणीव नाही ह्या माणसाला. बर ह्याने कुंभकर्णासारख्या झोपा काढल्यावर मी काय करायचं? बसमधे काही वाचता येत नाही. वॉकमन बरोबर घ्यायचा मी प्रत्येक वेळी विसरते. खिडकीपाशी बसाव म्हटल तर ते ह्याला चालत नाही. कारण काय तर साहेबांना वार्‍याशिवाय झोप येत नाही.

नुसती चिडचिड होत होती तिची. त्यात आता ट्रॅव्हल कंपनीवाले तिच्या मागे लागले. "मॅडम कुठे जायचय? दादर, अंधेरी, बोरीवली? बसपेक्षा कमी रेट मधे... व्हिडीओ कोच आहे मॅडम". "नकोये..... अरे मी आत्ताच मुंबईहुन आलीये. परत कशाला जाऊ तिकडे?" ती तिरसटुन बोलली. ते ऐकल्यावर पटकन एक-दोन रिक्षावाले आले. "मॅडम कुठे जायचय? या ना इकडे." तिला आता बोलायची पण इच्छा होत नव्हती. मग तिने हातानीच नको अशी खुण केली. एक नवरा सोडुन बाकी दुनियेला माझी काळजी आहे. एक क्षण तिला वाटुन गेलं की रिक्षा करून जाव पटकन. पण तिला आठवल, मागच्या वेळी रिक्षावाल्याने ऑड वेळ म्हणुन मीटरपेक्षा जास्त भाड घेतल होतं. ते जवळपास मुंबईच्या भाडयाएवढच पडल होतं. त्यामुळे तिनी तो विचार एकदम झटकुन टाकला. मग सुटकेस उभी करुन त्याल ती जरा टेकली. पर्समधुन मोबाईल काढला आणि परत अमरला फोन लावला. पुर्ण वेळ रिंग वाजली पण फोन काही उचलला नाही. तिला आठवल, लग्नाआधी एकदा सकाळीच दोघांना सिंहगडला जायचं होतं. त्यावेळी एकदम ऑन-टाईम आला होता पठ्ठया. माझा पोलो नेकचा टीशर्ट सापडत नव्हता म्हणुन मला फक्त पंधरा मिनिटं उशीर झाला तर सारखं घडयाळ दाखवत होता मला. "तुझं मॅचिंगच सगळं सापडलं नसेल म्हणुनच उशीर झाला तुला. लोक सिंहगड पहायला येणारेत, तुला नाही." त्याला टीशर्टचं कारण काही शेवटपर्यंत पटलचं नाही. लग्नाआधी अगदी काळजीवाहु सरकार होता. (हा त्याचाच आवडता शब्द).

तिला आठवलं, पावसाळ्यात एकदा गाडी घसरल्यामुळे तिच्या पायाला हेअर-क्रॅक गेला होता. तेव्हा हे महाशय जवळजवळ वीस दिवस रोज तिला घरुन ऑफिसमधे आणि ऑफिसमधुन घरी पोहोचवायचे. त्याला ती म्हणाली सुद्धा "अरे मी जाईन रिक्षाने, कशाला एवढा त्रास घेतोस!!!" त्यावर "मी तुझा जिन आहे. तु फक्त काम सांगायचं, मग मी - जो हुकुम मेरे आका - म्हणुन तुझी सगळं काम ऐकणार." असं त्याच उत्तर. तिला आवडतो म्हणुन त्या दिनो मोरेआ चे जवळजवळ सगळे पिक्चर त्याने तिच्यासोबत (एरंडेल पिल्यासारखा चेहरा करून का होईना) पाहिले.

पण आता? एक काम वेळेवर करेल तर शपथ. दहा वेळा ह्याच्या मागे लागल्यावर कुठे काम मार्गी लागतं. शक्य तितकी काम माझ्यावर ढकलणं हेच एक मोठ्ठ काम करतो हा बाबा. लग्न करुन हक्काची कामवालीच आणलिये जशी काही ह्यान. स्वत: कसही वागल तरी चालेल पण मी मात्र कायम आदर्श पत्नी सारखचं वागल पाहिजे. आता ह्यानी फोन केला आणि चुकुन जरी मला नाही घेता आला तर हा आकाशपाताळ एक करणार. शी वैताग आहे नुसता. विचार करुन करुन तिचं डोक दुखायला लागल होतं आता.

