Friday, August 26, 2016

हजारो ख्वाहिशें ऐसी....

काही महिन्यांपूर्वीच  मी माझा 35 वा बड्डे धुमधडाक्यात साजरा केला. आयुष्याच्या ह्या स्टेजला खरंतर मी (आणि माझे बव्हतांशी समवयस्क मित्र/मैत्रिणी) खुश असायला हवेत..... आर्थिक, सामाजिक, इत्यादी इत्यादी सगळं स्वातंत्र्य कमावलं आहे... आयुष्याच्या जहाजाचं सुकाणू आपल्या हातात आहे..त्याला आपण जिथे पाहिजे तिथे घुमवू शकतो.... आहे कि नाही मजा?

पण दुर्दैवाने माझे काही दोस्त ह्या स्टेजला "आलिया भोगासी असावे सादर", "आता उरलो उपकारापुरता", "आता काय राहिलंय आयुष्यात", "चाळीशी जवळ आलीये' अशा टाईपचा निराशावादी विचार करतात तेव्हा मला आश्चर्यचकित व्हायला होतं...

माझ्यापुरतं म्हणाल तर मी थोडंफार कमावलंय, थोडं फार शिकलोय आणि अजून खूप काही मिळवायचंय असाच विचार येतो.. मुलं किती मोठं झालीयेत, पुढे खर्च किती आहेत, शरीराला काय काय व्याधी जडल्यायेत हे क्षुल्लक विचार आहेत..

आता बघा हां,  अजूनही मला पोहता येत नाही...उगीच चार पाच फुटात डुंबत राहून इतरांनी मारलेले सूर बघत बसण्यात काय हशील आहे??
मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या आम जनतेलासुध्दा समजणाऱ्या भाषांशिवाय कुठली नवीन भाषा शिकलोय?
बाथरूम सिंगर आणि इतरांच्या गाण्याला टेबलावर धरलेल्या ठेक्याशिवाय संगीतातलं काय ज्ञान मी मिळवलंय?
क्रिकेट हा आपला अघोषित राष्ट्रीय खेळ सोडला तर मला इतर खेळांविषयी कितपत माहिती आहे?
स्वयंपाक हा काही फक्त बायकांसाठी राखून ठेवलेला प्रांत नाही.. चहा आणि मॅगीशिवाय दुसरं काय बनवायला शिकलोय?

मारे स्वतःला पट्टीचा वाचक समजतो मी पण विशिष्ट लेखक/लेखिका सोडले तर काय वाचलंय मी?
मराठीत अजूनही नामदेव ढसाळ, दया पवार, इत्यादींचं दलित साहित्य वाचायचंय....संत साहित्यातलं रा.चिं ढेरे, सदानंद मोरेंचं लिखाण अजून वाचायचं बाकी आहे.. समग्र ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव,  रामदास, चोखामेळा, एकनाथांचं लिखाण वाचायचंय...

इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गोनी दांडेकरांच्या एकाही पुस्तकाला अजून हात लावलेला नाही...बऱ्याच आधी नेमाडे, श्याम मनोहरांची पुस्तकं वाचायचा, समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न केला होता... पण तेव्हा काही केल्या ती झेपली नव्हती... काय हरकत आहे आता पुन्हा वाचून बघायला? कदाचित गेल्या काही वर्षांत माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या असतील आणि ती पुस्तकं आता कदाचित नव्याने उमगतीलही...

 मराठी कविता/गझलांमध्ये  कुसुमाग्रज, सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर, संदीप खरे, थोड्या प्रमाणात केशवसुत, बा.सी. मर्ढेकर, दा.सु. वैद्य, बा.भ. बोरकर, विं.दा., इंदिरा संत, बहिणाबाई, वसंत बापट सोडले तर बरेचसे कवी/कवयित्री आणि त्यांच्या कविता मला अनभिज्ञ आहेत....

नाटकांचं म्हणाल तर शांतेचं कार्ट, तरुण तुर्क, यदाकदाचित अशी लोकप्रिय विनोदी नाटकं, प्रशांत दामलेची नाटकं सोडली तर अजूनही मी विजया मेहता, सतीश आळेकर, चेतन दातार, तेंडुलकर, एलकुंचवार, अतुल पेठे, दुबे इत्यादींच्या महासागरात प्रवेश केलेलाच नाही


इंग्रजी साहित्याबद्दल म्हणाल तर चेतन भगत, रॉबिन शर्मा आणि तत्सम व्यवस्थापन किंवा सेल्फ-हेल्प कॅटेगरीतली पुस्तकं, खालीद हुसेनी, फौंटनहेड, शेरलॉक होम्स अशी तुटपुंजी यादी वगळता अजून बरंच काही वाचायचं बाकी आहे...

चित्रपटांचं म्हणाल तर मराठी, हिंदी आणि निवडक लोकप्रिय इंग्लिश चित्रपट वगळता अजून बरंच काही एक्सप्लोर करायचं बाकी आहे....जगभरातल्या उत्कृष्ट अशा डॉक्यूमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स अजून बघायच्या बाकी आहेत....

पंढरीची वारी, नर्मदा परिक्रमा, लेह-लडाख मध्ये बाईकवर प्रवास, मनाली ट्रेक, कैलाश-मानसरोवर, महाराष्ट्रातले बहुतांश गड-किल्ले, गिरनार अशा अनेक अनुभूती घ्यायच्या बाकी आहेत.. भारतात मध्य प्रदेश, हिमाचल, गोवा वगळता अनेक प्रदेश पादाक्रांत करायचे बाकी आहेत...तेव्हा  जगप्रवास तर पुढची पायरी आहे...

ही यादी न संपणारी आहे... डन पेक्षा टू डू लिस्ट फार मोठी आहे... ह्यातल्या कितपत गोष्टी साध्य होतील हा भाग अलहीदा पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

ह्या निमित्ताने, मिर्झा गालिबच्या खालील ओळी आठवल्यावाचून रहात नाहीत

"हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले"