Tuesday, December 19, 2017

शाळा बिळा आणि बरंच काही...

माझा मुलगा जवळच्याच एका शाळेत जातो. त्याच्या शाळेत एक दिवस छोट्याश्या स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा तास असतो, एखाद दिवशी मातीमध्ये खेळायचा तास असतो. वार्षिक स्नेहसंमेलनात तो व्हेंगाबॉईजच्या "गोईंग टू इबिझ्झा" गाण्यावर डान्स करतो आणि ह्या सगळ्यांतून वेळ मिळाला की थोडाफार अभ्यासही करतो.
पुढे पुढे तर त्यांना स्केटिंगचा, टेनिसचा ही तास असेल.

मला अनेकदा माझे शाळेचे दिवस आठवतात. रोज पाच गणितं वहीत सोडवून आणायची, अचानक उभं केल्यावर पाठयपुस्तकातला उतारा वाचवून दाखवायचा, शिक्षक सांगतील ते ईमान इतबारे वहीत शक्यतो सुवाच्च अक्षरात उतरवून घ्यायचं, रोज न चुकता गृहपाठ पूर्ण करायचा अशी अनेक अवघड कामं असायची

शिवाय, राजा रवी वर्मा किंवा एम एफ हुसेननी कोपरापासून हात जोडावेत अशी चित्रं काढणं, कार्यानुभवाच्या तासाला वाट्टेल त्या आकाराच्या कागदी आकृत्या बनवणं(अजूनही मला होडी आणि विमानाशिवाय दुसरं काही येत नाही :-)), प्रयोगशाळेत जे समोर येईल ते विचार न करता एकमेकांत मिसळून कुठल्यातरी
नव्या वायूचा शोध जगाला बहाल करणं, पायथागोरसनी निवृत्ती स्वीकारावी असल्या अफाट भूमितीच्या आकृत्या काढणं,
महाराष्ट्रात चहा तर आसामात ऊसाची लागवड करणं, अकबराकडून ताजमहाल बांधून घेणं, इतिहासाच्या पुस्तकातल्या (स्त्री असो की पुरुष) सगळ्यांना दाढी मिशा काढणं असे अनेक सर्जनशील प्रयोग करत राहिलो.

खरं सांगायचं तर शाळेतला प्रत्येक दिवस हा कुरुक्षेत्रावर लढायला निघालेल्या योद्धापेक्षा कमी नव्हता. ह्या संग्रामात यशस्वी होण्यापेक्षा घायाळ व्हायचे प्रसंगच अधिक आले.
प्रगतीपुस्तक वेळेवर दिलं नाही म्हणून किंवा गृहपाठ केला नाही म्हणून किंवा शिक्षक शिकवत असताना मध्येच हसलो म्हणून गदा, भाले, बाणांनी अनेकवेळा जखमी व्हायची वेळ आली.
सुदैवाने ह्या संग्रामात कधी धारातीर्थी पडलो नाही.

मुस्काडास्त्र, गुद्देअस्त्र, टपलास्त्र, धपाटास्त्र, चिमटास्त्र, कानपिरगाळास्त्र, फूटपट्टास्त्र, डस्टरास्त्र, रुळास्त्र अशा अनेक अस्त्रांचा प्रयोग होऊनही शाळेतून सहीसलामत बाहेर पडलो :-)

हे सगळं वाचून कदाचित तुम्हांला वाटेल की सगळंच उदासवाणं, निराशाजनक होतं. पण नाही, ह्या  सगळ्यातूनही जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा मजा लुटली.

माझ्या मागे आशिष रसाळ नावाचा मुलगा बसायचा. राष्ट्रगीताच्या वेळी जेव्हा "तव शुभ नाम जागे, तव शुभ आशिष मागे" यायचं तेव्हा मी हमखास मागे वळून आशिषकडे बघत हसायचो (ह्याकरिता मी अगणित वेळा मार खाल्ला आहे :-))

मोनेकला मंदिरात एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी सगळे जमायचो तेव्हा मी पुढे बसलेल्या दोन वर्गमित्रांच्या दप्तरांचे बंद एकमेकांना बांधायचो. कार्यक्रम संपल्यावर जेव्हा ते उठायचे, तेव्हा काय व्हायचं ह्याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल.

