Friday, May 21, 2010

काही छंद

बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील.

मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार. आम्हाला आमचा खजिना हमखास बस स्टँडच्या भव्य कचराकुंडीत सापडायचा. म्युन्सिपाल्टीचे लोक पहात नसतील एवढ्या बारकाईने आम्ही एक एक कचर्‍याचा थर काडीने किंवा तत्सम अवजाराने बाजूला करायचो. एखादा नवीन टिक्का मिळाला की हिरा मिळाल्याएवढा आनंद व्ह्यायचा. नेमकं एक दिवस एका ओळखीच्यांनी आम्हाला संशोधन करताना पकडलं. इमान-इतबारे त्यांनी घरी वार्ता पोहोचवली. घरचे तसे उदार मनाचे असल्याने काही बोलले नाहीत फक्त गमतीनी विचारलं की रिकाम्या काडेपेट्याच गोळा करता ना रे बाबांनो? माझे काही मित्र सिगरेटच्या पा़किटाच्या आतला चंदेरी कागद जमा करायचे. मला ते अगदीच भुक्कड वाटायचं. सगळ्याच सिगरेटच्या पा़कीटातील चंदेरी कागद सारखाच असणार. आणि मुळात (रिकाम्या) काडेपेट्या गोळा करतानाच एवढी अपराधीपणाची भावना होती की सिगरेटच्या पाकीटाला हात लावायची पण हिंमत नाही झाली (तेव्हा :-) ). मग डेली कलेक्शन घेऊन घरी आलं की काडेपेट्यांचं मुखपृष्ठ धुऊन, व्यवस्थित पुसून, कापून ते एका खास वहीत चिकटवून टाकायचो. भावाचं नशीब नेहमीचं जोरात असायचं. त्याच्याकडे रोज माझ्यापेक्षा निदान ३-४ तरी नवीन टिक्के निघायचे. मग मी मनातून थोडा खट्टू व्ह्यायचो. झोपताना उद्या त्याच्यापेक्षा नक्की जास्त टिक्के मिळवीन असं स्वप्नं रंगवायचो.

अशा तर्‍हेने बरीच वर्षं संशोधनात घातल्यावर कालपरत्वे ती वही हरवून गेली. आज वाटतं की ती वही जपून ठेवायला हवी होती. असो, हा छंद अगदी परवडेबल होता त्यामुळे बरीच वर्षं टिकला. काही लोक देशोदेशीची नाणी गोळा करत. तेव्हा आमच्या दूरदूरच्या नात्यातसुद्धा कोणी परदेशी नव्हतं, त्यामुळे हा छंद काही जवळपास फिरकला नाही. खरा छंद माणसाला पार वेडं लावतो, बेचैन करून टाकतो. असाच एक दुसरा छंद म्हणजे वर्तमानपत्रात, क्रिडा साप्ताहिकात आलेले क्रिकेटर्सचे फोटो जमा करणं (आणि अर्थातच एका खास वहीत ते चिकटवणं) पण लवकरच त्यातला रस संपला. सकाळमधे चिंटू किंवा लोकसत्तात काहीतरी शौर्यगाथा का यशोगाथा असं काहीतरी यायचं पण तिकडे काही वळायची कधी इच्छा झाली नाही.

मधेच काही दिवस प्रसिद्ध लोकांच्या स्वाक्षर्‍या गोळा करायचं खूळ डोक्यात आलं. मला आठवतंय त्याप्रमाणे पहिली सही अरूण दातेंची घेतली. एकूण सह्यांचा आकडा काही दहाच्या वर गेला नाही. कारण एक तर मी अहमदनगरमधे रहात असल्याने साहित्यिक,कलावंत, खेळाडू मंडळी काही विशेष फिरकायची नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम संपल्यावर किंवा मध्यंतरात ह्या लोकांच्या मेकअप-रूम मधे जाऊन सही घ्यायला जाम संकोच वाटायचा. एकदा आमच्या नगर वाचनालयात व.पु. आले असं कळल्यावर धावतपळत गेलो. मी कधी वपुंचा फोटो पाहिला नव्हता पण दारातच मु़ख्य ग्रंथपालांसोबत एक पाहुणा दिसला. ग्रंथपालांनी विचारलं - काय रे कोण पाहिजे? मी म्हटंलं की इथे वपु आले होते असं ऐकलं. त्यांची सही घ्यायची होती. ग्रंथपाल म्हणाले की ते मगाशीच गेले पुण्याला. तेवढ्यात ते पाहुणे म्हणाले की माझी सही चालेल का? मी तेवढा प्रसिद्ध नाहीये पण करतो सही तुझ्या वहीत. सही पाहिल्यावर लक्षात आलं की हे तर रमेश मंत्री. अर्थात, तेव्हा मला ह्या नावाचे कोणी लेखक आहेत हेदेखील माहित नव्हतं.

