Wednesday, January 27, 2016

केळशी

26 जानेवारीला मंगळवार आलेला पाहुन एखाद्या सराईत सुट्टीटाक्यासारखी मी पटकन 25 ची लिव्ह रिक्वेस्ट टाकली. चीते की चाल, बाझ की नजर और हृषी के लीव्ह प्लानिंग का कोई मुकाबला नहीं असा उगीचच आत्मप्रौढीचा एक टुकार डायलॉग सुचला :-)

असो, 4 दिवस तंगड्या वर करुन लोळत पडण्याच्या आळशी महत्वाकांक्षेला बायकोनी पहिला सुरुंग लावला.  ऑफिसात जाणार नसशील तर ट्रिप ला जायच असा एक क्रूर फतवा निघाला.  26 जानेवारीला सोसायटीत झेंडावंदन,राष्ट्रगीत असतं असा मी तत्परतेनी युक्तीवाद केला. त्यावर, इतर वेळी महत्वाची कामं हमखास विसरणाऱ्या बायकोनी, स्मरणशक्तीला जराही ताण न देता, गेले 3 वर्ष मी 26 जानेवारीची सकाळ अंथरुणात लोळत काढत आलो आहे अशी (न विचारता) माहिती पुरवली. आता चारीमुंडया चित झाल्यामुळे ट्रिप च ठिकाण शोधणं क्रमप्राप्त झालं.

एकंदरीतच मला गजबजलेल्या ठिकाणी ट्रिप ला जायचा तिटकारा. त्यामुळे फार लांब नाही आणि तुरळक गर्दीचं ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातलं केळशी फायनल केलं.
 (आणि तिसरं सर्वात महत्वाचं पण सीक्रेट कारण म्हणजे समुद्रकिनारी ट्रिप ला गेल्यावर फार काही धावपळ करावी लागत नाही.. सकाळ, संध्याकाळ बीचवर निवांत जाऊन बसलं की झालं :-)) आमचे एक नातेवाईक नुकतेच केळशीला जाऊन आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून तिथल्या मुक्कामाचा पत्ता घेऊन चटदिशी बुकिंगपण करून  टाकलं. आता ह्या फास्टट्रैक कामगिरीवर खुश होईल ती बायको कसची. (नेहमीसारखच ह्याही वेळी)नेट वर सर्च न करता (आळशासारखं) आयतं बुकिंग पदरात पाडून घेतलं हे ऐकावं लागलं.

अखेर केळशीला जायचा तो डी-डे उगवला. कोकण म्हणजे खराब रस्ते ही खूणगाठ मी आधीच मनाशी बांधली होती, त्यामुळे प्रवासाचा काही त्रास जाणवला नाही. आणि तसपण मला मुक्कामी पोहोचण्यापेक्षा जातानाचा प्रवास जास्त आवडतो. एखाद्या ठिकाणी चहा, मिसळ हादडावी, पुढं जाऊन मग उसाचा रस प्यावा आणि मग ड्राईवर ला झोप येते ह्या सबबीखाली परत एक दोन चारदा चहा मारावा ह्या माझ्या सुखकर प्रवासाच्या कल्पना :-) बायकोनी किंवा आणि कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर बघा तुमच्यासाठी एवढी ट्रिप काढतोय मग स्वतःसाठी एवढं पण करू नको का? हे नेहमीचं यशस्वी इमोशनल ब्लैकमेलिंग कामी येतं :-)

माणगाव, मंडणगड ही मोठी गावं सोडली आणि मग खरा कोकण सुरु झाला. लाल मातीचा धुराळा आणि ती माती अंगावर पडल्यामुळे कुस्ती खेळून आल्यासारखी दिसणारी रस्त्यालगतची झाडे,झुडपे.. अधुन मधून दिसणारी ऊंच, शिडशिडीत नारळ, सुपारीची झाडं आणि अर्थातच  खरवडून काढल्यासारखे दिसणारे (आणि जाणवणारे) बैलगाडीतून जायच्या योग्यतेचे रस्ते..

रस्त्यावर इतके भयंकर खाचखळगे की शोले मधल्या बसंतीच्या टांग्यासारखं आपल्याही गाडीचं चाक निखळून पडतं की काय अशी धास्ती वाटायला लागली..

केळशीच्या फाट्यावर एका मच्छी विकणाऱ्या आजीबाईनी लिफ्ट मागितली. गाडीत बसल्यावर त्यांनी विचारलं कुठून आला पावनं? पुण्याहून अस सांगितल्यावर त्या म्हणाल्या बऱ्याच लांबनं आलात की. ह्यावर मी बायकोकडे विजयी मुद्रेनी एक कटाक्ष टाकला की बघ किती लांबचं ड्राइविंग करत आलोय आणि त्याचं ह्या परक्या आजीबाईनाही कौतुक आहे.  पण पुढच्या क्षणी, पुण्याचं काय घेऊन बसलाय पार  लांब लांबनं लोक येतात इथे अस बोलून त्या आजीबाईनी माझं विमान लगेच खाली उतरवलं. आता ह्या आजीना इथेच उतरवुन द्यावं आणि म्हणावं की ते लांब लांबचे लोक सोडवतील तुम्हाला इथून घरी असा एक असुरी विचार मनात आला पण माझ्यातल्या सहृदयी माणसानी तो लगेच झटकुनही टाकला.

असो, त्या आजींना त्यांच्या घरापाशी सोडल्यावर त्यांनी लगेच मला 20 रुपये देऊ केले.  त्यांना नकार देत पुढं आलो तर बायको म्हणाली तरी सांगत होते दाढी करून ये, जरा बरे कपडे घाल. ती तुला सिक्स सीटर वाली समजली. आणि मग स्वतःच्या जोकवर एकटीच जोराजोरात हसली. नशीब माझा मुलगा झोपला होता नाहीतर पुण्यात परतल्यावर आमच्या बाबांना तिकडे सिक्स सीटर वाले समजले असं सगळ्यांना सांगितलं असतं. आजीना मधेच न उतरवु दिलेल्या माझ्यातल्या त्या सहृदयी माणसावर चरफडत आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो.

