Saturday, March 24, 2018

Just for a change :-)

असंच कधीतरी मन उदास होतं
चिडचिड व्हायला लागते
मनासारख्या गोष्टी होत नाहीत
सगळं जग दुष्मन वाटायला लागतं
अगदी अंथरुणातून उठायचंही मन होत नाही

अशावेळी स्वतःला कसं सावरावं?
अनेक तज्ज्ञांनी अनेक उपाय सुचवले असतील
पण माझ्यापुरते मी उपाय शोधून ठेवले आहेत

सकाळी उठल्यावर रोजच्या पेस्टपेक्षा वेगळी पेस्ट ट्राय करावी किंवा चक्क दंतमंजन वापरून बघावं
रोज उजव्या हाताने ब्रश करतो, आज डाव्या हाताने ट्राय करावा.
मग टीव्हीवर म्युझिक चॅनेल्स लावावेत, त्यावरचं मस्त म्युझिक ऐकत कडक चहा घ्यावा.. जरा मनाला उभारी येते.
रोजच्या गरम पाण्याच्या आंघोळीऐवजी थंडगार शॉवर घ्यावा.. पहिल्यांदा पटकन गार पाण्याखाली जायचा धीर होत नाही. निग्रहाने त्या थंड पाण्याच्या वर्षावाखाली जावं आणि तो शहारा मेंदूत रेकॉर्ड करून ठेवावा.
नेहमी डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ घालतो, आज उजव्या हातावर ट्राय करावं
रोज घालतो त्यापेक्षा वेगळा चष्मा घालावा, डावीकडून भांग पाडतो त्याऐवजी उजवीकडून पाडावा.
क्लीन शेव्ह ऐवजी फ्रेंच कट /मिशी ठेवून बघावी

ऑफिसला जर रोज फॉर्मल ड्रेस घालून जात असेल तर आज फॉर अ चेंज एखादा ब्राईट कलरचा शर्ट किंवा टीशर्ट-जीन्स घालून जावं
बाईकवरून ऑफिसला जाताना आजूबाजूच्या गाड्या पहाव्यात.
उगीचच तुमच्या शहराच्या सोडून बाकीच्या शहरांच्या गाड्यांचे पासिंग पहावे, काऊंट वाढवत जावा. उदाहरणार्थ - नाशिक पासिंगच्या १० गाड्या, नगर पासिंगच्या १५ गाड्या, इत्यादी
ऑफिसला जायचा रोजचा रस्ता सोडून एखादा वेगळा रस्ता ट्राय करावा.
रोज ज्या सिक्वेन्सने गाणी ऐकत बाईकवरून जातो त्याऐवजी प्लेलिस्ट शफल मोडमध्ये करून बघायला काय हरकत आहे?
ऑफिसमध्ये रोज जाऊन जे काम करतो त्यापेक्षा आज काहीतरी वेगळं करावं
नेहमीच्या लोकांपेक्षा वेगळ्या लोकांशी संवाद साधावा
लंचला रोज भाजी पोळी खातो त्याऐवजी पास्ता, चायनीज ट्राय करावं

असे अनेक सुहृद, जुने मित्र/नातेवाईक असतात ज्यांच्याशी वर्षानुवर्षे बोलणं झालेलं नसतं
आज वेळात वेळ काढून त्यांना कॉल लावावा आणि मग त्यांचं आश्चर्य उरात भरून घ्यावं. त्या समाधानावर पुढचे कित्येक दिवस जाणार असतात


ऑफिसमधून आज नेहमीपेक्षा लवकर निघावं
घरी कॉल करून सांगावं की आज स्वयंपाक नका करू, आपण बाहेर जेवूया
एखाद्या नाटकाची, चित्रपटाची तिकिटे काढावीत आणि घरच्यांना सरप्राईज द्यावं

ह्या सगळ्याचा हेतू एकच की आपल्या मेंदूला जे रोजच्या रुटीनचं कंडिशनिंग झालंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं,
मेंदूला जरा शॉक द्यावा. आपले सेन्सेस पुन्हा जागृत होतायेत का ते पहावं

शेवटी अंथरुणाला पाठ टेकताना काहीतरी वेगळं केल्याचं नक्कीच समाधान लाभेल.
आयुष्य सुखकर करायला अजून काय हवं असतं?

