Monday, June 27, 2016

एक भयाण रात्र

"मे आय कम इन समर?"
"येस प्लीज कामिनी "...

समर आपल्या केबिनमध्ये लॅपटॉप उघडून गंभीर चेहऱ्याने बसला होता... "सीट डाऊन प्लीज कामिनी"...

समर हा इझी सोल्युशन्स कंपनीत टीम लीडर होता.. आज त्याचं कामिनीसोबत अन्युअल अप्रेझल डिस्कशन होतं... कामिनी ज्युनिअर होती आणि तिचं कंपनीतलं हे पहिलं अप्रेझल होतं... त्यामुळे साहजिकच ती नर्व्हस होती...

"कामिनी तू गेल्या वर्षभर चांगलं काम केलंस... पण तीन चार वेळा तुझ्याकडून खूप अक्षम्य चुका झाल्या आणि त्यामुळे कंपनीचं नाव खराब झालंय... त्यामुळे मॅनेजमेन्ट तुझ्यावर नाखूष आहे.. आय एम सॉरी पण आम्हाला तुला काढून टाकावं लागत आहे... तू जर स्वतःहून रिझाईन केलंस तर बरं होईल... तुला आम्ही 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स देऊ आणि मग तुला दुसरी नोकरी शोधायला वेळही मिळेल"...

हे ऐकताच कामिनीचा चेहरा रडवेला झाला आणि क्षणार्धात तीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले...
"सर प्लीज मला माफ करा.  मी स्वतःला सुधारेन... हवं तर विकेन्डस लाही काम करेन आणि कॉम्प ऑफ ही घेणार नाही..,  प्लीज सर आय रिअली नीड धिस जॉब".. असं बोलून तिचा बांध फुटला...

तेवढ्यात समर घाईघाईने म्हणाला "अरे मी तर मजा करत होतो... तू खूप छान काम केलं आहेस आणि त्यामुळे तुला टॉप रेटिंग मिळालंय.. रिलॅक्स यार"..हे ऐकताच कामिनीच्या जीवात जीव आला आणि ती "थँक्यू सर" म्हणाली.. मग स्वतःला सावरत ती म्हणाली "सर प्लीज अशी जीवघेणी चेष्टा नका ओ करत जाऊ.. त्रास होतो अशाने"..

त्यावर समर मोठमोठ्यानी हसत म्हणाला, "अरे मी तर नेहेमीच अशी चेष्टा करतो, डोन्च यु नो येट"???

खरोखरच ही काही समरनी केलेली पहिली चेष्टा नव्हती... मागे एकदा लंच ब्रेक मध्ये त्याने एकाच्या सॅकमध्ये रबरी साप टाकला होता...  लंच ब्रेकहून आल्यावर जेव्हा त्या माणसाने डायरी काढण्यासाठी सॅकमध्ये हात घातला तेव्हा डायरीऐवजी त्याच्या हातात रबरी साप आला आणि तो जो मोठ्याने ओरडला की अख्खा फ्लोअर त्याच्या डेस्कपाशी जमा झाला... आणि मग समर त्याचं नेहेमीचं गडगडाटी हास्य करत आला आणि त्याला मजा केल्याबद्दल सॉरी म्हणाला...

अशा अनेक मजा तो आजवर करत आला होता... त्यामुळे लोकांना त्याचा राग येणं स्वाभाविक होतं... तरीही समर लोकांना आवडायचा कारण तो दिलखुलास होता.. तात्पुरती मजा करायचा आणि मग त्या व्यक्तीला सॉरी म्हणून त्या व्यक्तीला कॉफी, स्नॅक्स खायला न्यायचा .. त्यामुळे समोरच्याचा राग लगेच निवळायचा..
कुठल्याही टीम इव्हेंटला तो सगळ्यात आधी दिलदारपणे पैसे द्यायचा.. त्याच्या अंडरच्या लोकांना तो खूप चांगलं रेटिंग द्यायचा त्यामुळे साहजिकच त्याचे ज्युनिअर्स त्याच्यावर खुश होते.. तो स्वतः एक हाय परफॉर्मिंग इंडिव्हिजुल होता.. टेक्निकली तर तो चांगला होताच पण त्याच्या संभाषण चातुर्यामुळे त्याने कंपनीला अनेक क्लाइंट्स मिळवून दिले होते.. साहजिकच मॅनेजमेन्टही त्याच्यावर जाम खुश होतं आणि त्यामुळे  त्याच्या चेष्टेखोर स्वभावाकडे ते आपसूक दुर्लक्ष करायचे

अशातच एक दिवस कंपनीची दिवेआगारला ट्रिप ठरली.... समरची बायको पूर्वा श्रीवर्धनची होती... त्यामुळे तिनी समरला "मला तुमच्यासोबत न्या आणि माहेरी सोडा" अशी गळ घातली.... "नाहीतर तू ट्रीपला नाही जायचं" असं फर्मान तिनी सोडलं.. अखेर हो नाही करत करत समर तयार झाला...

