Sunday, July 9, 2017

मी टाईपरायटर बोलतोय

माझ्या प्रिय मित्र/मैत्रिणींनो,

मी टाईपरायटर बोलतोय.. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ह्या निर्जीव टाईपरायटरला अचानक वाचा कशी फुटली? दिवा विझण्याआधी जसा अचानक मोठा होतो ना तसाच तुम्हां सगळ्यांचा शेवटचा निरोप घेण्याआधी परमेश्वराने मला वाचा बहाल केली असावी...

तसा मी दीर्घायुषी बरंका.. जेव्हा तुमचे आजोबाही जन्मले नसतील त्या काळात, साता समुद्रापलिकडे, अमेरिकेत माझा जन्म झाला.. सगळं जग पादाक्रांत करत करत भारतात यायला मला जरा उशीरच झाला..
पण तुम्ही लोकांनी मला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला तो आश्चर्यकारकच होता...
रेमिंगटन, गोदरेजसारख्या मोठमोठ्या कंपनीज मला तयार करायला पुढे सरसावल्या.. आधी फक्त इंग्लिश मग मराठी, हिंदी अशा तुमच्या स्थानिक भाषांकरीताही माझे कीबोर्ड बनू लागले...

न्यायालयात, शासकीय कार्यालयांत, सार्वजनिक, खाजगी क्षेत्रात अशा सगळीकडे माझा बोलबाला सुरू झाला आणि मग हळू हळू प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात, गावात टंकलेखन संस्थांचा उदय झाला.. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, दहावी/बारावी झालं की टायपिंग शिकायला मुला/मुलींची झुंबड उडू लागली.. नोकरीच्या मुलाखतीसाठी टायपिंगचं सर्टिफिकेट अनिवार्य होऊन गेलं.. आणि काय सांगू, मला ह्या जगाचा अनभिषिक्त सम्राट असल्याची जाणीव व्हायला लागली...

खरं सांगू, माझी जन्मभूमी जरी अमेरिका असली ना तरीही मला तुम्हां भारतीयांकडूनच भरभरून प्रेम मिळालंय.. तुम्ही लोकं तुमची मुलं दमून भागून अस्ताव्यस्त झोपली की हळूच त्यांच्यावर मायेचं पांघरूण घालायचे ना तसंच तुमच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये लोकांनी दिवसभर मला यथेच्छ वापरलं की शेवटी तुम्ही मला मायेने कव्हर घालायचे.. तुमच्या मुलांसारखंच मग मीही गाढ झोपी जायचो... आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवायचे ना तसंच मलाही कव्हर काढून, व्यवस्थित पुसून पहिल्या बॅचसाठी तयार करायचे...

मी वरकरणी जरी निर्जीव यंत्र वाटत असलो ना तरी माझ्याही अंगावर रोमांच उभे रहायचे, आनंदानी मीही बहरून जायचो..
तुमच्या कोणत्यातरी एका सणाला तुम्ही लोकं हळद, कुंकू, फुलं वाहून माझी पूजा करायचे... त्यावेळी माझा ऊर अभिमानाने भरून जायचा.. त्यावेळी कदाचित तुम्हाला माझ्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू दिसले नसतील.. पण खरंच सांगतो मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं..

आज मागे वळून पाहताना जाणवतंय की तुम्हां सगळ्यांच्या प्रत्येक सुख दुःखाचा मी साक्षीदार राहिलो आहे..
इन्स्टिट्यूट/जॉबवर्क सुरू केल्यानंतरचा तुमचा संघर्षाचा काळ, लग्नकार्य, नव्या घरात प्रवेश, मुलांची शिक्षणं अशा प्रत्येक प्रसंगी तुमच्या घरातलाच एक सदस्य असल्याची जाणीव होत राहिली... तुमच्या यशापशयात आपण दोघेही एकमेकांना घट्ट धरून वाटचाल करत राहिलो, अजून काय पाहिजे?

टायपिंगच्या परीक्षांच्या वेळी तुम्ही मला हातगाडी, रिक्षा, टेम्पो जे साधन मिळेल आणि मुख्य म्हणजे परवडेल त्यात घालून परीक्षा केंद्रात न्यायचे...तेव्हा मला हादरे बसायचे, हाडं खिळखिळी व्हायची पण केवळ तुमच्या प्रेमाखातर मी सगळं सहन करत आलो आहे... नाही नाही तक्रार करत नाहीये पण आजची ही शेवटची संधी समजून माझं मन मोकळं करतोय..

asdf ;lkj पासून ते थेट लेटर, स्टेटमेंट, स्पीड पॅसेज पर्यंतची माझ्या मित्र मैत्रिणींची प्रगती पाहिली की सगळे कष्ट विसरायला व्हायचे...मला हात असते ना तर मी नक्कीच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असती..

मी यशाच्या शिखरावर होतो आणि मग संगणक क्रांती झाली...
घराघरात, गावागावात संगणक पोहोचले आणि मला कळून चुकलं की ह्या झंझावतात माझा फार काळ निभाव लागणार नाही..
बदल हा सृष्टीचा नियमच आहे म्हणा...जिथे अवाढव्य, सर्वशक्तिशाली डायनासोर पृथ्वीच्या उदरात गडप झाले तिथे माझ्यासारख्या एका छोट्या यंत्राचं काय घेऊन बसलात..

आता ही येणारी परीक्षा संपली की माझाही खडखडाट थांबणार..आणि मग माझं काय करायचं हा प्रश्न तुमच्यापुढे उभा राहील.. तुमच्यातले काही जण मला कवडीमोल भावात विकून टाकाल...काहीजण ओळखीच्या लोकांत वाटून टाकाल...काही जणांना मला निरोप देणं जड जाईल, काही प्रॅक्टिकल (माझ्या अमेरिकेत आहेत तशी) लोकं म्हणतील एवढं काय मनाला लावून घ्यायचं? निर्जीव यंत्रच होतं ना ते.. ते ऐकून कदाचित मला वाईट वाटेल.. तुमच्या आठवणींत तरी मला जिवंत ठेवाल ना? असा विचारायचा मोहसुद्धा होईल..

बघा, तुम्ही भारतीयांसोबत राहून मीही इमोशनल बनलो आहे.. संगत का असर, दुसरं काय? :-) अलविदा!!!!

1 comment:

वृंदावनी said...

हे वाचून मनाला असा विचारतरंग स्पर्शून गेला की, typewriter नावाचा मित्र समोर बसून माझ्याशी बोलत आहे आणि तो 'आम्ही जातो आमच्या गावा' याप्रमाणे विनवणी करून आता निघालाय. आणि आमची नवी पिढी त्याच्या सहवासाला मुकली. पण अजूनही मन त्याला असं सांगू पाहत आहे की, आमच्याशीही मैत्री कर.
खूप छान ऋषी सर.