26 जानेवारीला मंगळवार आलेला पाहुन एखाद्या सराईत सुट्टीटाक्यासारखी मी पटकन 25 ची लिव्ह रिक्वेस्ट टाकली. चीते की चाल, बाझ की नजर और हृषी के लीव्ह प्लानिंग का कोई मुकाबला नहीं असा उगीचच आत्मप्रौढीचा एक टुकार डायलॉग सुचला :-)
असो, 4 दिवस तंगड्या वर करुन लोळत पडण्याच्या आळशी महत्वाकांक्षेला बायकोनी पहिला सुरुंग लावला. ऑफिसात जाणार नसशील तर ट्रिप ला जायच असा एक क्रूर फतवा निघाला. 26 जानेवारीला सोसायटीत झेंडावंदन,राष्ट्रगीत असतं असा मी तत्परतेनी युक्तीवाद केला. त्यावर, इतर वेळी महत्वाची कामं हमखास विसरणाऱ्या बायकोनी, स्मरणशक्तीला जराही ताण न देता, गेले 3 वर्ष मी 26 जानेवारीची सकाळ अंथरुणात लोळत काढत आलो आहे अशी (न विचारता) माहिती पुरवली. आता चारीमुंडया चित झाल्यामुळे ट्रिप च ठिकाण शोधणं क्रमप्राप्त झालं.
एकंदरीतच मला गजबजलेल्या ठिकाणी ट्रिप ला जायचा तिटकारा. त्यामुळे फार लांब नाही आणि तुरळक गर्दीचं ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातलं केळशी फायनल केलं.
(आणि तिसरं सर्वात महत्वाचं पण सीक्रेट कारण म्हणजे समुद्रकिनारी ट्रिप ला गेल्यावर फार काही धावपळ करावी लागत नाही.. सकाळ, संध्याकाळ बीचवर निवांत जाऊन बसलं की झालं :-)) आमचे एक नातेवाईक नुकतेच केळशीला जाऊन आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून तिथल्या मुक्कामाचा पत्ता घेऊन चटदिशी बुकिंगपण करून टाकलं. आता ह्या फास्टट्रैक कामगिरीवर खुश होईल ती बायको कसची. (नेहमीसारखच ह्याही वेळी)नेट वर सर्च न करता (आळशासारखं) आयतं बुकिंग पदरात पाडून घेतलं हे ऐकावं लागलं.
अखेर केळशीला जायचा तो डी-डे उगवला. कोकण म्हणजे खराब रस्ते ही खूणगाठ मी आधीच मनाशी बांधली होती, त्यामुळे प्रवासाचा काही त्रास जाणवला नाही. आणि तसपण मला मुक्कामी पोहोचण्यापेक्षा जातानाचा प्रवास जास्त आवडतो. एखाद्या ठिकाणी चहा, मिसळ हादडावी, पुढं जाऊन मग उसाचा रस प्यावा आणि मग ड्राईवर ला झोप येते ह्या सबबीखाली परत एक दोन चारदा चहा मारावा ह्या माझ्या सुखकर प्रवासाच्या कल्पना :-) बायकोनी किंवा आणि कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर बघा तुमच्यासाठी एवढी ट्रिप काढतोय मग स्वतःसाठी एवढं पण करू नको का? हे नेहमीचं यशस्वी इमोशनल ब्लैकमेलिंग कामी येतं :-)
माणगाव, मंडणगड ही मोठी गावं सोडली आणि मग खरा कोकण सुरु झाला. लाल मातीचा धुराळा आणि ती माती अंगावर पडल्यामुळे कुस्ती खेळून आल्यासारखी दिसणारी रस्त्यालगतची झाडे,झुडपे.. अधुन मधून दिसणारी ऊंच, शिडशिडीत नारळ, सुपारीची झाडं आणि अर्थातच खरवडून काढल्यासारखे दिसणारे (आणि जाणवणारे) बैलगाडीतून जायच्या योग्यतेचे रस्ते..