ते घरगुती रिसॉर्ट अगदी बीच ला लागुनच होतं. पण आमची रूम आणि वॉशरूम पाहिल्यावर मला एकदम आम्ही लहानपणी वाड्यात राहायचो त्याची आठवण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ओला नारळ किसून, कोथिंबीर भुरभुरून घातलेले चविष्ट कांदा-पोहे खाऊन आम्ही बीचवर गेलो.  इथली वाळू अतिशय मऊ आणि चमकदार. बीच बऱ्यापैकी निर्जन. तो भलामोठ्ठा किनारा पाहून माझ्या मुलानी चपला भिरकावून दिल्या आणि पळत सुटला. मी बायकोचं लक्ष नाही अस पाहून तिथल्या एकमेव झोपडीवजा हॉटेलात चहा ऑर्डर केला (ऑलरेडी दोन कप पीऊन झाला होता :-))

चहा पिऊन मग मुलासोबत खेळायला बीचवर गेलो. मधल्या ओलसर पट्टयात छोट्या किड्यांनी/खेकडयानी छिद्र पाडून घरं बनवली होती. ते तुरुतुरु पळायचे तेव्हा त्यांच्या पायामुळे ठिकठिकाणी टिंबांचे सुबकसे डिजाईन तयार व्हायचे. बरेचसे डिजाईन मला नारळाच्या झाडासारखे वाटले.

बायकोनी मुलाला एक छोटीशी बादली दिली आणि मग आम्ही तिघे शंख शिंपले गोळा करायच्या मोहिमेवर रवाना झालो.  पांढरे शुभ्र, गुलाबी, जांभळे, ऑरेंज कलरच्या अनेक शिंपल्यानी त्याची बादली भरून गेली.  गंमत म्हणजे आम्हाला एकही शंख सापडला नाही. नवीन शिंपला सापडल्यावर प्रत्येक वेळी मुलगा आनंदानी जल्लोष करत होता. गाडया, चॉकलेटं, मोबाईल/टॅब वरचे गेम्स हे मिळाल्यावर होणाऱ्या आनंदापेक्षाही जास्त आणि वेगळा आनंद त्याच्या निरागस डोळ्यात आम्हाला त्यावेळी दिसला. तीच गोष्ट वाळुचा किल्ला बनवताना.  त्याच्यासोबत आम्हीही आमचं बालपण एन्जॉय केलं. सर्वात सुंदर आणि कायमस्वरूपी आनंद देणाऱ्या गोष्टी निसर्गात मोफत उपलब्ध असतात अशा काहीशा आशयाचा एक सुविचार आहे. त्याचा प्रत्यय आम्हाला त्या दिवशी आला. शेवटी कडक ऊन व्हायला लागल्यावर मुलाला नाईलाजानी बळजबरी बीचवरून ओढून न्यावं लागलं.

 पुढच्या दोन दिवसात आम्ही आजुबाजुची ठिकाणं बघितली.  केळशीतच एक याकूब बाबा दर्गा आहे. ते शिवाजी महाराजांचे सातवे गुरु म्हणून ओळखले जातात. तिथे जाताना परत एक आज्जी भेटल्या आणि त्यांना घरी सोडल्यावर त्यांनी पण 20 रुपये देऊ केले. ह्यावेळी, मागल्या वेळेपेक्षा, दाढी  जास्त वाढली होती त्यामुळे त्या आज्जीना मी बेनिफिट ऑफ़ डाउट दिला :-)

नंतर आम्ही अंजर्ले आणि हर्णे (किंवा हरणाई) ही सुंदर गावं/समुद्रकिनारे पाहिले.  अंजरल्याहुन हर्णेला जाताना घाटात अगदी मोक्याच्या ठिकाणी व्हिला 270 म्हणून एक पॉश हॉटेल दिसलं. त्या स्पॉट वरून खाली दिसणारा देखावा अतिशय निसर्गरम्य होता. अथांग पसरलेला निळाशार अरबी समुद्र, त्याला लागून असलेला सुंदरसा किनारा, छानशी कौलारु घरं आणि आजुबाजुला नारळाची झाडं. त्या हॉटेल च ऑनलाइन बुकिंग करता येतं अस समजल आणि मग एक दिवस इथे नक्की रहायला यायचं अशी मनाशी खूणगाठ बांधली.

एक दिवस आम्ही वेळासला गेलो. इथला समुद्रकिनारा तुलनेनी छोटा पण अगदी सुनसान. इथे हजारो कासवं फेब्रुवारी ते एप्रिल च्या दरम्यान  अंडी घालायला येतात आणि चिपळूणची एक संस्था, वेळास ग्रामपंचायतीच्या सहकार्याने त्या अंडयांच संरक्षण करते. ते पहायला खूप पर्यटक येतात. नाना फडणवीस सुद्धा ह्याच गावचे. त्यांचा जुना वाडा पडून तिथे फक्त एक चौथरा शिल्लक आहे. त्यावर नानांचा एक अर्धाकृती पुतळा उभारला आहे. ह्या भागात हॉटेलं जवळपास नाहीच. मग तिथल्याच् एका घरगुती खानावळीत जेवून केळशीला परतलो.

