लाइट गेले, त्यामुळे पंखा बंद झाला आणि पंखा बंद करायचं अन मला जाग यायचं स्विच एकच असल्यासारखं मी खाडकन झोपेतनं जागा झालो. खोलीत चांगलाच उजेड दिसला. हात लांब करुन मोबाईलवर किती वाजले ते पाहिलं. ०९:०० अस दिसताच शिSSSSट अस जोरात ओरडुन पांघरुण बेडच्या दुसर्या कोपर्यात भिरकावुन दिलं. झोपेतनं नुकतच उठल्यावर बहुतेक वेळा आवाज जड असतो. तो इफेक्ट जायच्या आत बॉसला फोन लावला. बर वाटत नाहीये, त्यामुळे ऑफिसला थोडासा उशीरा येईन अस त्याला सांगितलं. लाइट गेल्यामुळे गिझरचा काही उपयोग नाही. त्यामुळे गार पाण्याने पटकन आंघोळ उरकली. बरं वाटत नाहीये अशी थाप मारली खरी पण ह्या गार पाण्यानी खरचचं आजारी पडायचो असा विचार करत घराबाहेर पडलो.
ऑफिसमधे पोहचेस्तोवर १२ वाजुन गेले होते. डेस्कजवळ आल्यावर पाहिलं तर माझ्या जागेवर एक मुलगी बसली होती. अरे मी चुकुन दुसर्याच फ्लोअरला आलो की काय असा विचार करत होतो तेवढयात बॉसनी मागुन येऊन पाठीवर थाप मारली. काय हिरो बर वाटतय का आता? मी आवाज शक्य तितका खोल नेत म्हणालो हां.. ठीक आहे आता. ओके.. मौसमी अशी त्याने माझ्या जागेवर बसलेल्या मुलिकडे बघुन हाक मारली. येस सर अस म्हणत ती पटकन उभी राहिली. ती सर म्हणाल्यावर मी लगेच ओळखलं की ही नक्कीच फ्रेशर आहे. ये अनिश है और अनिश ये मौसमी.... आजसे ये हमारे टीम मे काम करेगी. मग बॉसने तिला काय काय माहिती द्यायची आहे, तिला काय काय येतं ह्याची कॅसेट वाजवायला सुरुवात केली. ओके, आय नो, गॉट इट, आय विल टेक केअर ऑफ इट अशी समारोपाची वाक्यं टाकुन सुद्धा काही उपयोग झाला नाही. शेवटि ए आणि बी अशा दोन्ही साइडची कॅसेट वाजवुन मगच त्याने आमचा पिच्छा सोडला.
मग मी वळुन तिच्याकडे नीट पाहिलं. एकदम टपोरे डोळे होते तिचे. मी तिला बस म्हणालो आणि पलिकडची एक रिकामी खुर्ची ओढुन स्वत:साठी घेतली. मला पटकन तिचं नावच आठवेना. स्वत:चा खुप राग आला. सॉरी आय फरगॉट युअर नेम...मी खजिल होत म्हणालो. ओह.. नो प्रॉब्लेम, मायसेल्फ मौशुमी... अस म्हणत तिनी हात पुढं केला. ते "मौशुमी" ती इतकं छान म्हणाली की बास......... मग हा बॉस मौसमी काय म्हणतो तिला. ते अगदी "मोसमी वारे"तलं मोसमी वाटतं. बरं झालं मी हिला नाव विचारलं; नाही तर मी पण येडछाप सारखं तिला मौसमी म्हणालो असतो. है शाब्बास असं मनाशी म्हणत मी स्वत:ची पाठ थोपटुन घेतली आणि आपला बॉस हा एकदम भुक्कड आहे ह्याची परत एकदा खात्री पटली. "मायसेल्फ अनिश" शक्य तेवढया स्टाइलने म्हणण्याचा प्रयत्न केला.
फार काळ इंग्लिशमधे बोलावं लागलं की मला गुदमरल्यासारखं होतं. "आपको शिफ्ट मे आना पडता है क्या?" असं विचारुन तिनीच माझी सुटका केली. "अरे नही नही.... आज थोडा बीमार था, इसलिये लेट आया." तेवढयात तिचा मोबाइल वाजला. एक्सक्युज मी म्हणत तिनी फोन घेतला. "हां आई पोहोचले मी ऑफिसमधे वेळेवर. हो हो काहीच प्रॉब्लेम नाही आला. आई मी जरा कामात आहे. लंच-ब्रेक मधे करीन फोन. ओके? चल बाय.." अस म्हणत तिनी फोन ठेवला. च्या मारि... ही तर मराठी आहे की. छातीवरुन एकदम इंग्लिशचं दहा आणि हिंदीचं पाच किलोचं वजन उतरल्यासारखं वाटलं. ती माझ्याकडे बघुन हसली. संभाषणाची गाडी परत हिंदी/इंग्लिशकडे जाण्याआधी मी पटकन विचारलं "कुठे रहाता तुम्ही?"
"औंधला!"
"अच्छा!!! मग ऑफिसला कशा येता? वायुने?" (आमच्या ऑफिसच्या बसचं नाव वायु आहे)
"नाही पीएमटीने. सोमवारपासुन येणारे वायुने."
"ओह... आय सी". मग मी तिला प्रोजेक्टची थोडी-फार माहिती दिली. कामाचं स्वरूप समजावलं. तिला काय काय शिकावं लागेल ते पण सांगितलं. हे सगळं ती तिच्या काळ्याभोर,टपोर्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात लक्षपुर्वक ऐकत होती. त्यामुळे मला दडपण आल्यासारखं होत होतं. दहा-पंधरा लोकांसमोर प्रेझेंटेशन देताना येतं तसं टेन्शन यायला लागलं होतं मला. कधी एकदा हे ज्ञानदानाचं कार्य संपवुन संभाषणाची गाडी परत इन्फॉर्मल टॉकवर नेतो असं झाल होतं. तेवढयात बॉसनी तिला बोलावलं. मग टीममधल्या इतरांशी ओळखी, राहिलेलं डॉक्युमेंट सबमिशन, इंडक्शन ह्यातच तिचा उरलेला दिवस गेला. जाताना मला आवर्जुन बाय करुन गेली. मी ऑफिसमधे बारा वाजता उगवल्यामुळे नेहेमीसारखं सात वाजता निघणं काही बरोबर दिसलं नसतं.
आम्हाला दोघांना एकाच मॉडयुलवर काम करायचं असल्यानं तिला माझ्या शेजारचाच पीसी मिळाला. थोडयाच दिवसात माझ्या लक्षात आलं की मौशुमी खुप बडबडी आहे. एकदम छान टयुनिंग जमलं आमचं मग. एकदा असचं बोलता बोलता तिला म्हणालो "पहिल्यांदा तुझ्या नावावरुन मला वाटलं की तु बंगालीच आहेस. पण तुला तुझ्या आईशी बोलताना ऐकलं तेव्हा कळालं की तु मराठी आहेस ते." त्यावर माझ्याकडे रोखुन पहात ती म्हणाली "अरे मी अर्धवट आहे."
"म्हंजे?"
"म्हणजे मी अर्धी बेंगॉली आणि अर्धी मराठी आहे. माझे पपा बेंगॉली तर ममी मराठी आहे. लव मॅरेजे त्यांचं.. मग झाले की नाही मी अर्धवट." डोळे मिचकावत ती म्हणाली.
"तुझ्या ह्या असल्या लॉजिकनी मला तर पुर्णचं वेडा म्हणावं लागेल." ह्यावर ती एकदम खळखळुन हसली. "यु आर टु मच ऍनी!!!" ऍनी........वा काय मस्त शॉर्टफॉर्म केलाय माझ्या नावाचा. नाहीतर माझे आई-बाबा. बाबा अन्या म्हणतात (एकदम चमन वाटतं ते) तर आई त्याच्यापेक्षा भारी नावानी हाक मारते - "अनु" म्हणुन. किती वेळा सांगितल आईला की ते मुलीचं नाव वाटतं. पण त्यावर तिचं एकच ठरलेलं उत्तर "तुम्हा मुलांना नाही कळणार आईचं प्रेम कधी". आता काही तरी संबंध आहे का त्याचा प्रेमाशी? पण आईला कोण समजावणार?
एक दिवस माझ बॉसशी कडाक्याचं भांडण झालं. माझा एकदम मुडच गेला मग. मी उदासपणे कॅंटीनमधे बसुन चहा पित होतो. तेवढयात मौशुमी आली. माझा उतरलेला चेहेरा पाहुन म्हणाली "काय रे तुझा असा रामदीन का झालाय?"
"रामदीन? म्हंजे?"
"अरे कोणी असा दीनवाणा किंवा बापुडा चेहेरा करुन बसलं की आम्ही त्याला रामदीन किंवा दिनदयाळ म्हणतो." मला मनापासुन हसु आलं.
"बरं काय झालं ते पटकन सांग बघु." मग मी तिला काय झालं ते सगळं सांगितल.
"एवढच ना? मग त्यात इतकं उदास व्हायला काय झालं? झालं गेलं विसरुन जा आता. पहिले तुझा मोबाइल स्विच ऑफ कर. गोविंदाचा एक धमाल पिक्चर आलाय. तो पहायला जाऊ. उद्याचं उद्या पाहु. मला काहीही कारणं नकोयेत तुझी." मग आम्ही तो पिक्चर पाहिला. एकदम दिलखुलास हसत होती ती प्रत्येक जोकला. माझा पण मुड एकदम फ्रेश झाला. पिक्चर संपल्यावर म्हणाली "चल आता मी तुला कलकत्त्याला नेऊन आणते."