रस्त्यावर इतके भयंकर खाचखळगे की शोले मधल्या बसंतीच्या टांग्यासारखं आपल्याही गाडीचं चाक निखळून पडतं की काय अशी धास्ती वाटायला लागली..
केळशीच्या फाट्यावर एका मच्छी विकणाऱ्या आजीबाईनी लिफ्ट मागितली. गाडीत बसल्यावर त्यांनी विचारलं कुठून आला पावनं? पुण्याहून अस सांगितल्यावर त्या म्हणाल्या बऱ्याच लांबनं आलात की. ह्यावर मी बायकोकडे विजयी मुद्रेनी एक कटाक्ष टाकला की बघ किती लांबचं ड्राइविंग करत आलोय आणि त्याचं ह्या परक्या आजीबाईनाही कौतुक आहे. पण पुढच्या क्षणी, पुण्याचं काय घेऊन बसलाय पार लांब लांबनं लोक येतात इथे अस बोलून त्या आजीबाईनी माझं विमान लगेच खाली उतरवलं. आता ह्या आजीना इथेच उतरवुन द्यावं आणि म्हणावं की ते लांब लांबचे लोक सोडवतील तुम्हाला इथून घरी असा एक असुरी विचार मनात आला पण माझ्यातल्या सहृदयी माणसानी तो लगेच झटकुनही टाकला.
असो, त्या आजींना त्यांच्या घरापाशी सोडल्यावर त्यांनी लगेच मला 20 रुपये देऊ केले. त्यांना नकार देत पुढं आलो तर बायको म्हणाली तरी सांगत होते दाढी करून ये, जरा बरे कपडे घाल. ती तुला सिक्स सीटर वाली समजली. आणि मग स्वतःच्या जोकवर एकटीच जोराजोरात हसली. नशीब माझा मुलगा झोपला होता नाहीतर पुण्यात परतल्यावर आमच्या बाबांना तिकडे सिक्स सीटर वाले समजले असं सगळ्यांना सांगितलं असतं. आजीना मधेच न उतरवु दिलेल्या माझ्यातल्या त्या सहृदयी माणसावर चरफडत आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो.
ते घरगुती रिसॉर्ट अगदी बीच ला लागुनच होतं. पण आमची रूम आणि वॉशरूम पाहिल्यावर मला एकदम आम्ही लहानपणी वाड्यात राहायचो त्याची आठवण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ओला नारळ किसून, कोथिंबीर भुरभुरून घातलेले चविष्ट कांदा-पोहे खाऊन आम्ही बीचवर गेलो. इथली वाळू अतिशय मऊ आणि चमकदार. बीच बऱ्यापैकी निर्जन. तो भलामोठ्ठा किनारा पाहून माझ्या मुलानी चपला भिरकावून दिल्या आणि पळत सुटला. मी बायकोचं लक्ष नाही अस पाहून तिथल्या एकमेव झोपडीवजा हॉटेलात चहा ऑर्डर केला (ऑलरेडी दोन कप पीऊन झाला होता :-))
चहा पिऊन मग मुलासोबत खेळायला बीचवर गेलो. मधल्या ओलसर पट्टयात छोट्या किड्यांनी/खेकडयानी छिद्र पाडून घरं बनवली होती. ते तुरुतुरु पळायचे तेव्हा त्यांच्या पायामुळे ठिकठिकाणी टिंबांचे सुबकसे डिजाईन तयार व्हायचे. बरेचसे डिजाईन मला नारळाच्या झाडासारखे वाटले.