शेवटच्या दिवशी निघायच खर तर अगदी जीवावर आलेलं.  उसनं अवसान आणून 9 ते 6 च्या रूटीन मधे अडकायला पुण्याकडे परत निघालो. बायको आणि मुलगा जाम खुश दिसले आणि मीही आता पुढचे सात आठ वीकेंड तरी तंगड्या वर करत  आराम करायला मोकळा ह्या आनंदात गाड़ी स्टार्ट केली :-)

Saturday, January 23, 2016

सूर्या....

उठलोय भल्या पहाटे जाब विचारायला त्या लालभडक गोळ्याला, सूर्य नावाच्या पक्षाला...

हेच की रोज पूर्वेकडच्या भांडवलशाही   स्वार्थानी पिचपिचलेल्या प्रदेशातूनच उगवायचा तू ठेका घेतला आहेस का?

अरे तू स्वयंभू आहेस की नाक्यावरल्या शेटजींच्या कोळशाच्या फैक्ट्री चा मुकादम???

तू जोवर येतोस ना तुझ्या आवडीच्या प्रदेशांना प्रकाश बहाल करत आमच्याकडे, तोवर गारठुन गेलेली असतात आमची शरीरे आणि मनेही

एकदा तरी आमच्या इकडून उगवुन बघ जरा, डोक्यावर घेऊन नाचू तुला, भले तुझ्या आगीत आम्ही ख़ाक झालो तरीही

जीवाच्या आकांतानी एवढा आक्रोश करूनही मला पूर्ण खात्री आहे की तू उद्या परत त्याच सुखवस्तु, साखरझोपेत असणाऱ्या श्रीमंत लोकांच्या बंद भिंतींवर ईमान इतबारे प्रकाश फेकत, सवडीने, तुझी चातकासारखी वाट पाहणाऱ्या आमच्याकडे येणार

चूक तुझी नाहिये रे कारण तू आहेस दिलेलं काम निमुटपणे, शुष्कपणे करणारा थंड रक्ताचा एक भावनाविरहीत लालबुंद गोळा........

एक विद्रोही व्हॉट्सऍप कविता

डिस्क्लेमर: ही एक काल्पनिक कविता असून तिचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी/वृत्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा

****************************

मेसेज वाचून ढिम्म पणे आपल्या सुखवस्तु आयुष्यात परतणारी मतलबी गिधाडं,

फक्त मोजक्या उच्चभ्रूनाच छान म्हणणारे  कोत्या वृत्तीचे कावळे,

गुड मॉर्निंग आणि गुड नाईट करुन गपगार पडणारे थंड रक्ताचे अजगर

लांबलचक मेसेज कुरतडल्यासारखा वाचून लगेच वाह वाह करणारे अल्पसंतुष्टी उंदीर,

नविन मेसेज आला की लगेच अधाशासारखा वाचणारे वखवखलेले भुकेले कुत्रे,

ग्रुपवर आलेल्या नविन माणसाचे लचके तोडायला हपापलेला लांडग्यांचा कळप,

दिवसभर नेट बंद ठेवून रात्री सगळे मेसेज वाचणारी वटवाघळं,

ग्रुपवर शांत असण्याचं ढोंग करुन पर्सनल ला हळूच मेसेज करणारे धूर्त कोल्हे,

असे बूर्ज्वा लोक इथे असताना मी का रहावं या वाॅटस्अॅप च्या जंगलात??
...

Tuesday, March 26, 2013

रात




परवा परत एकदा रात बघितला आणि जाणवलं की नव्वदच्या दशकात जेव्हा पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा जेवढा भारावून (इथे घाबरून असं वाचा) गेलो होतो तेवढाच प्रभाव आज १५-२० वर्षांनीही जाणवला.  आपण नेहेमी म्हणतो की हिंदी हॉरर मूव्हीज हॉरर कमी आणि कॉमेडी जास्त वाटतात (रामसे बंधूचे चित्रपट आठवून बघा). खरं आहे ते म्हणा.. चित्रविचित्र चेहेरे, टोमॅटो सॉसनी आंघोळ केल्यासारखं भूत/हडळ, लहानपणापासून फक्त कॅल्शियम खाल्लंय की काय असं दाखवून देणारे लांबलचक दात/सुळे, टूथपेस्ट/टूथब्रशचा शोध अजून लागायचा आहे असं वाटणारे आणि कायम राख/मिश्रीसारख्या पदार्थांनी घासत असल्यासारखे ते काळे़क्कुट्ट दात, एकाचवेळी साधारण १० लाख धूप पेटवल्यासारखा तो धूर आणि त्यातून प्रकट होणारं भूत/हडळ. हेच पहायची सवय लागली होती आपल्याला.

भूताचं फक्त अस्तित्व जाणवून देणं आणि वरती सांगितल्यासारखी रंगरंगोटी न करता सुद्धा हॉरर चित्रपट बनू शकतो हेच आपण विसरलो होतो. अशातच ९२ साली राम गोपाल वर्माचा रात आला.  चित्रपटाच्या पोस्टरवर जरी रामसे बंधूंटाईप लाल डोळ्यावाली, निळ्या तोंडावाली हडळ असली तरी चित्रपटात ते अगदी शेवटी दाखवतात. 

चित्रपट सुरु होतो तो एका सुनसान गावापासून.  एक बस थांबते आणि रेवती बसमधून उतरते. तिला गावात कोणीच दिसत नाही.  इकडे तिकडे भटकून ती एका कारपाशी येते  आणि तिला कारमधे काहीतरी दिसतं (काय ते दाखवत नाहीत, फक्त रेवतीच्या घाबरलेल्या चेहेर्‍याकडे बघून आपल्याला जाणीव होते) आणि ती सैरावैरा पळत सुटते.  अनेक घरांची दारं ठोठावते पण कोणीच उघडत नाही.  शेवटी एक घर तिला उघडं दिसतं आणि ती आत शिरते.  आतल्या खोल्यांची दारं बंद असतात आणि तेवढ्यात आत कोणीतरी येतं (फक्त अस्तित्व) आणि रेवती त्याला/तिला पाहून किंचाळत झोपेतून उठते.  अर्थातच ते तिचं स्वप्न असतं.  