Friday, March 16, 2018

मन करा रे प्रसन्न...

आताशा असे हे मला काय होते
.
.
.
.
कशी ही अवस्था कुणाला कळावे
कुणाला पुसावे कुणी उत्तरावे...
किती खोल जातो, तरी तोल जातो
असा तोल जाता, कुणी सावरावे..


ह्या संदीप खरेच्या कवितेसारखी कधीतरी अवस्था होते. सगळं छान, मजेत चाललेलं असतं. अचानक तो क्षण येतो जेव्हा उदास वाटायला लागतं, मनावर नैराश्याचे मळभ दाटून येते.

असं का होत असावं? सगळं मनाजोगतं चाललेलं असताना नकळत आपल्या आयुष्याकडून अपेक्षा तर वाढत जात नसतील? मग जरा काही मनाविरुद्ध झालं की औदासिन्य हळूच मनात शिरकाव करत असेल.
मनाला कितीही बजावत राहिलो की आपल्याला कायम सकारात्मक विचार करायचा आहे तरीही नैराश्याची हलकीशी सावलीदेखील पटकन मन ग्रासून टाकते.

आजकाल आपल्या दिनचर्येचा बराचसा भाग सोशल मीडियाने व्यापलेला आहे. सकाळी उठल्यापासून पार डोळे जड होऊन मिटायला लागेस्तोवर आपण व्हाट्सएप, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक चेक करत असतो.
ह्या व्हर्च्युअल जगात दिवसरात्र वेळ घालवल्यामुळे प्रचंड शीण येतो, जो अर्थात आपण सोयीस्कररित्या दुर्लक्षतो.

ह्या सोशल मिडीयाच्या नादात अनेक गोष्टींना मुकत असल्याची आज मला प्रकर्षाने जाणीव होतेय.
घरात कॅरम बोर्ड, उनो, पत्ते, बुद्धिबळ आहे. पण कित्येक महिन्यांत त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाहीये. हे खेळ खेळत असताना जे थेट ह्युमन इन्ट्रॅकशन होतं त्याला तोड नाही.
एका कलीगने 3 महिन्यांपूर्वी एक सुंदर पुस्तक दिलंय, ज्याचं अजून मी पहिलं पानही वाचलं नाही.
केबल/सेट टॉप बॉक्ससाठी वर्षाला हजारो रुपये भरतोय पण अनेक उत्तमोत्तम चित्रपट, डॉक्युमेंट्रीज बघायलाही वेळ मिळत नाहीये.
वाचन, लिखाणासारख्या छंदांकडे दुर्लक्ष होतंय.
वेळ नाहीये हे अर्थातच खरं नाहीये, सोशल मीडियाच्या नादात ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं जात नाहीये.

बऱ्याचदा असं होतंय की समोर फूट-दोन फुटांवर बसलेल्या माणसाच्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं. जगभर पसरलेल्या लोकांशी चॅटिंग करण्यात आपण बिझी असतो.
आणि हे फक्त आपण नाही तर बऱ्याचदा समोर बसलेला माणूसही तेच करत असतो.
एकमेकांशी समोर बसून गप्पा-टप्पा, हास्य-विनोद करणं हळू हळू कमी होत चाललंय.