"हाय लेझीम!", गाडीचा हॉर्न आणि हाक दोन्ही एकदमच ऐकु आले. मी त्राग्यानी समोर पाहिलं तर अमरच होता. कधीही झेलम अशी सरळ हाक मारणार नाही. आई-बाबांनी इतक सुंदर आणि वेगळ नाव ठेवलं माझं. बारशाच्या वेळी आत्तुला आधीच सांगुन ठेवल होतं त्यांनी की झेलमच नाव ठेवायच माझं म्हणुन. कॉलेजमधे असताना काळे मॅडम नेहेमी म्हणायच्या खुप छान नाव आहे ग तुझं. लग्नानंतर अजिबात बदलु नकोस. तस मी अमरला आधीच सांगुन ठेवल होतं की नाव बदलु नकोस म्हणुन. त्याला मात्र तांदळात नाव लिहायची फार इच्छा होती. त्यामुळे त्याच सारखं चालायच की मी नाव बदलणार म्हणुन. मी म्हणायचे की अडनाव बदलणार आहे ना मी... आणि ते तांदळात लिहायची एवढी हौस असेल तर माझं आत्ताचच नाव लिही. त्यावर म्हणायचा त्यात काय थ्रिल आहे मग? तेव्हा नाव बदलु दिलं नाही म्हणुनच सारखा लेझीम म्हणतो. हां...फक्त चिडतो तेव्हा झेलम अशी सरळ हाक मारतो.

आत्ता त्यानी लेझीम हाक मारल्यामुळे तिनी मुद्दामच दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग त्याला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं असावं. गाडी पटकन स्टॅंडवर लाऊन तिच्याकडे गेला. "अग सॉरी, काय झालं की..." "राहु दे तुझी कारणं तुझ्यापाशीच. मी जाते रिक्षानी." त्याचं वाक्य मधेच तोडत ती म्हणाली. त्यावर काहीच न बोलता त्यानी पटकन सामान उचललं, गाडीवर नेउन ठेवलं आणि तिच्या बाजुला शांतपणे उभा राहिला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग तिनी हळुच त्याच्याकडे निरखुन पाहिलं. दमल्यासारखा दिसत होता. अरे ह्याचे हात पण काळे झालेत की..ती मनाशी म्हणाली. "का उशीर झाला?" अस तिनी विचारल्यावर त्यानी पण हळुच (आणि सावधपणे) पाहिलं तिच्याकडे. "मी घरातुन पाचलाच बाहेर पडलो होतो. पण त्या रतन भेळेपाशी गाडी पंक्चर झाली. आता एवढया सकाळी कुठलं दुकान उघडं मिळणार? मग थेट बोराच्या पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेली. तिथल्या त्या केरळी अण्णाला उठवल झोपेतुन. म्हटल अर्जंट पंक्चर काढुन दे. तुला फोन करावा म्हणुन मोबाईल काढायला खिशात हात घातला तेव्हा लक्षात आलं की गडबडीत मोबाईल घरीच विसरलो. मग अस वाटल की कदाचित तुझी गाडी अर्धा पाऊण तास लेट होईल. कारण मागच्यावेळी एकदा लोणावळ्यालाच खुप वेळ थांबल्यामुळे गाडीला पुण्यात यायला लेट झाला होता ना. खर तर मी तुला एखाद्या एसटीडी बुथपाशी थांबुन फोन करायला पाहिजे होता. पण.." ती त्याच्याकडे बघुन प्रसन्नपणे हसली आणि पाठीवर थोपटत म्हणाली "इट्स ओके. चल मला चहाची खुप तल्लफ आलिये. मला 'तुलसी'तला चहा प्यायचाय." त्यावर एकदम खुष होत तिच्या काळजीवाहु सरकारने "जो हुकुम मेरे आका" अस म्हणत गाडीला किक मारली.