शनिवारी संध्याकाळी सगळे दिवेआगारला पोहोचले... आणि मग समर त्याच्या होंडा सिटीतून पूर्वाला श्रीवर्धनला पोहोचवायला निघाला.. हिवाळा असल्यामुळे बऱ्यापैकी अंधार झाला होता... निम्म्या रस्त्यात येऊस्तोवर रात्र झाली होती.. समरला नेहेमीप्रमाणे मजा करायची हुक्की आली... त्यानी गाडीचे हेडलाईट्स बंद केले, पूर्वा किंचाळली "नको ना समर खूप भीती वाटते रे"... मग त्यानी परत हेडलाईट्स चालू केले... कोकणातल्या अरुंद, निर्जन रस्त्यावरची ही त्याची आवडती चेष्टा होती.  संपूर्ण रस्ताभर पूर्वाला घाबरवत तो अखेर श्रीवर्धनला पोहोचला...

सासुरवाडीला समरचं जंगी स्वागत झालं.. कोकणी जेवणावर मनसोक्त ताव मारल्यावर समर काही वेळ सासरेबुवांसोबत गप्पा मारत बसला... दिवाणखान्यातल्या घड्याळात 10 चे टोले झाले आणि समर एकदम उठून उभा राहिला...
"काय झालं ओ जावाईबापू"?
"चला मी निघतो आता दिवेआगारला" - इति समर
"काय???? अहो आज अमावस्या आहे, तुम्ही कृपया उद्या पहाटे निघा"...
"नाही नाही... माझी टीम माझी वाट पहातेय... आय नीड टू गो" असं म्हणत समर लगबगिनी निघाला...
कोणाचंही न ऐकता हट्टी समर गाडी स्टार्ट करून श्रीवर्धनहून दिवेआगारकडे निघाला...

त्याच्या गाडीत ब्लौपंकची भारी म्युझिक सिस्टिम होती... त्यावर जगजितच्या गझल ऐकत तो सुसाट निघाला.. काही वेळाने परत तो सुनसान अरुंद रस्ता सुरु झाला.. समरला तो रस्ता आता पाठ झाला होता..त्याला परत एकदा मजा करायची हुक्की आली... त्यानि हेडलाईट्स चालू बंद करायला सुरुवात केली.... बरोबर सहाव्या वेळी जेव्हा त्यानी हेडलाईट्स चालू केले त्यावेळी त्याला समोर एक लाल साडीतली बाई दिसली.. त्यानी करकचून ब्रेक दाबला पण तोवर ती बाई त्याच्या गाडीला धडकून बॉनेटवर येऊन पडली...

तिचे लांबसडक, अस्ताव्यस्त झालेले केस समोरच्या काचेवर पसरले होते... त्यामुळे समरला नीट काही दिसत नव्हतं... एरवी शूर असणाऱ्या समरचे पाय आता, त्याच्या नकळत, लटलट कापत होते... थरथरत्या हातानी त्यानी दरवाजा उघडला...
"हॅलो हॅलो" ओरडत तो गाडीच्या पुढच्या बाजूला गेला... त्या बाईकडून काहीही रिस्पॉन्स आला नाही.. समरच्या घशाला आता कोरड पडली.. त्याने उसने अवसान आणत त्या पालथ्या पडलेल्या बाईला सरळ केलं.. गोऱ्यापान चेहऱ्याच्या त्या बाईच कुंकू कपाळभर पसरलं होतं..तिचे डोळे अर्धवट उघडे होते आणि बुबुळ वरती गेल्याने डोळ्यातला नुसताच पांढरा भाग दिसत होता...ते पाहून समरच्या अंगावर सर्रकन काटा आला... तरीही हिम्मत करून समरनी त्या बाईला उचललं आणि मागच्या सीटवर झोपवलं..

टीम मेम्बर्सला कॉल करून हेल्प मागावी म्हणून समरनी मोबाइल हातात घेतला पण दुर्दैवाने मोबाइलला अजिबात रेंज नव्हती... कशीबशी गाडी स्टार्ट करत समर दिवेआगारकडे निघाला... अधून मधून तो मागे झोपलेल्या बाईकडे पहात होता... अमावस्या असल्या कारणाने रस्त्यावर   किर्र काळोख होता... डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसत नव्हतं...एक शार्प टर्न घेतल्यावर त्यानि परत मागे बघितलं आणि त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला...
ती बाई उठून सीटवर बसली होती आणि डोळे सताड उघडे ठेवून समरकडेच पहात होती... हे पाहून समरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी डावीकडच्या झाडावर जाऊन आदळली...
समरचं डोकं दाणकन स्टीरिंगवर आदळलं आणि त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले...