ह्या सगळ्या जाणिवा जेव्हा तीव्रतेने बोचायला लागतात, तेव्हा पटकन नैराश्य/विरक्ती येते. 
काहीतरी चुकतंय, हरवतंय ह्याची प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते.
मग जालीम उपाय म्हणून तत्परतेने आपण काही व्हाट्सएप ग्रुप्स सोडतो, फेसबुक डीऍक्टिव्हेट करतो, ट्विटर/इंस्टाग्राम अनइंस्टॉल करतो.
अत्युच्च प्रतीचे नैराश्य/विरक्ती आली असेल तर व्हाट्सएप अकाउंट डिलीट करतो. स्मार्टफोन सोडून नोकिया आशा वगैरे बेसिक हँडसेट वापरायला लागतो.
अर्थात, ही तात्पुरती मलमपट्टी असते. काही दिवसांत येरे माझ्या मागल्या होऊन ती जखम, खपली धरायच्या अगोदरच, अधिक तीव्रतेने भळाभळा वाहणार असते.

खरं पाहता, हा नक्कीच कायमस्वरूपी तोडगा नाही. वर्षानुवर्षाच्या सहवासातून जोडली गेलेली माणसं ही आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही, बोलू शकत नाहीत. हे सर्वजण बहुतांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच संवाद साधत असतात. त्यामुळे सोशल मिडियापासून कायमची फारकत घेण्याला काहीच अर्थ नाहीये.

ह्या प्रश्नावर सखोल विचारमंथन केल्यावर असं लक्षात आलंय की ह्या सगळ्याचा सुवर्णमध्य गाठणं महत्वाचं आहे.
एखाद दोन दिवस सोशल मिडियावरचे अपडेट्स पाहिले नाही तर जगबुडी नक्कीच येणार नाही. ह्या गोष्टी फावल्या वेळातच केल्या पाहिजेत.

पण त्याआधी फावल्या वेळाची व्याख्या नक्कीच ठरवायली हवी. जेव्हा खरोखरच तुम्हाला करण्याजोगे काही काम नसेल तो खरा फावला वेळ.
आता काम म्हणजे काय फक्त ऑफिसचं काम नाही, इतरही बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत.
सोशल मिडीयाच्या अडिक्शन पायी तब्येतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होतंय.

रोज सकाळी लवकर उठून फिरायला जाणं, सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायम करणं हे अत्यावश्यक आहे.
घरच्या, बाहेरच्या कामांची यादी करून ती वेळच्यावेळी निपटवणे गरजेचं आहे.
आता, उदाहरणार्थ, प्रवास करताना सहप्रवासी चांगला नसेल तर त्यावेळी नक्कीच सोशल मिडियावर वेळ घालवणं योग्य आहे. पण जरका सहप्रवासी इंटरेस्टिंग असेल आणि त्याच्याकडून ४ अनुभवाच्या, मौलिक गोष्टींचं ज्ञान मिळणार असेल तर त्याच्याशी थेट संवाद साधणं जास्त महत्वाचं.

अति सर्वत्र वर्जयेत ह्या उक्तीनुसार वागलं तर सगळ्या गोष्टींचा नक्कीच उत्तम मेळ घालता येईल.
आपल्या मागल्या पिढीने विचारही केला नसेल अशी भौतिक सुखं आपल्या पायाशी लोळण घेत आहेत. पण ह्या सगळ्यापेक्षा अपेक्षित असं मानसिक समाधान लाभतंय का ह्याचा नक्कीच विचार केला पाहिजे.

शेवटी काय, जीवन सुंदर, अर्थपूर्ण, समतोल बनवणं महत्वाचं. ते जर साधता येत नसेल तर नैराश्य तुमच्या दाराशी उभं आहेच.

Tuesday, December 19, 2017

शाळा बिळा आणि बरंच काही...

माझा मुलगा जवळच्याच एका शाळेत जातो. त्याच्या शाळेत एक दिवस छोट्याश्या स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा तास असतो, एखाद दिवशी मातीमध्ये खेळायचा तास असतो. वार्षिक स्नेहसंमेलनात तो व्हेंगाबॉईजच्या "गोईंग टू इबिझ्झा" गाण्यावर डान्स करतो आणि ह्या सगळ्यांतून वेळ मिळाला की थोडाफार अभ्यासही करतो.
पुढे पुढे तर त्यांना स्केटिंगचा, टेनिसचा ही तास असेल.