Tuesday, June 10, 2008

बॉलिवूड मधले हिरो

चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही. पण जेवढया वेगाने अभ्यासातला रस संपत गेला तेवढयाच, किंबहुना जरा जास्तच, वेगाने चित्रपटातला रस वाढत गेला.

माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते.

राज कपूर बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचा संगम हा चार तासांचा चित्रपट मी प्रत्येक वेळी दोनच तास पाहू शकलो. राम तेरी गंगा.. हा चित्रपट पाहुन तर त्याच्याविषयीचा आदर एकदमच दुणावला.

दिलीप कुमारचा सौदागर हा एक चित्रपट पाहिल्याचं आठवतं. ती वेळ खरं तर त्याची वानप्रस्थाश्रमाकडे जायचीच होती. पण नंतर त्याचा मुकुल देव (हे नाव पण आठवत नसेल तुम्हाला)आणि ममता कुलकर्णी (हि वाटयाला आलेल्या कमीत कमी भुमिकेत जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करून मिळालेल्या संधीचं सोनं करायची) सोबत किला (म्हणजे मराठीतला किल्ला) नामक प्रचंड टुकार चित्रपट आला . आपल्या सुदैवाने नंतर त्याने लवकरच चित्रपट संन्यास घेतला.

धर्मेंद्र हा एक बर्‍याच काळापासून दर्शन देत आलेला आहे. तो आधी खरोखरच देखणा दिसायचा. पण आता तो एकदमच खप्पड दिसतो. धर्मेंद्र आणि "कुत्ते कमीने" संवादाचं एकदम पक्कं समीकरण बनल आहे. मला वाटतं गांधीजी मरताना जसे "हे राम" म्हणाले होते तसे धर्मेंद्र मरतानाही "कुत्ते कमीने" म्हणूनच शेवटचा श्वास घेईल. त्याचा एक चित्रपट आठवतो ज्यात त्याने दोरखंडाच्या सहाय्याने एक विमान रोखून धरल होतं. अशा अनेक अतर्क्य गोष्टी त्याने चित्रपटात केल्या आहेत.

जितेंद्र हा त्याच्या पांढर्‍या बुटांमुळे लक्षात राहिला. त्याच्या विशिष्ट प्रकारच्या नाचण्यामुळे त्याला "जंपिंग जॅक" म्हणायचे. त्याने मात्र प्रेक्षकांना फार काळ त्रास दिला नाही. त्याचा उधार की जिंदगी हा शेवटचा चित्रपट होता (ज्यामधे काजोलने पदार्पण केल होतं). बहुदा नंतर त्याला कोणी कामच दिल नसावं. नंतर त्याने त्याच्या मुलाला तुषार कपूरला आणुन चांगलाच सूड उगवला.

मध्यंतरी मिथुन चक्रवर्तीचे प्रत्येक वर्षी नियमितपणे बी-ग्रेड चित्रपट यायचे. अगदी इथुन तिथुन मिथुनच दिसायचा. त्याला म्रुगया आणि अग्निपथ ह्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं ह्यावर विश्वासच बसत नाही. त्याचे काही संवाद एकदम भन्नाट असायचे. उदाहरणार्थ: "तेरे नाम का कुत्ता पालू", "तेरी जात का बैदा मारू","तेरी आपडी की टोपडी","दिखने मे बेवडा... भागने मे घोडा... और मारने मे हथोडा"

नाना पाटेकरचे तिरंगा, क्रांतीवीर हे चित्रपट मात्र एकदम आवडून गेले। "ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून" वाल लॉजिक एकदम पटुन गेलं. त्याचा तो आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा आणि त्याला मिळालेली बेफिकीर व्रुत्तीची जोड ह्या सगळ्यानी मनाचा ताबाच घेतला. नंतर त्यानी स्वत: दिग्दर्शित केलेला प्रहार हा देखील त्याच्या वेगळेपणामुळे लक्षात राहिला.

नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.)

नंतर नंतर सनी देओलचा फनी देओल होत गेला. गदर मधे तर तो अक्षरश: जमिनीतून बोअरिंग उचकटून १०-५ लोकांना त्याने मारताना दाखवला आहे. त्याच्या हाणामारी आणि संवादांमधे तोचतोचपणा येऊ लागला. ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली.