आकाश खुराणा, त्याची बायको रोहिणी हट्टंगडी, मुलगी रेवती, एक नातू (ज्याचे आईवडील अॅक्सिडेंट मधे गेलेले असतात) आणि एक नोकर असे एका बंगल्यात रहायला येतात.  शेजारच्या बंगल्याची एक खिडकी दाखवतात जिथून कोणाच्यातरी श्वासांचा आवाज येत रहातो (एका आजींच्या ज्यांच्या हातात कायम जपमाळ असते). रेवती आणि शेजारच्या बंगल्यातली तिची मैत्रीण कॉलेजमधे शिकत असतात.  ह्या बंगल्याला एक तळघर असतं जिथं अडगळीचं सामान असतं.  रोहिणी हट्टंगडीला तिथे काहीतरी आहे अशी सामान हलवताना शंका येते पण तिला काही दिसत नाही.  तिच्या नातवाला मात्र तिथे एकदा मांजराचं पिल्लू दिसतं आणि मग ते मांजरांचं पिल्लू कायम त्या मुलाबरोबरच रहायला लागतं. 
एकदा आकाश खुराणा ऑफिसला जात असताना त्याच्या गाडीच्या चाकाखाली ते मांजर येऊन मरतं. नोकर लगेच त्या मांजराला पुरतो पण आता त्या मुलाला काय सांगायचं असा प्रश्न सगळ्यांना पडतो.  एक दिवस अचानक ते पिल्लू त्या मुलाच्या रूममधे येतं आणि मुलगा आनंदी होतो.  तेवढ्यात रोहिणी त्याच्या रूममधे येते आणि त्या पिल्लाला पाहून प्रचंड घाबरते.  ती आरडाओरडा करते आणि मग रेवती, तिचे वडील काय झालं ते पहायला येतात. ते तिची अशी समजूत काढतात की ते दुसरं मांजर पण असू शकतं. 

रेवती तिच्या बॉयफ्रेंडसोबत बाईकवर पिकनिकला जाते. परत येत असताना त्यांची गाडी पंक्चर होते.  तो बॉयफ्रेंड एका माणसाकडे लिफ्ट मागून त्याच्यासोबत बदली टायर आणायला जातो आणि रेवतीला तिथेच थांबायला सांगतो.  ती रस्त्याच्या कडेला बसली असतानाच आतून झाडीमधून काहीतरी येताना दाखवतात आणि रेवतीच्या शेजारी आल्यावर तिचे केस वार्‍याने उडतात.  ती नजर वळवते आणि त्या गोष्टीकडे बघते.  त्यानंतर डायरे़क्ट तिचा बॉयफ्रेंड टायर घेऊन परत येताना दाखवला. त्याला रेवती कुठे दिसत नाही. तिला शोधत शोधत तो झाडीत घुसतो. एका तळ्याच्या काठाशी ती मान खाली घालून बसलेली दिसते.  हा तिच्या जवळ जाऊन तिला हाक मारतो, ती डोकं वर उचलते आणि तिचे डोळे घारे झालेले दाखवतात. ते पाहून बॉयफ्रेंड जाम टरकतो आणि तोल जाऊन पाण्यात पडतो.  पुढच्याच क्षणाला ती नॉर्मल होते आणि त्याला म्हणते की तू पाण्यात कसा पडला. ते घरी परत येतात पण ती त्याच्याकडे न बघता, बाय न म्हणता तरातरा चालत घरात जाते आणि तिच्या रूममधे जाऊन झोपते. रात्री उशिरा तिचे आई-वडील येतात आणि नोकर त्यांना सांगतो की रेवती न जेवता झोपली.  तिची आई तिला बोलवायला जाते. रेवती झोपलली असते आणि दरवाज्याकडे तिची पाठ असते.  रोहिणी नाईट लँप लावते आणि रेवती डोळे उघडते. तिचे डोळे परत घारे झालेले दाखवतात. रोहिणी तिच्या जवळ येते (आपल्याला वाटतं की आता काहीतरी होईल) आणि ती झोपली आहे असं समजून नाईट लॅंप बंद करून जाते. 



रेवती, तिचा बॉयफ्रेंड आणि तिची मैत्रीण एका लग्नाला जातात. तिची मैत्रीण ज्या मुलीचं लग्न असतं तिच्या रूममधे जाते. रेवती आणि तिचा बॉयफ्रेंड खालीच बसलेले असतात.  थोड्या वेळानी तिच्या बॉयफ्रेंडशेजारी त्याचा एक मित्र येतो आणि ते दोघं गप्पा मारायला जातात.  अचानक रेवती उठते आणि एका धुंदीत चालायला लागते. जिना चढून ती टेरेसमधे जाते. तिथेच शेजारी तिची मैत्रीण आणि बाकीच्या मुली असतात. रेवतीची मैत्रीण तिला पाहते आणि टेरेसमधे जाते.  रेवती पाठमोरी असते.. ही तिला आवाज देत तिच्या जवळ जाते. रेवती वळते आणि तिचे डोळे परत घारे झालेले असतात.  ती हसते आणि तिच्या मैत्रीणीच्या जवळ जाते.  काही कळायच्या आत रेवती तिच्या मैत्रीणीची मान मुरगाळून टाकते. त्याच ट्रान्स मधे ती खाली येऊन तिच्या बॉयफ्रेंडशेजारी येऊन बसते. थोड्या वेळानी एका बाईला ती जेव्हा टेरेसमधे जाते तेव्हा रेवतीची मैत्रीण मान मुरगळल्याच्या स्थितीत मेलेली आढळते आणि मग ती आरडाओरडा करते.

आकाश खुराणाला एकदा मध्यरात्री तहान लागते. तो स्वयंपाकघरात येऊन फ्रिजमधलं पाणी पितो. तेवढ्यात त्याला वरच्या खोलीतून कोणीतरी भेसूर आवाजात रडताना ऐकू येतं.  तो वरती रेवतीच्या रूममधे पहायला जातो. त्याला रूममधे, अ‍ॅटॅच्ड बाथरूम मधे कोणीच दिसत नाही. त्याला बाल्कनी उघडी दिसते, तिथे तो जातो.  तिथेही त्याला रेवती दिसत नाही. तो पाठमोरा वळतो आणि रेवती समोर उभी असते - घारे डोळे आणि तीच भेदक नजर.  रेवती त्याचा गळा पकडते आणि त्याला जोरात ढकलून देते.  आरडाओरडा ऐकून रोहिणी वरती येते आणि मुलीला पाहून ती पण घाबरते. दुसर्‍या दिवशी ते डॉक्टरांना बोलावतात आणि एकंदर प्रसंग ऐकून ते एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जातात आणि तो तिची ट्रीटमेंट चालू करतो.

इकडे नोकर रोहिणीला सांगतो की तुम्ही शेजारच्या आजींना भेटा त्यांना माहितीये की ह्या बंगल्यात काय झालंय आधी ते.  त्या आजींच्या म्हणण्याप्रमाणे तिथे एका बाईचा तिच्या नवर्‍यानी गळा दाबून खून केला होता आणि मग काही दिवसांनी त्या माणसाचा पण गळा दाबूनच खून होतो जो कोणी केला ते कधीच कळत नाही.  त्या बाईचं भूत अजूनही त्या घरात आहे आणि रेवतीच्या अंगात शिरून तिला त्रास देतंय.  आजीबाई त्यांना एका मांत्रिकाला भेटायला सांगतात (ओम पुरी). 

ओम पुरी त्यांना पाहिल्या पाहिल्या म्हणतो की मला माहितीये तुम्ही माझ्याकडे का आला आहात ते.  तो त्यांच्यासोबत बंगल्यात येतो आणि त्याला जाणवतं की इथल्या तळघरातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो रेवतीच्या बॉयफ्रेंडला ते तळघर खणायला सांगतो. एक-दोन फरशा उकरून काढल्यावर एक मोठ्ठं भुयार दिसतं. हे दोघं खाली उतरतात. थोडंसं पुढं आल्यावर एक किंचित वळण येतं आणि लगेच उजव्या बाजूला एक बाई लाल साडी मधे बसलेली असते (इथे खरंच भिती वाटते).  ओम पुरी लगेच ओळखतो की हीच ती हडळ.  मग तिनी रेवतीचं रूप घेणं आणि मग त्या बॉयफ्रेंडला फसवणं हे सगळं होतं. शेवटी ओम पुरी तिच्या कपाळाला भस्म लावून तिला मुक्त करतो.  इथं मात्र मान्य केलं पाहिजे की ते काळे दात, त्या हडळीचं भस्म लावल्यावर विरघळून जाणं हे थोडं रामसे स्टाईल झालंय खरं.. पण ते अगदी ५ मिनिटांसाठी. 

शेवटी रोहिणी ओम पुरीला विचारते की हे सगळं काय आहे? त्यावर ओम पुरी त्याच्या खास आवाजात सांगतो की "जब रात का अंधेरा होता है तो हम दीप जलाते है.  लेकीन इससे अंधेरा मिट नही जाता.  बल्की एक सीमित दायरे के अंदर रौशनी हो जाती है. पर हम ये भूल जते है की इस रौशनी के दायरे के बाहर जिस अनंत अंधेरेने हमे घेर रखा  है न जाने कुदरतने उसमे क्या क्या छुपाके रखा है. ये एक अनोखी बात है के हम उसीको संसार मानते है जिसे हम समझ सकते है. लेकिन उस अंधेरे से हमे सचेत रहेना है जो अभी तक इन्सानी रौशनी के दायरे मे नही आया. हो सकता है की एक दिन इन्सान उस अंधेरे का रहस्य भी जान ले."


त्या छोट्या मुलाकडे परत मांजर दाखवून चित्रपट संपवला आहे. चित्रपटातले सगळे प्रसंग सांगणं अशक्य आहे.  जेवढे महत्वाचे वाटले तेवढे सांगितले. कलाकारांचा अभिनय (विशेषतः रेवतीचा), बॅकग्राऊंड म्युझिक, दिग्दर्शन ह्या सगळ्या जमेच्या बाजू. राम गोपाल वर्माचा अगदी सुरुवातीचा पिक्चर होता हा.  त्यामुळे मन लावून दिग्दर्शित केल्यासारखा वाटतो. (जसं नोकरीमधे माणूस प्रोबेशन पिरीअड मधे खूप चांगलं काम करतो आणि एकदा पर्मनंट झाला की पाट्या टाकायला सुरुवात करतो तसं).

Tuesday, January 8, 2013

माझे ह्या वर्षीचे संकल्प

नवीन वर्षाची सुरुवात झाली की काहीतरी संकल्प करायची सुरसुरी येते. ९९% संकल्प हे मागील वर्षी केलेले आणि पूर्ण न झालेले असतात. वर्ष सुरु झालं की

अ] डायरी (जास्तीत जास्त १५ दिवस नियमित नोंदी केल्या जातात) घेतली जाते
ब] कालनिर्णय (ज्यात इंग्रजी तारखेखाली तिथी, अमुक महाराजांची पुण्यतिथी, त्याच्याखाली "१ लिटर दुध चालू" किंवा "कामवालीला पगार दिला" अशी घरगुती माहिती लिहीली जाते) घेतलं जातं
क] संकल्प केले जातात.