तास चालू असताना तोंड कमीत कमी हलवून जेव्हा बोरकूट किंवा लेमनची गोळी चघळायचो तेव्हा ती मजा काही और होती.

शेजाऱ्याचं लक्ष नसताना त्याच्या चायना पेन मधली शाई जेव्हा त्या पेनच्या झाकणात पुरेपूर ओतायचो आणि जेव्हा तो लिहायला पेन उघडायचा तेव्हाची मजा शब्दातीत आहे.

व्हीक्स इन्हेलर उघडून जेव्हा त्याच्या आतली नळी डोळ्याला हलकेच लावून डोळ्यांतून पाणी काढायचो आणि आजारी आहे सांगत घरी पळायचो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

आजोबांची शिंकणी आणून जेव्हा शेजाऱ्याला हुंगायला दिली होती त्यानंतर त्याची जी अवस्था झाली ते सांगणं अवघड आहे :-)

अशा असंख्य मजेशीर आठवणी आजही माझ्या स्मरणात आहेत.
शाळेविषयी मला अजिबात कटुता नाही. कदाचित त्या काळातल्या बहुसंख्य मराठी शाळा ह्याच धाटणीच्या असतील. तेव्हाची ती सर्वरूढ पद्धत असेल.

आज ह्या शाळेमुळेच आपलं पहिलं गेट टू गेदर झालं. जुने मित्र भेटले, तेव्हा न भेटलेले अनेक नवे मित्रही झाले. अजून काय हवं?
आपल्या सगळ्यांच्या मनात शाळेबद्दल कडू-गोड आठवणी असतीलही पण आपल्या सगळ्यांना आज बांधून ठेवणारा, जोडणारा हाच तर तो धागा आहे. 

Tuesday, November 7, 2017

Life is beautiful

काही चित्रपट असे असतात की ते पाहताना आपण खळखळून हसतो तर काही चित्रपट पाहताना आपण भारावून जातो. काही चित्रपट पाहताना आपल्याला अश्रू अनावर होतात तर काही आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात आणि काही आपल्याला मानवी जीवनमूल्यांचं उत्तुंग दर्शन घडवतात.. खरंय ना?
आणि हे सगळे अनुभव एकाच चित्रपटात अनुभवायला मिळाले तर?  तर मग त्याच्यासारखा दुसरा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स नाही...

नाझी हुकूमशहा हिटलरने ज्यूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांवर अनेक चित्रपट बनले, बनत राहतील.. स्पिलबर्गसारख्या अद्भुत माणसाच्या मुशीतून साकारलेल्या शिंडलर्स लिस्ट सारख्या चित्रपटानंतर (ज्याला ऑस्कर मिळालंय) अजून काय पाहण्यासारखं राहतं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे..

खरं तर ज्यू समाजाच्या अत्याचारांवर, जो अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय आहे, चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. पण इटालियन दिग्दर्शक आणि अभिनेता रॉबेर्तो बेनिनी (roberto benigni) ह्याने ते लीलया पेललंय..

लाईफ इज ब्युटीफुल ह्या चित्रपटाच्या कथेचे ढोबळमानाने दोन भाग पाडता येतील. पहिला म्हणजे रॉबेर्तोची प्रेमकथा आणि दुसरा म्हणजे ज्यू छळछावणीतील त्याच्या आयुष्याचा प्रवास.
ही कथा १९३९ पासून सुरू होते. शहरामध्ये नशीब काढायला, पुस्तकाचं दुकान उघडायला आलेला आपला हा नायक त्याच्या काहीशा वेंधळ्या, निष्पाप, विनोदी कृत्यांनी धमाल उडवून देतो.