अर्थात हे सगळं इंटरनेटची क्रांती होण्यापूर्वीचं. आजच्या काळात जर कोणी काडेपेट्याचे टिक्के शोधताना दिसलं तर मला भयानक आश्चर्य वाटेल. पण त्या छोट्या दोस्तासोबत कदाचित टिक्के शोधत परत बालपणाची सफरही करेन. इंटरनेट आल्यावर तर वेड छंद लागले. सगळ्यात आधी चॅटिंगचा. "ए एस एल प्लीज" हे तर चॅटिंगचं ब्रीदवाक्य होतं. प्रत्येक सायबर कॅफेमधे MIRC नावाचं सॉफ्टवेअर असायचं. त्यावर चॅटिंगचा अक्षरशः धुमाकूळ चालायचा. नंतर याहू, हॉटमेल मेसेंजर लोकप्रिय झाले. माझे काही मित्र तर रोज १०-११ तास चॅटिंग करायचे. एक दिवस तर एकानी कहर केला. सलग वीस तास चॅटिंग केलं पठ्ठ्यानी. सगळ्यांनी फक्त त्याचा सत्कार करायचंच बाकी राहिलं होतं. तेव्हा इंटरनेट बरंच महाग होतं. त्यामुळे आमच्यासारख्या सामान्य जनतेला हे लाड परवडायचे नाहीत. मित्रांनी, मी कधी नावही ऐकलं नव्हतं अशा, देशाच्या मुलींसोबत प्रेमाच्या आणाभाकादेखील घेतल्या होत्या :-). मला काही चॅटिंगमधे (सुरूवातीचा थोडा काळ सोडला तर) फारसा इंटरेस्ट वाटला नाही. (इथे कोणाला कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशी म्हण आठवत असेल तर मी त्याकडे दुर्लक्ष करतो :-) )

नंतर मग आयएमडीबीवर जाऊन इंग्लिश चित्रपटाची माहिती वाचत बसणं, विकीपिडीयावर जाऊन जे नाव आठवेल त्याची माहिती वाचणं, टोरंटची क्रांती झाल्यावर धपाधप पिक्चर डाऊनलोड करणं असे जे छंद लागले ते आजपर्यंत कायम आहेत.

Sunday, May 9, 2010

ऑफिसमधे वेळ कसा घालवावा?

१. मॅच चालू असेल तर क्रिकइन्फोवर जाऊन सारखं स्कोअरकार्ड रिफ्रेश करत रहाणं (ते आपोआप काही वेळानी रिफ्रेश होत असेल तरीही) . दोन्ही संघातल्या प्रत्येक खेळाडूचं उगीचच प्रोफाईल पहात बसणं.

२. थोड्या थोड्या वेळानी ईसकाळवर जाऊन एखाद्या लेखावर आपण दिलेली कमेंट प्रसिद्ध झाली की नाही ते पहाणं. (खवचट कमेंट असेल तर ईसकाळवाले लवकर प्रसिद्धपण करत नाहीत)

३. रोज सगळे बँक अकाऊंट्स, लोन अकाऊंट चेक करत बसणं.. फारच बोअर होत असेल तर १०० रुपये सेविंग अकाऊंट मधून करंट मधे आणि परत करंटमधून सेविंगमधे ट्रान्सफर करणं.

४. वीकीपीडियात जाऊन ज्याचं नाव डोक्यात येईल त्याची माहिती सर्च करून वाचत बसणं.. त्या लेखात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर टिचकी मारुन उगीचच त्याची माहिती वाचत बसणं...

५. आयएमडीबीवर जाऊन जे डोक्यात येईल त्या चित्रपटाची माहिती वाचत बसणं.. मग त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची खाजगी माहिती, आत्तापर्यंतचे चित्रपट ह्यांची माहिती वाचत बसणं.

६. मटावर जाऊन जेवढं काही वाचणं हापिसात शक्य आहे तेवढं वाचणं आणि उरलेलं घरी जाऊन पहाणं.

७. मायक्रोसॉफ्ट वर्डमधे जाऊन एखाद्या इंग्लिश शब्दाचे समानार्थी शब्द बघत बसणं (शिफ्ट + एफ७ दाबून).. एखाद्या समानार्थी शब्दावर टिचकी मारून त्याच्या समानार्थी शब्दांच्या यादीत मूळ शब्द येतोय का नाही ते पहाणं.

८. आणि महत्त्वाचं म्हणजे - उरलेल्या वेळात हापिसचं काम करणं..