संकल्पांना आपण विकल्प समजून काही दिवसांनी ऑप्शनमधे टाकतो.  जे थेट पुढच्या वर्षीच परत डोकं वर काढतात.  अर्थात संकल्प करण्यात जी मजा आहे ती त्याच्या अंमलबजावणीत नक्कीच नाही हे मी स्वानुभवावरुन सांगू शकतो.  उदाहरणार्थ, ह्या वर्षी व्यायाम सुरु करणार ह्याचा चारचौघात, घरच्यांसमोर गाजावाजा करण्यात जी मजा आहे ती वर्षभर नियमितपणे तो करण्यात नाही.  संकल्प सिद्धिस नेला की एकतर पुढच्या वर्षी नवीन संकल्प शोधावा लागतो आणि "ह्या वर्षी तरी हा संकल्प पुरा करणार का?" ही भोवतालच्यांची उत्सुकता पहायला मिळत नाही. जशी काही प्रकारची दारू जेवढी जुनी होत जाते तेवढी त्याची किंमत वाढत जाते तसंच काहीसं संकल्पाबाबत असावं. संकल्प जेवढा जुना (म्हणजे आजपर्यंत तडीस न नेता आलेला) तेवढी त्यातली रंगत वाढत जाते.

ह्या वर्षी म्हटलं ते काही नाही. ह्यावेळी संकल्प पूर्ण करूनच दाखवणार. खरंतर आपण जे संकल्प करतो ते बर्‍याचदा आवाक्याबाहेरचे असतात. ह्या वर्षी ठरवलं की सहज साध्य होणारेच संकल्प करूयात.

१. १२ च्या आधी झोपणार नाही.  १०.३०-११ ला झोपलं की उगीचच पेन्शनर असल्यासारखं किंवा म्हातारं झाल्याचा फील येतो.

२. घरी कपड्यांना इस्त्री करून स्वावलंबी होण्याऐवजी कपडे इस्त्रीवाल्याकडेच देईन.  चांगला आहे बिचारा.. प्रामाणिक आहे. वेळेत कपडे इस्त्री करुन देतो आणि २-५ रुपये सुट्टे नसतील तर पुढच्या वेळी अ‍ॅडजस्ट पण करतो. मागे तर एका कार्यक्रमासाठी झब्बा अर्जंट इस्त्री करून दे म्हटलं तर बाकीच्यांचे कपडे बाजूला ठेवून अर्ध्या तासात दिला.  अजून काय पाहिजे. 

३. गाडी स्वतः पुसायच्या/धुवायच्या फंदात पडणार नाही.  एक दोनदा प्रयत्न केला, नाही असं नाही. पण काचा धुऱकट होतात, त्या फडक्याचे धागे काचेला लागून काचही खराब आणि फडकंही लवकर खराब. आणि नेहेमी गाडी धुणार्‍यापेक्षा जास्त पाणी लागतं स्वत: धुवायला गेलं की.  आधीच पाण्याची बोंब आहे.  नेमकं ज्यावेळी आपण गाडी धुवायला जातो त्याचवेळी गाडी धुणारा शेजारच्याची गाडी धूत असतो. मग उगीचच तो आपल्याकडे रागाने पाहतोय असं वाटायला लागतं. त्यापेक्षा नकोच ते गाडी धुणं.

४. आज आत्तापर्यंत किती कप चहा झाला ते मोजत बसणार नाही. काय होतं की उगीचच गिल्टी फिल करून घेऊन चहा पिण्यातली मजा घालवण्यात अर्थ नाही.  बाकीच्यांना काय काय व्यसनं असतात त्यापेक्षा चहाचं निरूपद्रवी व्यसनं बरं. बरं चहा एकदम बंद केला की बाकीच्यांची पंचाईत होते.  घरी सारखा चहा प्यायला लागलो की घरचे ओरडतात - अरे किती चहा पितो.. चांगला नाही बरं एवढा चहा पिणं.  माझ्या प्रत्येक चहाबरोबर घरचेही अर्धा कप घेतात. तुम्ही का घेता विचारलं की अरे उगीच आता तुला करायचाच होता म्हणून घोटभर माझाही टाकला. मग म्हटलं आपण चहा बंद केला की ह्यांचा घोटभर चहाही बंद होईल. बरं कोणाकडे गेलं की ते पहिला प्रश्न विचारतात - चहा घेणार का? आता नाही म्हटलं की समोरच्याची पंचाईत होऊन जाते. मग लिंबू सरबत तरी घ्या. चालेल म्हटलं की नेमकी घरातली लिंबं संपलेली.  दूध घ्यावं म्हटलं की बर्‍याचदा चहापुरतंच दूध शिल्लक असतं. मग उगीचच समोरच्याला ओशाळल्यासारखं होतं. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावण्यापेक्षा कपभर चहा घेतलेला बरा.