दरम्यानच्या काळात उदरनिर्वाहासाठी तो त्याच्या काकांच्या उपहारगृहात वेटरची नोकरीही करतो.
तिथे तो त्याच्या आनंदी, उत्साही स्वभावाने ग्राहकांची मनं जिंकून घेतो.

कर्मधर्मसंयोगाने त्याला त्याची नायिकाही(जी त्याच्या खऱ्या आयुष्यातली पत्नी आहे)  वारंवार ह्या ना त्या कारणाने भेटत राहते.. तिच्या हृदयात आपलं स्थान मिळवण्यासाठी तो अचाट मार्ग शोधत राहतो..



अखेर आपला भोळाभाबडा, जिंदादिल नायक तिचं मन जिंकून घेतो आणि एका अत्यंत नाट्यमय प्रसंगातून तिला पळवून नेत तिच्याशी लग्नही करतो..

नायिकेच्या आईला आपल्या मुलीचं एका कफल्लक, ज्यू माणसाशी झालेलं लग्न कदापि मान्य नसतं.
कथेच्या हा पहिला भाग जरी हलका फुलका असला तरीही आपल्याला अधून मधून इटलीत उसळलेली ज्यू द्वेषाची चुणूक पहायला मिळते. रॉबेर्तोचे करुण रसात्मक विनोदी प्रसंग आपल्याला चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटांची आठवण नक्कीच करून देतात.

 चित्रपटाचा आत्मा हा कथेचा दुसरा भाग आहे.
रॉबेर्तोच्या लग्नानंतर थेट आपल्याला त्याचा छोटा मुलगा भेटतो. कथेच्या ह्या भागेत वडील-मुलाच्या नात्यातले हळुवार पदर उलगडले जातात. मुलाच्या सुखासाठी जीवाचं रान करणारा रॉबेर्तो आपल्याला भेटतो.



नायिकेची आई कपटी चाल खेळते आणि रॉबेर्तो, त्याचा मुलगा, काकाची ज्यू असल्या कारणाने छळछावणीत रवानगी होते. आपली नायिका, जन्माने ज्यू नसली तरीही, हट्टाने त्यांच्यासोबत आगगाडीत चढते.

चित्रपटाच्या ह्या भागात रॉबेर्तो त्याच्यातल्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यातले अत्युच्च कौशल्य दाखवतो.
जेव्हा एक नाझी ऑफिसर कैद्यांना सूचना द्यायला येतो तेव्हा रॉबेर्तो त्याला जर्मन येतं अशी बेलामूम थाप मारतो आणि त्याच्या मुलासमोर त्या ऑफिसरच्या सुचनांचं ढळढळीत खोटं भाषांतर करत खेळाचे नियम सांगतो..

आपण एक खेळ खेळायला जात असून जो कोणी सर्वप्रथम हजार पॉईंट्स मिळवेल त्याला एक खराखुरा टॅंक बक्षीस म्हणून मिळेल अशी रॉबेर्तो कथा त्याच्या मुलासमोर रचतो.
हा प्रसंग म्हणा किंवा शॉवर घेण्याच्या नावाखाली लहानग्या ज्यू मुलांना यमदसनी धाडण्यात येते आणि रॉबेर्तो स्वतःच्या मुलाला कसे वाचवतो तो प्रसंग म्हणा किंवा संधी मिळाल्यावर स्पीकरवरून लेडीज सेक्शनमध्ये असलेल्या बायकोशी रॉबेर्तो कशा प्रकारे संवाद साधतो तो प्रसंग म्हणा असे अनेक काळजाला भिडणारे प्रसंग चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आहेत.

आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय हे जरी रॉबेर्तोला माहीत असले तरी तो आपल्या लहानग्या, कोवळ्या मुलाला येऊ घातलेल्या भीषण परिस्थितीची जाणीव न करून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

शेवटी रॉबेर्तो, त्याचा मुलगा आणि बायको ह्यांची सहीसलामत सुटका होते की त्यांचं आयुष्य छळछावणीत संपुष्टात येतं हे पडद्यावर पहाणचं योग्य ठरेल..



हा चित्रपट रुबिनो सलमोनिच्या "आय बीट हिटलर" ह्या पुस्तकावर आणि रॉबेर्तोच्या वडिलांच्या जर्मन छावणीत 2 वर्ष काढलेल्या अनुभवावर आधारीत आहे.

लाईफ ईज ब्युटीफुलला जशी लोकमान्यता मिळाली तशी राजमान्यतही मिळाली. ह्या चित्रपटाने 4 ऑस्कर अवॉर्डस मिळवले.

हा चित्रपट का पहावा? ह्याची अनेक कारणं आहेत. तुमच्याकडे जर विनोदबुद्धी आणि जीवनाकडे पहायचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अत्यंत प्रतिकूल आयुष्यालाही तुम्ही सुसह्य बनवू शकता. रॉबेर्तो आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीवघेण्या संकटांसमोर आपल्याला स्वतःचे प्रश्न अगदी क्षुल्लक वाटू लागतात.

जेव्हा आपल्या आयुष्यात मनासारखं घडत नसेल, नकारात्मक विचारांनी आपला ताबा घेतला असेल तेव्हा हा चित्रपट नक्कीच दिपस्तंभासारखं मार्गदर्शन करेल ह्यात शंका नाही.

Sunday, July 9, 2017

मी टाईपरायटर बोलतोय

माझ्या प्रिय मित्र/मैत्रिणींनो,

मी टाईपरायटर बोलतोय.. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ह्या निर्जीव टाईपरायटरला अचानक वाचा कशी फुटली? दिवा विझण्याआधी जसा अचानक मोठा होतो ना तसाच तुम्हां सगळ्यांचा शेवटचा निरोप घेण्याआधी परमेश्वराने मला वाचा बहाल केली असावी...

तसा मी दीर्घायुषी बरंका.. जेव्हा तुमचे आजोबाही जन्मले नसतील त्या काळात, साता समुद्रापलिकडे, अमेरिकेत माझा जन्म झाला.. सगळं जग पादाक्रांत करत करत भारतात यायला मला जरा उशीरच झाला..
पण तुम्ही लोकांनी मला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला तो आश्चर्यकारकच होता...
रेमिंगटन, गोदरेजसारख्या मोठमोठ्या कंपनीज मला तयार करायला पुढे सरसावल्या.. आधी फक्त इंग्लिश मग मराठी, हिंदी अशा तुमच्या स्थानिक भाषांकरीताही माझे कीबोर्ड बनू लागले...

न्यायालयात, शासकीय कार्यालयांत, सार्वजनिक, खाजगी क्षेत्रात अशा सगळीकडे माझा बोलबाला सुरू झाला आणि मग हळू हळू प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात, गावात टंकलेखन संस्थांचा उदय झाला.. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, दहावी/बारावी झालं की टायपिंग शिकायला मुला/मुलींची झुंबड उडू लागली.. नोकरीच्या मुलाखतीसाठी टायपिंगचं सर्टिफिकेट अनिवार्य होऊन गेलं.. आणि काय सांगू, मला ह्या जगाचा अनभिषिक्त सम्राट असल्याची जाणीव व्हायला लागली...

खरं सांगू, माझी जन्मभूमी जरी अमेरिका असली ना तरीही मला तुम्हां भारतीयांकडूनच भरभरून प्रेम मिळालंय.. तुम्ही लोकं तुमची मुलं दमून भागून अस्ताव्यस्त झोपली की हळूच त्यांच्यावर मायेचं पांघरूण घालायचे ना तसंच तुमच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये लोकांनी दिवसभर मला यथेच्छ वापरलं की शेवटी तुम्ही मला मायेने कव्हर घालायचे.. तुमच्या मुलांसारखंच मग मीही गाढ झोपी जायचो... आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवायचे ना तसंच मलाही कव्हर काढून, व्यवस्थित पुसून पहिल्या बॅचसाठी तयार करायचे...

मी वरकरणी जरी निर्जीव यंत्र वाटत असलो ना तरी माझ्याही अंगावर रोमांच उभे रहायचे, आनंदानी मीही बहरून जायचो..
तुमच्या कोणत्यातरी एका सणाला तुम्ही लोकं हळद, कुंकू, फुलं वाहून माझी पूजा करायचे... त्यावेळी माझा ऊर अभिमानाने भरून जायचा.. त्यावेळी कदाचित तुम्हाला माझ्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू दिसले नसतील.. पण खरंच सांगतो मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं..

आज मागे वळून पाहताना जाणवतंय की तुम्हां सगळ्यांच्या प्रत्येक सुख दुःखाचा मी साक्षीदार राहिलो आहे..
इन्स्टिट्यूट/जॉबवर्क सुरू केल्यानंतरचा तुमचा संघर्षाचा काळ, लग्नकार्य, नव्या घरात प्रवेश, मुलांची शिक्षणं अशा प्रत्येक प्रसंगी तुमच्या घरातलाच एक सदस्य असल्याची जाणीव होत राहिली... तुमच्या यशापशयात आपण दोघेही एकमेकांना घट्ट धरून वाटचाल करत राहिलो, अजून काय पाहिजे?

टायपिंगच्या परीक्षांच्या वेळी तुम्ही मला हातगाडी, रिक्षा, टेम्पो जे साधन मिळेल आणि मुख्य म्हणजे परवडेल त्यात घालून परीक्षा केंद्रात न्यायचे...तेव्हा मला हादरे बसायचे, हाडं खिळखिळी व्हायची पण केवळ तुमच्या प्रेमाखातर मी सगळं सहन करत आलो आहे... नाही नाही तक्रार करत नाहीये पण आजची ही शेवटची संधी समजून माझं मन मोकळं करतोय..

asdf ;lkj पासून ते थेट लेटर, स्टेटमेंट, स्पीड पॅसेज पर्यंतची माझ्या मित्र मैत्रिणींची प्रगती पाहिली की सगळे कष्ट विसरायला व्हायचे...मला हात असते ना तर मी नक्कीच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असती..

मी यशाच्या शिखरावर होतो आणि मग संगणक क्रांती झाली...
घराघरात, गावागावात संगणक पोहोचले आणि मला कळून चुकलं की ह्या झंझावतात माझा फार काळ निभाव लागणार नाही..
बदल हा सृष्टीचा नियमच आहे म्हणा...जिथे अवाढव्य, सर्वशक्तिशाली डायनासोर पृथ्वीच्या उदरात गडप झाले तिथे माझ्यासारख्या एका छोट्या यंत्राचं काय घेऊन बसलात..

आता ही येणारी परीक्षा संपली की माझाही खडखडाट थांबणार..आणि मग माझं काय करायचं हा प्रश्न तुमच्यापुढे उभा राहील.. तुमच्यातले काही जण मला कवडीमोल भावात विकून टाकाल...काहीजण ओळखीच्या लोकांत वाटून टाकाल...काही जणांना मला निरोप देणं जड जाईल, काही प्रॅक्टिकल (माझ्या अमेरिकेत आहेत तशी) लोकं म्हणतील एवढं काय मनाला लावून घ्यायचं? निर्जीव यंत्रच होतं ना ते.. ते ऐकून कदाचित मला वाईट वाटेल.. तुमच्या आठवणींत तरी मला जिवंत ठेवाल ना? असा विचारायचा मोहसुद्धा होईल..

बघा, तुम्ही भारतीयांसोबत राहून मीही इमोशनल बनलो आहे.. संगत का असर, दुसरं काय? :-) अलविदा!!!!