मला अनेकदा माझे शाळेचे दिवस आठवतात. रोज पाच गणितं वहीत सोडवून आणायची, अचानक उभं केल्यावर पाठयपुस्तकातला उतारा वाचवून दाखवायचा, शिक्षक सांगतील ते ईमान इतबारे वहीत शक्यतो सुवाच्च अक्षरात उतरवून घ्यायचं, रोज न चुकता गृहपाठ पूर्ण करायचा अशी अनेक अवघड कामं असायची

शिवाय, राजा रवी वर्मा किंवा एम एफ हुसेननी कोपरापासून हात जोडावेत अशी चित्रं काढणं, कार्यानुभवाच्या तासाला वाट्टेल त्या आकाराच्या कागदी आकृत्या बनवणं(अजूनही मला होडी आणि विमानाशिवाय दुसरं काही येत नाही :-)), प्रयोगशाळेत जे समोर येईल ते विचार न करता एकमेकांत मिसळून कुठल्यातरी
नव्या वायूचा शोध जगाला बहाल करणं, पायथागोरसनी निवृत्ती स्वीकारावी असल्या अफाट भूमितीच्या आकृत्या काढणं,
महाराष्ट्रात चहा तर आसामात ऊसाची लागवड करणं, अकबराकडून ताजमहाल बांधून घेणं, इतिहासाच्या पुस्तकातल्या (स्त्री असो की पुरुष) सगळ्यांना दाढी मिशा काढणं असे अनेक सर्जनशील प्रयोग करत राहिलो.

खरं सांगायचं तर शाळेतला प्रत्येक दिवस हा कुरुक्षेत्रावर लढायला निघालेल्या योद्धापेक्षा कमी नव्हता. ह्या संग्रामात यशस्वी होण्यापेक्षा घायाळ व्हायचे प्रसंगच अधिक आले.
प्रगतीपुस्तक वेळेवर दिलं नाही म्हणून किंवा गृहपाठ केला नाही म्हणून किंवा शिक्षक शिकवत असताना मध्येच हसलो म्हणून गदा, भाले, बाणांनी अनेकवेळा जखमी व्हायची वेळ आली.
सुदैवाने ह्या संग्रामात कधी धारातीर्थी पडलो नाही.

मुस्काडास्त्र, गुद्देअस्त्र, टपलास्त्र, धपाटास्त्र, चिमटास्त्र, कानपिरगाळास्त्र, फूटपट्टास्त्र, डस्टरास्त्र, रुळास्त्र अशा अनेक अस्त्रांचा प्रयोग होऊनही शाळेतून सहीसलामत बाहेर पडलो :-)

हे सगळं वाचून कदाचित तुम्हांला वाटेल की सगळंच उदासवाणं, निराशाजनक होतं. पण नाही, ह्या  सगळ्यातूनही जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा मजा लुटली.

माझ्या मागे आशिष रसाळ नावाचा मुलगा बसायचा. राष्ट्रगीताच्या वेळी जेव्हा "तव शुभ नाम जागे, तव शुभ आशिष मागे" यायचं तेव्हा मी हमखास मागे वळून आशिषकडे बघत हसायचो (ह्याकरिता मी अगणित वेळा मार खाल्ला आहे :-))

मोनेकला मंदिरात एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी सगळे जमायचो तेव्हा मी पुढे बसलेल्या दोन वर्गमित्रांच्या दप्तरांचे बंद एकमेकांना बांधायचो. कार्यक्रम संपल्यावर जेव्हा ते उठायचे, तेव्हा काय व्हायचं ह्याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल.

तास चालू असताना तोंड कमीत कमी हलवून जेव्हा बोरकूट किंवा लेमनची गोळी चघळायचो तेव्हा ती मजा काही और होती.

