चित्रपट हे गेल्या कित्येक वर्षांपासुन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. सगळ्यात पहिला चित्रपट कोणता पाहिला हे काही एवढं आठवत नाही. पण जेवढया वेगाने अभ्यासातला रस संपत गेला तेवढयाच, किंबहुना जरा जास्तच, वेगाने चित्रपटातला रस वाढत गेला.
माझ्या आधीच्या पिढीला देव-राज-दिलीप ह्या त्रिकुटाचं आकर्षण होतं पण मला मात्र ते काही विशेष वाटले नाहीत. देव आनंदचा पाहिलेला अव्वल नंबर आणि न पाहिलेले सेंसॉर, लव @ टाईम्स स्क्वेअर हे चित्रपट त्याच्याविषयीचा आदर वाढवायला पुरेसे होते.
राज कपूर बद्दल तर काही बोलायलाच नको. त्याचा संगम हा चार तासांचा चित्रपट मी प्रत्येक वेळी दोनच तास पाहू शकलो. राम तेरी गंगा.. हा चित्रपट पाहुन तर त्याच्याविषयीचा आदर एकदमच दुणावला.
दिलीप कुमारचा सौदागर हा एक चित्रपट पाहिल्याचं आठवतं. ती वेळ खरं तर त्याची वानप्रस्थाश्रमाकडे जायचीच होती. पण नंतर त्याचा मुकुल देव (हे नाव पण आठवत नसेल तुम्हाला)आणि ममता कुलकर्णी (हि वाटयाला आलेल्या कमीत कमी भुमिकेत जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करून मिळालेल्या संधीचं सोनं करायची) सोबत किला (म्हणजे मराठीतला किल्ला) नामक प्रचंड टुकार चित्रपट आला . आपल्या सुदैवाने नंतर त्याने लवकरच चित्रपट संन्यास घेतला.
धर्मेंद्र हा एक बर्याच काळापासून दर्शन देत आलेला आहे. तो आधी खरोखरच देखणा दिसायचा. पण आता तो एकदमच खप्पड दिसतो. धर्मेंद्र आणि "कुत्ते कमीने" संवादाचं एकदम पक्कं समीकरण बनल आहे. मला वाटतं गांधीजी मरताना जसे "हे राम" म्हणाले होते तसे धर्मेंद्र मरतानाही "कुत्ते कमीने" म्हणूनच शेवटचा श्वास घेईल. त्याचा एक चित्रपट आठवतो ज्यात त्याने दोरखंडाच्या सहाय्याने एक विमान रोखून धरल होतं. अशा अनेक अतर्क्य गोष्टी त्याने चित्रपटात केल्या आहेत.
जितेंद्र हा त्याच्या पांढर्या बुटांमुळे लक्षात राहिला. त्याच्या विशिष्ट प्रकारच्या नाचण्यामुळे त्याला "जंपिंग जॅक" म्हणायचे. त्याने मात्र प्रेक्षकांना फार काळ त्रास दिला नाही. त्याचा उधार की जिंदगी हा शेवटचा चित्रपट होता (ज्यामधे काजोलने पदार्पण केल होतं). बहुदा नंतर त्याला कोणी कामच दिल नसावं. नंतर त्याने त्याच्या मुलाला तुषार कपूरला आणुन चांगलाच सूड उगवला.
मध्यंतरी मिथुन चक्रवर्तीचे प्रत्येक वर्षी नियमितपणे बी-ग्रेड चित्रपट यायचे. अगदी इथुन तिथुन मिथुनच दिसायचा. त्याला म्रुगया आणि अग्निपथ ह्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं ह्यावर विश्वासच बसत नाही. त्याचे काही संवाद एकदम भन्नाट असायचे. उदाहरणार्थ: "तेरे नाम का कुत्ता पालू", "तेरी जात का बैदा मारू","तेरी आपडी की टोपडी","दिखने मे बेवडा... भागने मे घोडा... और मारने मे हथोडा"
नाना पाटेकरचे तिरंगा, क्रांतीवीर हे चित्रपट मात्र एकदम आवडून गेले। "ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून" वाल लॉजिक एकदम पटुन गेलं. त्याचा तो आक्रस्ताळेपणा, आरडाओरडा आणि त्याला मिळालेली बेफिकीर व्रुत्तीची जोड ह्या सगळ्यानी मनाचा ताबाच घेतला. नंतर त्यानी स्वत: दिग्दर्शित केलेला प्रहार हा देखील त्याच्या वेगळेपणामुळे लक्षात राहिला.
नानाचा भाऊ शोभेल असा दुसरा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याच्या घायल, घातक आणि दामिनी सारख्या चित्रपटांनी वेड लावल होतं. त्याच्या बलदंड शरीरयष्टीमुळे त्यानी केलेली तुफान मारामारी, जोशपूर्ण संवाद एकदम खरे वाटुन जायचे. ये ढाई किलो का हाथ, मुझे जिंदा छोडोगे तो पछताओगे इन्स्पेक्टर, तारीख पे तारीख, ऊतार के फेंक दो ये वर्दी और पेहेन लो बलवंत राय का पट्टा अपने गले मे सारखे संवाद अंगात एकदम वीरश्री आणायचे. (लगेच घरातल्या तक्क्याला बलवंत राय मानून त्याला लाथा-बुक्क्या घालायचो आणि अंगातली वीरश्री शांत करायचो.)
नंतर नंतर सनी देओलचा फनी देओल होत गेला. गदर मधे तर तो अक्षरश: जमिनीतून बोअरिंग उचकटून १०-५ लोकांना त्याने मारताना दाखवला आहे. त्याच्या हाणामारी आणि संवादांमधे तोचतोचपणा येऊ लागला. ह्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्याची आणि घायल,घातक,दामिनी फेम राजकुमार संतोषींची जोडी फुटली.
No comments:
Post a Comment