Tuesday, January 8, 2013

माझे ह्या वर्षीचे संकल्प

नवीन वर्षाची सुरुवात झाली की काहीतरी संकल्प करायची सुरसुरी येते. ९९% संकल्प हे मागील वर्षी केलेले आणि पूर्ण न झालेले असतात. वर्ष सुरु झालं की

अ] डायरी (जास्तीत जास्त १५ दिवस नियमित नोंदी केल्या जातात) घेतली जाते
ब] कालनिर्णय (ज्यात इंग्रजी तारखेखाली तिथी, अमुक महाराजांची पुण्यतिथी, त्याच्याखाली "१ लिटर दुध चालू" किंवा "कामवालीला पगार दिला" अशी घरगुती माहिती लिहीली जाते) घेतलं जातं
क] संकल्प केले जातात.

संकल्पांना आपण विकल्प समजून काही दिवसांनी ऑप्शनमधे टाकतो.  जे थेट पुढच्या वर्षीच परत डोकं वर काढतात.  अर्थात संकल्प करण्यात जी मजा आहे ती त्याच्या अंमलबजावणीत नक्कीच नाही हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो.  उदाहरणार्थ, ह्या वर्षी व्यायाम सुरु करणार ह्याचा चारचौघात, घरच्यांसमोर गाजावाजा करण्यात जी मजा आहे ती वर्षभर नियमितपणे तो करण्यात नाही.  संकल्प सिद्धिस नेला की एकतर पुढच्या वर्षी नवीन संकल्प शोधावा लागतो आणि "ह्या वर्षी तरी हा संकल्प पुरा करणार का?" ही भोवतालच्यांची उत्सुकता पहायला मिळत नाही. जशी काही प्रकारची दारू जेवढी जुनी होत जाते तेवढी त्याची किंमत वाढत जाते तसंच काहीसं संकल्पाबाबत असावं. संकल्प जेवढा जुना (म्हणजे आजपर्यंत तडीस न नेता आलेला) तेवढी त्यातली रंगत वाढत जाते.

ह्या वर्षी म्हटलं ते काही नाही. ह्यावेळी संकल्प पूर्ण करूनच दाखवणार. खरंतर आपण जे संकल्प करतो ते बर्‍याचदा आवाक्याबाहेरचे असतात. ह्या वर्षी ठरवलं की सहज साध्य होणारेच संकल्प करूयात.

१. १२ च्या आधी झोपणार नाही.  १०.३०-११ ला झोपलं की उगीचच पेन्शनर असल्यासारखं किंवा म्हातारं झाल्याचा फील येतो.

२. घरी कपड्यांना इस्त्री करून स्वावलंबी होण्याऐवजी कपडे इस्त्रीवाल्याकडेच देईन.  चांगला आहे बिचारा.. प्रामाणिक आहे. वेळेत कपडे इस्त्री करुन देतो आणि २-५ रुपये सुट्टे नसतील तर पुढच्या वेळी अ‍ॅडजस्ट पण करतो. मागे तर एका कार्यक्रमासाठी झब्बा अर्जंट इस्त्री करून दे म्हटलं तर बाकीच्यांचे कपडे बाजूला ठेवून अर्ध्या तासात दिला.  अजून काय पाहिजे. 

३. गाडी स्वतः पुसायच्या/धुवायच्या फंदात पडणार नाही.  एक दोनदा प्रयत्न केला, नाही असं नाही. पण काचा धुऱकट होतात, त्या फडक्याचे धागे काचेला लागून काचही खराब आणि फडकंही लवकर खराब. आणि नेहेमी गाडी धुणार्‍यापेक्षा जास्त पाणी लागतं स्वत: धुवायला गेलं की.  आधीच पाण्याची बोंब आहे.  नेमकं ज्यावेळी आपण गाडी धुवायला जातो त्याचवेळी गाडी धुणारा शेजारच्याची गाडी धूत असतो. मग उगीचच तो आपल्याकडे रागाने पाहतोय असं वाटायला लागतं. त्यापेक्षा नकोच ते गाडी धुणं.