५. रोज सकाळी लवकरच उठलं पाहिजे असं स्वतःवर बंधन घालून घेणार नाही. ३-४ वेळा पहाटेच वीज गेली आणि पंखा बंद झाल्यामुळे जाग आली. ऑफिससाठी निघायला चिक्कार वेळ होता.  काय करावं असा प्रश्न पडला.  बाकीचे कोणीच न उठल्यामुळे स्वतःच चहा करून घ्यावा लागला. पहाटे पहाटे अगदी छोटासा आवाज पण फार मोठा वाटतो आणि त्यामुळे बाकीचे डिस्टर्ब होतील की काय अशी भिती वाटत राहते. त्यामुळे उगीचच स्वत:च्याच घरात दबकत फिरावं लागतं.  फिरायला जावं म्हटलं तर परवाच एकाच्या मागे कुत्री लागून त्यातलं एक त्याला चावलं होतं हे कळल्यामुळे तोही विचार सोडून दिला.  फिरायला जायच्या निदान ४-८ दिवस आधी कॉर्पोरेशनला सांगून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. बरं टीव्ही लावला तर सगळीकडे आध्यात्मिक प्रवचनं, सत्संग चालू.  एकदा तासभर पाहिलं ते आणि त्याच्या प्रभावामुळे अ] जीवन हे मिथ्थ्या आहे ब] पैशाचा मोह फार वाईट  आणि त्याच्या मागे धावण्यात अर्थ नाही हे पटलं आणि तो क्षुद्र पैसा कमवायला ऑफिसला तरी कशाला जायचं असा विचार करून दांडी मारली.  दुसर्‍या दिवशी नॉर्मल झालो पण हकनाक एक कॅज्युअल लिव्ह वाया गेली. तात्पर्य, लवकर उठून नुकसानच जास्त होतं. त्यापेक्षा ऑफिसला जायच्या थोडंसं आधी उठून भराभरा आवरून गेलेलं बरं.

असो.. सध्या तरी हे ५ संकल्प केले आहेत. २०१३ मधे हे विनासायास पूर्ण होतील अशी खात्री वाटते.

Thursday, November 10, 2011

टंकलेखन

(हा लेख मी एक टंकलेखनाचा माजी विद्यार्थी ह्या भूमिकेतून लिहित आहे.)

मला आठवत, टंकलेखन शिकण्याची माझी सुरवात "ऐ एस डी एफ, सेमीकोलन एल के जे" ह्या आठ अक्षरांपासून झाली. पहिले काही दिवस तर माझे दोन्ही हात अजिबात उचलले जायचे नाहीत आणि मग अक्षर कागदावर नीट उमटायचीच नाहीत. हात उचलून टंकायला गेल की थोड्याच वेळात हात जाम दुखायला लागायचे. अर्थात काही दिवसातच उचलून टंकायची सवय झाली. स्वत:चा अनुभव आणि इतरांकडे पाहून मला हे लक्षात आल की सर्वाना कधी एकदा वेगात टंकलेखन करतो ह्याची घाई झालेली असती. आमच्या संस्थेत "accuracy first then speed" चे बोर्ड बऱ्याच ठिकाणी लावलेले असायचे. त्याचा खरा अर्थ परीक्षेलाच लक्षात यायचा. लेटर आणि स्टेटमेंटला विशेष अड़चण नाही यायची पण जेव्हा शेवटचा ७ मिनिटांचा स्पीडचा भाग यायचा तेव्हा खरं टंकलेखनाच कौशल्य पणाला लागायच. एक वेळ संपूर्ण उतारा ७ मिनिटांच्या आत टंकुन संपेल पण त्यामधे किती शब्द बिनचूक आहेत हे तपासायला गेल की मग "accuracy first then speed" ची प्रकर्षाने आठवण यायची. एक तर ज्या क्षणाला परिक्षक मनगटावरचं घड्याळ काढून हातात घ्यायचे तेव्हापासूनच हात कापायला लागायचे. मग उगीचच तळहात एकमेकांवर घासून त्याना स्पीड साठी तयार करणं किंवा बोटं कडाकडा मोडून त्याना सैल करणं सुरु व्हायचं. परिक्षक स्टार्ट म्हंटले की मग खरी मजा यायची. एकाच वेळी परीक्षागृहातले सगळे टाईपरायटर त्या सात मिनिटांच्या स्पर्धेत धावायला लागायचे. बोटं दुखायला लागली म्हणून एक क्षण जरी थांबलो तरी बाकीच्या टाईपरायटरचा आवाज पाहून आपण मागे पडतो की काय अशी भीती वाटायची. लेटर, स्टेटमेंटमधे जास्तीत जास्त आणि स्पीड मधे पासिंग पुरते मार्क असच सर्वसामान्य विद्यार्थ्याच ध्येय असायच.

तुलनेने मराठी आणि हिन्दी टंकलेखन शिकायला कमी विद्यार्थी असायचे. एकतर ते इंग्लिशपेक्षा अवघड आणि त्यात आपल्या देशी भाषा असल्याने त्याचं लोकाना आकर्षण कमी असाव. संगणक युगाची सुरवात झाल्यावर तर विद्यार्थी संगणकाचा की-बोर्ड टाईपरायटरसारखाच असल्याने इंग्लिश टंकलेखन शिकायला यायला लागले. मी इलेक्ट्रोनिक टाईपरायटरवरसुद्धा काम केलय. एखादा शब्द जर इरेझ करायचा असेल तर फार छान आवाज करत तो इरेझ व्ह्यायचा.

पेजरची जागा मोबाईलनी, सायकलची मोटरसायकलनी तशीच टाईपरायटरची संगणकाने घेतली. आज आयटी क्षेत्रात काम करताना मला टंकलेखन शिक्षणाचा खूप फ़ायदा होतो. इमेल लिहिताना, कोडिंग करताना इतरांपेक्षा फार लवकर लिहून होतं. मी जेव्हा वेगात काही टाईप करत असलो की लोक मी एखादा जादूचा प्रयोग करतोय अशा नजरेनी पहात राहतात. दुर्दैवानी टंकलेखन शिकून आलेले फार कमी लोकं आजूबाजूला दिसतात. त्याना जर टंकलेखन आलं तर त्यांचा कामाचा बराचसा वेळ वाचेल. टायपिंग टयूटरसारखी सॉफ्टवेअर असतात पण क्वचितच ते शिकण्यासाठी वापरलं जातं. मला खरोखर असं वाटत की कंप्यूटर इंजिनियरला एखाद्या सेमिस्टरसाठी तरी टंकलेखन हा विषय ठेवला पाहिजे. कारण भविष्यात त्याला ह्याचा नक्कीच फायदा होइल.