बायकोनी मुलाला एक छोटीशी बादली दिली आणि मग आम्ही तिघे शंख शिंपले गोळा करायच्या मोहिमेवर रवाना झालो. पांढरे शुभ्र, गुलाबी, जांभळे, ऑरेंज कलरच्या अनेक शिंपल्यानी त्याची बादली भरून गेली. गंमत म्हणजे आम्हाला एकही शंख सापडला नाही. नवीन शिंपला सापडल्यावर प्रत्येक वेळी मुलगा आनंदानी जल्लोष करत होता. गाडया, चॉकलेटं, मोबाईल/टॅब वरचे गेम्स हे मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आणि वेगळा आनंद त्याच्या निरागस डोळ्यात आम्हाला त्यावेळी दिसला. तीच गोष्ट वाळुचा किल्ला बनवताना. त्याच्यासोबत आम्हीही आमचं बालपण एन्जॉय केलं. सर्वात सुंदर आणि कायमस्वरूपी आनंद देणाऱ्या गोष्टी निसर्गात मोफत उपलब्ध असतात अशा काहीशा आशयाचा एक सुविचार आहे. त्याचा प्रत्यय आम्हाला त्या दिवशी आला. शेवटी कडक ऊन व्हायला लागल्यावर मुलाला नाईलाजानी बळजबरी बीचवरून ओढून न्यावं लागलं.
पुढच्या दोन दिवसात आम्ही आजुबाजुची ठिकाणं बघितली. केळशीतच एक याकूब बाबा दर्गा आहे. ते शिवाजी महाराजांचे सातवे गुरु म्हणून ओळखले जातात. तिथे जाताना परत एक आज्जी भेटल्या आणि त्यांना घरी सोडल्यावर त्यांनी पण 20 रुपये देऊ केले. ह्यावेळी, मागल्या वेळेपेक्षा, दाढी जास्त वाढली होती त्यामुळे त्या आज्जीना मी बेनिफिट ऑफ़ डाउट दिला :-)
नंतर आम्ही अंजर्ले आणि हर्णे (किंवा हरणाई) ही सुंदर गावं/समुद्रकिनारे पाहिले. अंजरल्याहुन हर्णेला जाताना घाटात अगदी मोक्याच्या ठिकाणी व्हिला 270 म्हणून एक पॉश हॉटेल दिसलं. त्या स्पॉट वरून खाली दिसणारा देखावा अतिशय निसर्गरम्य होता. अथांग पसरलेला निळाशार अरबी समुद्र, त्याला लागून असलेला सुंदरसा किनारा, छानशी कौलारु घरं आणि आजुबाजुला नारळाची झाडं. त्या हॉटेल च ऑनलाइन बुकिंग करता येतं अस समजल आणि मग एक दिवस इथे नक्की रहायला यायचं अशी मनाशी खूणगाठ बांधली.
एक दिवस आम्ही वेळासला गेलो. इथला समुद्रकिनारा तुलनेनी छोटा पण अगदी सुनसान. इथे हजारो कासवं फेब्रुवारी ते एप्रिल च्या दरम्यान अंडी घालायला येतात आणि चिपळूणची एक संस्था, वेळास ग्रामपंचायतीच्या सहकार्याने त्या अंडयांच संरक्षण करते. ते पहायला खूप पर्यटक येतात. नाना फडणवीस सुद्धा ह्याच गावचे. त्यांचा जुना वाडा पडून तिथे फक्त एक चौथरा शिल्लक आहे. त्यावर नानांचा एक अर्धाकृती पुतळा उभारला आहे. ह्या भागात हॉटेलं जवळपास नाहीच. मग तिथल्याच् एका घरगुती खानावळीत जेवून केळशीला परतलो.
शेवटच्या दिवशी निघायच खर तर अगदी जीवावर आलेलं. उसनं अवसान आणून 9 ते 6 च्या रूटीन मधे अडकायला पुण्याकडे परत निघालो. बायको आणि मुलगा जाम खुश दिसले आणि मीही आता पुढचे सात आठ वीकेंड तरी तंगड्या वर करत आराम करायला मोकळा ह्या आनंदात गाड़ी स्टार्ट केली :-)