४. आज आत्तापर्यंत किती कप चहा झाला ते मोजत बसणार नाही. काय होतं की उगीचच गिल्टी फिल करून घेऊन चहा पिण्यातली मजा घालवण्यात अर्थ नाही.  बाकीच्यांना काय काय व्यसनं असतात त्यापेक्षा चहाचं निरूपद्रवी व्यसनं बरं. बरं चहा एकदम बंद केला की बाकीच्यांची पंचाईत होते.  घरी सारखा चहा प्यायला लागलो की घरचे ओरडतात - अरे किती चहा पितो.. चांगला नाही बरं एवढा चहा पिणं.  माझ्या प्रत्येक चहाबरोबर घरचेही अर्धा कप घेतात. तुम्ही का घेता विचारलं की अरे उगीच आता तुला करायचाच होता म्हणून घोटभर माझाही टाकला. मग म्हटलं आपण चहा बंद केला की ह्यांचा घोटभर चहाही बंद होईल. बरं कोणाकडे गेलं की ते पहिला प्रश्न विचारतात - चहा घेणार का? आता नाही म्हटलं की समोरच्याची पंचाईत होऊन जाते. मग लिंबू सरबत तरी घ्या. चालेल म्हटलं की नेमकी घरातली लिंबं संपलेली.  दूध घ्यावं म्हटलं की बर्‍याचदा चहापुरतंच दूध शिल्लक असतं. मग उगीचच समोरच्याला ओशाळल्यासारखं होतं. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावण्यापेक्षा कपभर चहा घेतलेला बरा.

५. रोज सकाळी लवकरच उठलं पाहिजे असं स्वतःवर बंधन घालून घेणार नाही. ३-४ वेळा पहाटेच वीज गेली आणि पंखा बंद झाल्यामुळे जाग आली. ऑफिससाठी निघायला चिक्कार वेळ होता.  काय करावं असा प्रश्न पडला.  बाकीचे कोणीच न उठल्यामुळे स्वतःच चहा करून घ्यावा लागला. पहाटे पहाटे अगदी छोटासा आवाज पण फार मोठा वाटतो आणि त्यामुळे बाकीचे डिस्टर्ब होतील की काय अशी भिती वाटत राहते. त्यामुळे उगीचच स्वत:च्याच घरात दबकत फिरावं लागतं.  फिरायला जावं म्हटलं तर परवाच एकाच्या मागे कुत्री लागून त्यातलं एक त्याला चावलं होतं हे कळल्यामुळे तोही विचार सोडून दिला.  फिरायला जायच्या निदान ४-८ दिवस आधी कॉर्पोरेशनला सांगून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. बरं टीव्ही लावला तर सगळीकडे आध्यात्मिक प्रवचनं, सत्संग चालू.  एकदा तासभर पाहिलं ते आणि त्याच्या प्रभावामुळे अ] जीवन हे मिथ्थ्या आहे ब] पैशाचा मोह फार वाईट  आणि त्याच्या मागे धावण्यात अर्थ नाही हे पटलं आणि तो क्षुद्र पैसा कमवायला ऑफिसला तरी कशाला जायचं असा विचार करून दांडी मारली.  दुसर्‍या दिवशी नॉर्मल झालो पण हकनाक एक कॅज्युअल लिव्ह वाया गेली. तात्पर्य, लवकर उठून नुकसानच जास्त होतं. त्यापेक्षा ऑफिसला जायच्या थोडंसं आधी उठून भराभरा आवरून गेलेलं बरं.

असो.. सध्या तरी हे ५ संकल्प केले आहेत. २०१३ मधे हे विनासायास पूर्ण होतील अशी खात्री वाटते.

1 comment:

Anonymous said...

chhan..lekha aavadala