Sunday, May 15, 2011

गुलमोहोर

मे महिन्यातील दुपार.. लांबलचक हायवे... एसी फुल स्पीडमध्ये चालू तरीही मानेवरून घामाचे २-३ थेंब ओघळतायेत.. खरं तर त्या थेंबांचा मानेवर होणारा गार स्पर्शही बरा वाटतोय. नेमकी गाडीत पाण्याची बाटलीही नाही. सकाळीच २ अंडी आणि वर २-३ कप चहा घेतलेला. त्यामुळे शरीराच्या आतली उष्णता बाहेरच्या तापमानाशी स्पर्धा करत होती. बाहेर इतकं कडक ऊन की त्यात क्षणभरही उभं राहीलं तरी जळून खाक होऊ की काय अशी भिती वाटली. आधीच जास्त असलेलं अंतर उन्हामुळे आणखीनच लांब वाटायला लागलं.

इतक्यात दूरवर एक लाल ठिपका दिसला. जसजसं त्या ठिपक्याच्या जवळ जात होतो तसं लक्षात येत गेलं की तो नुसता लाल नाही तर लालभडक ठिपका आहे. बाहेर आग ओतत असलेल्या सूर्यकिरणांपेक्षा लाल. आता तो लाल ठिपका पूर्ण विस्तारला गेला आणि लक्षात आलं की हा तर गुलमोहोर. नकळत गाडीचा वेग कमी झाला. लालभडक फुलांनी डवरलेला गुलमोहोर डोळयात मनसोक्त साठवून घेतला. थोड्या थोड्या अंतरावर असेच गुलमोहर दिसत गेले आणि तो मनमोहक लाल रंग डोळ्यांवाटे शरीरात उतरत गेला.

मनात विचार आला की लाल रंग खरं तर आक्रमकतेचं प्रतीक. मनाला अशांत करणारा रंग. लालभडक रक्त पाहीलं की काही जणांना चक्कर येते. पण हाच रंग जेव्हा धगधगत्या उन्हात गुलमोहरावर पाहिला तेव्हा डोळे निवल्यासारखे वाटले. मित्र म्हटला काय त्या चेरी ब्लॉसमचं कौतुक करायचं.. आपला गुलमोहोर किती सुंदर दिसतो त्यापुढे. अगदी खरं. पुढचे काही दिवस मी येता जाता रस्त्यांवर गुलमोहोर शोधत होतो आणि त्या देखण्या झाडाच्या दर्शनानी सुखावण्याचा पुन:प्रत्यय येत राहीला.

लहानपणी ह्याच गुलमोहराला लटकणा-या तलवारीच्या आकारासारख्या त्याच्या फळानी आम्ही लढाई करायचो. समोरच्याचा वार जर चुकवता आला नाही तर ती बारकी काठीपण जाम लागायची. कधी कधी झाडावर चढून त्याची लालचुटूक फुले खायचो. एकदा असंच चढत असताना सरकन एक सरडा शेजारून निघून गेला. खोडाच्या काळपट रंगात त्याचा रंग मिसळून गेल्याने तो दिसलाच नाही. अजूनही ते आठवलं की अंगावर काटा येतो.

ऑफिसला जायला घराबाहेर पडलो आणि वळणावरच गुलमोहोर दिसला. अरेच्चा!!! कधी लक्षचं नाही गेलं की ह्याच्याकडे. पुन्हा दुसऱ्या वळणावर एक गुलमोहोर. दहा किलोमीटरच्या अंतरात किमान दहा दिसले. काही पूर्ण लाल फुलांनी बहरलेले तर काही अर्धे लाल आणि अर्धे हिरवट. ऑफिसला किंवा कामासाठी शहरातल्या रस्त्यातून जाताना गडबडीत ह्या सुंदर गुलमोहराकडे लक्षचं जात नसावं. त्या दिवशी हायवे वरून जाताना दुसरं काहीच पाहण्यासारखं नसल्यामुळे कदाचित गुलमोहरानी लक्ष वेधलं असावं.

गुलमोहराबाबत अतिपरिचयात अवज्ञI तर होत नसेल ना? पुष्पगुच्छात फुलवाले गुलमोहराची फुले का बरं मिसळत नसावीत? किंवा आपणसुद्धा घरातल्या फुलदाणीत कृत्रिम फुलांऐवजी मुबलक उपलबद्ध असणारी गुलमोहराची फुले का बरं वापरत नाही? १४ फेब्रुवारीला लोक गुलाबाच्या फुलाला दहा-वीस रुपये देण्यापेक्षा छानपैकी गुलमोहराच्या फुलांचा गुच्छ का नाही देत? हा पर्याय अगदीच काही वाईट नाही. नीट पाहिलं नाही कधी पण कदाचित ती फुलं झाडावर लांबूनच छान दिसत असावीत. नाहीतर हा सरळ सोपा उपाय लोकांनी नक्कीच सोडला नसता.

घराला, हॉटेलला गुलमोहोर नाव पाहिलंय. भारी वाटतं एकदम. पण कोणा मुलाचं नाव गुलमोहोर नाही ऐकलं. गुलाब, जाई, जुई, शेवंती (शेवंता) आहे पण गुलमोहोर नाही. कदाचित ते फारचं मोठ वाटेल. त्याचा अपभ्रंश तर अगदीच भुक्कड होईल. गुलमोहरावर कविता पण ऐकल्याचं आठवत नाही.

“शहरसे जा रहा था दोपहर इतनेमे दिखा खुबसुरत गुलमोहर
हटा नही पाया उससे नजर मनमे दौड गयी खुशी की लेहर”

अशा टाईपची कविता गुलजार वगैरेना सुचली नसेल का कधी?