"म्हंजे?"
"चल रे तु फक्त. प्रश्नच फार असतात तुझे."
ती मग मला चतुश्रुंगी पासल्या 'राधिका' नावाच्या बंगाली मिठाईच्या दुकानात घेऊन गेली. मी रसगुल्ले खाल्ले होते आधी पण तिनी मला 'खीरकदम' आणि 'संदेश' खाऊ घातले. खीरकदम तर जाम आवडलं आपल्याला. एकदम टकाटक मुड झाला मग माझा. शेवटी जाताना मी तिला थॅंक्स म्हणालो. त्यावर म्हणाली "अरे थॅंक्स नको म्हणुस. आता माझा जर कधी मुड गेला तर तुला पण माझ्यासाठी असचं काहितरी करावं लागेल."
पण तिनी तशी संधी कधी दिलीच नाही मला. कायम उत्साही आणि आनंदी असायची ती. एके दिवशी ऑफिसमधे यायला मला परत एकदा उशीर झाला. पाहतो तर काय मौशुमी बॉसला खुप बोलत होती. तु वेळेत काम पुर्ण करत नाहीस. जबाबदारी घेत नाहीस असं काहितरी बोलला तिला तो. त्यावरुन हे जोरदार भांडण चालु होतं. बॉस मात्र आत्ता काहीच बोलत नव्हता तिला. मला एकदम आश्चर्य वाटलं. आम्हाला कायम धारेवर धरणारा हा माणुस तिचं मात्र शांतपणे ऐकुन घेत होता. दुसर्या दिवशी तो ऑफिसला आलाच नाही. संध्याकाळी समजलं की त्याचा चार वर्षॉंचा मुलगा अचानक गेला म्हणुन. लगेच आम्ही त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो आणि हॉलच्या कोपर्यात मान खाली घालून चुपचाप बसलो. हळुच एकदा मान वर करुन पाहिलं - रडुन रडुन बॉसच्या बायकोचे डोळे सुजले होते. बॉस तर एकदम उध्वस्त झाल्यासारखा दिसत होता. तेवढयात मौशुमी उठली आणि सगळी सुत्र तिनी हातात घेतली. जे कोण लोक भेटायला येत होते त्यांच्याशी जुजबी बोलणं, कोणाला काय हवं नको ते बघणं, लॅंडलाइनवर आलेले फोन घेणं हे सगळं ती न सांगता हॅंडल करत होती. निघताना तिनी बॉसला सांगितल की तुम्ही एवढयात येऊ नका ऑफिसला. आम्ही सर्व हॅंडल करु. नंतरचे जवळजवळ दहा बारा दिवस ती सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत ऑफिसमधे थांबायची. सगळ्यांशी कोऑर्डिनेट करुन बॉसची बर्यापैकी कामं/जबाबदार्या सांभाळल्या तिनं. तिच्या स्वभावातली ही दोन्ही टोक पाहुन मी अवाक झालो.
चांगल्या माणसांच्या सहवासाला अल्पायुषी असण्याचा शाप असावा बहुदा. काही दिवसांनी तिच्या घरच्यांनी कलकत्त्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. तिलाही त्यांच्यासोबत जाणं भाग होतं. ऑफिसमधे सेंड-ऑफच्या वेळी तिचा सगळ्यात चांगला मित्र म्हणुन मला दोन शब्द बोलायला सांगितल बॉसनी. "मौशुमी थॅंक्स फॉर एव्हरीथिंग" एवढच बोलु शकलो मी. निघताना सगळ्यांचा निरोप घेऊन शेवटी ती माझ्या इथे आली. माझा चेहेरा पाहुन म्हणाली "आता परत तुला रामदीन म्हणायला नको लाऊस हां...". तिला जाताना पाहुन नकळत डोळ्यांतुन पाणि आलं. तिनी जर मला अस रडताना पाहिल असतं तर कोणत नाव दिलं असतं ह्याचा विचार करुन मला एकदम हसु आलं.
6 comments:
the sotry was good. sometimes u come across such kind of people in ur life.
Too gud story. Hey 'kheer kadam' vaigare. Is this a coincidence??
झकास गोष्ट. प्रवाही आणि वेगवान. भाषा अतिशय नैसर्गिक. नेहमींची बोलीभाषा. या अकृत्रिम भाषेमुळे जास्त मजा आली.
लांबी देखील नेटकी. त्रोटकहि नाही वा लांबलचकहि नाही. मस्त.
सुधीर कांदळकर
एकदम छान गोष्ट. सत्य घटना आहे काय?
Chhan lihalay Hrishikesh !
Good one.
I liked it very much. I would have proposed her!! ;-)
Post a Comment