काही वेळाने तो शुद्धीवर आला आणि त्याने घाबरत घाबरत मागे बघितलं... परत एकदा त्याच्या हृदयाचा ठोका चुकला कारण मागच्या सीटवर कोणीच नव्हतं...गाडीचं दार उघडून तो लडखडत्या पावलांनी  बाहेर आला.. ती बाई कुठेच दिसत नव्हती.. तेवढ्यात त्याला डावीकडच्या झाडीतून रडण्याचा आवाज ऐकू आला..

मनाचा हिय्या करत समर झाडीत उतरला... जसजसा तो पुढे जात होता तसतसा त्याला रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला.. समोर आलेलं झुडूप त्यानी हातानी बाजूला केलं आणि त्याला समोर जे दिसलं ते पाहून त्याची जाम टरकली..
ती बाई एका झाडाखाली बसून हुंदके देत होती.. तिची मान खाली होती आणि त्यामुळे तिचे लांबसडक केस जमिनीपर्यंत पसरले होते... उरलीसुरली हिम्मत गोळा करत समर त्या बाईपाशी पोहोचला आणि त्याने तिच्या खांद्याला स्पर्श केला....
तत्क्षणी  त्या बाईने डोके वर उचलले आणि समरकडे पहात भेसूर आवाजात खदखदा हसू लागली....

भर थंडीत समरला दरदरून घाम फुटला आणि मागे वळून तो अडखळत्या पावलांनी धावायला लागला.. तेवढ्यात एक मोठया दगडाला त्याची ठेच लागली आणि तो खाली कोसळला

अचानक रोडवरून गलका ऐकू आला आणि दहा बारा लोक समरकडे धावले... "कशी वाटली आमची गंमत समर/सर?? घाबरलात की नाही"??
ती लाल साडीतली बाईसुद्धा हसत हसत आली आणि बाकीच्यांना टाळी देत म्हणाली "ऐ काय रे कसलं डेंजर नाटक करवलं तुम्ही माझ्याकडून.. परत नाही हां असं करणार कधी"...

एवढा गोंधळ होऊनही समर उठला नाही.. ते पाहून सगळे चिडीचूप झाले ... लगेच एकानी समरला गदागदा हलवलं पण समरनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही... शेवटी त्याने समरच्या छातीपाशी कान नेऊन हृदयाचे ठोके चालू आहेत का ते पाहिलं.. दुर्दैवाने तीव्र धक्क्याने समरचं हृदय बंद पडलं होतं..

पदोपदी सगळ्यांची चेष्टा करणाऱ्या समरच्या टीममेट्सनी केलेली एकमेव चेष्टा त्याच्या जीवावर बेतली होती

7 comments:

Shantanu said...

भयानक...
दरदरून घाम फुटला साहेब....
सगळ्या प्रकारचं लिखाण तू उत्तम प्रकारे करू शकतोस यार.....

Shantanu said...

भयानक...
दरदरून घाम फुटला साहेब....
सगळ्या प्रकारचं लिखाण तू उत्तम प्रकारे करू शकतोस यार.....

Swapnil said...

मस्त, थरथराट, भारी जमलीय कथा, अगदी म्हणजे अगदी खरी खुरी वाटतीये

होंडा सिटी ☺ हाहाहा,

Unknown said...

Horrible... husshhhh... great kalpnashakti...

Hrushikesh Thite said...

धन्यवाद शंखा, स्वप्नील न, प्रिया :-)

Sameer Anil Thite said...

ह्रषी...बहुतेक भयकथा आपल्या 'अनपेक्षित' गुणधर्मामुळे खिळवून ठेवतात. तूही असंच केलंस... अभिनंदन. नारायण धारप, रत्नाकर मतकरींच्या मराठी आणि Edgar Allan Poe च्या इंग्रजी भयकथा अवश्य वाच. शुभेच्छा!

Sameer Anil Thite said...

ह्रषी...बहुतेक भयकथा आपल्या 'अनपेक्षित' गुणधर्मामुळे खिळवून ठेवतात. तूही असंच केलंस... अभिनंदन. नारायण धारप, रत्नाकर मतकरींच्या मराठी आणि Edgar Allan Poe च्या इंग्रजी भयकथा अवश्य वाच. शुभेच्छा!