मन उधाण वार्‍याचे......

हे गाण जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा अस वाटत की मन खरोखर आपल्याच मस्तीमधे धुंद होऊन, बेभानपणे झुलतय...

इतक्या ठिकाणी ह्या मनाबद्दल ऐकतो/वाचतो की कधी कधी अस वाटत की हे मन आपल्या शरीराचा एक भागच आहे. पण विचार केल्यावर लक्षात येत की ह्रदय म्हणजे काही मन नाही. ह्रदयाला स्पंदन असतात. एका मिनीटामध्ये अमुक अमुक ठोके पडले की समजायच सगळ आलबेल आहे. हे ह्रदय तर मला घडयाळाच्या लंबकासारख वाटत. विशिष्ट गतीन सतत ठोके देत असत. ह्रदयाला मनासारख उधाण होऊन चालत नाही.


मला वाटतं, सर्वप्रथम मनाची ओळख समर्थ रामदास स्वामींनी करून दिली. लहानपणी "मनाचे श्लोक" वाचताना मन म्हणजे नक्की काय हे खचितच कळल नव्हतं. पण जवळ जवळ प्रत्येक श्लोकामध्ये मन हेच कर्ता होतं आणि बहुतेक वेळा "मना" ला "सज्जना" हाच शब्द जोडुन यायचा. त्यामुळे मन ही काहीतरी सरळमार्गी गोष्ट असून तिच्यावर खुप मोठया जबाबदार्‍या आहेत अस माझं मत बनल होत. तेव्हा तरी उधाण मनाशी ओळख झाली नव्हती.

नंतर शाळेमध्ये बहीणाबाईंची "मन वढाय वढाय" अशी एक कविता होती. त्या कवितेतून मनाच्या स्वछंदीपणाची पहिली ओळख झाली. मन "मोकाट","लहरी" आणि "पाखरू" सुद्धा असू शकतं हे त्या कवितेतून कळल.

अस हे मन नंतर वेळोवेळी भेटत राहिलं. "मनासारखं न होणे","मनसुबे रचणे","मनात मांडे खाणे","मनाला येईल तसे वागणे/बोलणे", "मनमुराद हसणे","मनकवडा" अशा अनेक वाक्प्रचारातुन मनाचे संदर्भ येत राहिले.

मनाला सैरभैर,बेफाम,अवखळ अशी विशेषणं जास्त शोभून दिसतात. वेळप्रसंगी त्याला शांत, संयमी, खंबीर अश्या प्रौढ भुमिका पार पाडाव्या लागतात. पण हे त्याच्यावर ओढुन-ताणुन घातलेलं आवरण असतं. गंभीर भुमिकेत असतानाही ते उसळू पहातं, मर्यादा तोडू पहातं.

जेव्हा गाडी प्रेमावर येते तेव्हा मात्र बहुतेक वेळा ह्रदयच बाजी मारून जातं. प्रेमात ह्रदयांचीच देवाणघेवाण होताना दिसते; मग अशा वेळी मन कुठे असते? बहुदा ह्रदयाला स्पंदनाबरोबर वेळ पडली तर दुसर्‍या ह्रदयात स्थलांतर करण्याची सुद्धा कामगिरी नेमून दिलेली असावी. तरीदेखील, ह्रदय मोजुन मापुन बेफ़ाम होतं. सामान्य अवस्थेत असताना जेवढे ठोके पडत असतील त्यापेक्षा थोडेसे जास्त प्रेमावस्थेत पडत असतील. त्यामुळे मर्यादा सोडून काही ह्रदयाला वागता येत नाही. ह्याउलट, मनाला मर्यादेशी काही घेणंदेण नसत. खर पाहता, समोरची व्यक्ती मनात भरल्यानंतरच ह्रदयाची देवाणघेवाण शक्य आहे. त्यामुळे जोवर मन पसंतीचा "ग्रीन सिग्नल" देत नाही तोवर ह्रदय बापुड्याला काहीच करता येत नाही.

शेवटी हा जो मी लेख लिहिला ते देखिल माझ्या मनात आलं म्हणुनच. हा लेख वाचून तुम्हाला मनस्ताप झाला नसेल अशी आशा करतो.