शेजाऱ्याचं लक्ष नसताना त्याच्या चायना पेन मधली शाई जेव्हा त्या पेनच्या झाकणात पुरेपूर ओतायचो आणि जेव्हा तो लिहायला पेन उघडायचा तेव्हाची मजा शब्दातीत आहे.

व्हीक्स इन्हेलर उघडून जेव्हा त्याच्या आतली नळी डोळ्याला हलकेच लावून डोळ्यांतून पाणी काढायचो आणि आजारी आहे सांगत घरी पळायचो त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

आजोबांची शिंकणी आणून जेव्हा शेजाऱ्याला हुंगायला दिली होती त्यानंतर त्याची जी अवस्था झाली ते सांगणं अवघड आहे :-)

अशा असंख्य मजेशीर आठवणी आजही माझ्या स्मरणात आहेत.
शाळेविषयी मला अजिबात कटुता नाही. कदाचित त्या काळातल्या बहुसंख्य मराठी शाळा ह्याच धाटणीच्या असतील. तेव्हाची ती सर्वरूढ पद्धत असेल.

आज ह्या शाळेमुळेच आपलं पहिलं गेट टू गेदर झालं. जुने मित्र भेटले, तेव्हा न भेटलेले अनेक नवे मित्रही झाले. अजून काय हवं?
आपल्या सगळ्यांच्या मनात शाळेबद्दल कडू-गोड आठवणी असतीलही पण आपल्या सगळ्यांना आज बांधून ठेवणारा, जोडणारा हाच तर तो धागा आहे. 

Tuesday, November 7, 2017

Life is beautiful

काही चित्रपट असे असतात की ते पाहताना आपण खळखळून हसतो तर काही चित्रपट पाहताना आपण भारावून जातो. काही चित्रपट पाहताना आपल्याला अश्रू अनावर होतात तर काही आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात आणि काही आपल्याला मानवी जीवनमूल्यांचं उत्तुंग दर्शन घडवतात.. खरंय ना?
आणि हे सगळे अनुभव एकाच चित्रपटात अनुभवायला मिळाले तर?  तर मग त्याच्यासारखा दुसरा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स नाही...

नाझी हुकूमशहा हिटलरने ज्यूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांवर अनेक चित्रपट बनले, बनत राहतील.. स्पिलबर्गसारख्या अद्भुत माणसाच्या मुशीतून साकारलेल्या शिंडलर्स लिस्ट सारख्या चित्रपटानंतर (ज्याला ऑस्कर मिळालंय) अजून काय पाहण्यासारखं राहतं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे..

खरं तर ज्यू समाजाच्या अत्याचारांवर, जो अतिशय नाजूक आणि संवेदनशील विषय आहे, चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. पण इटालियन दिग्दर्शक आणि अभिनेता रॉबेर्तो बेनिनी (roberto benigni) ह्याने ते लीलया पेललंय..

लाईफ इज ब्युटीफुल ह्या चित्रपटाच्या कथेचे ढोबळमानाने दोन भाग पाडता येतील. पहिला म्हणजे रॉबेर्तोची प्रेमकथा आणि दुसरा म्हणजे ज्यू छळछावणीतील त्याच्या आयुष्याचा प्रवास.
ही कथा १९३९ पासून सुरू होते. शहरामध्ये नशीब काढायला, पुस्तकाचं दुकान उघडायला आलेला आपला हा नायक त्याच्या काहीशा वेंधळ्या, निष्पाप, विनोदी कृत्यांनी धमाल उडवून देतो.



दरम्यानच्या काळात उदरनिर्वाहासाठी तो त्याच्या काकांच्या उपहारगृहात वेटरची नोकरीही करतो.
तिथे तो त्याच्या आनंदी, उत्साही स्वभावाने ग्राहकांची मनं जिंकून घेतो.

कर्मधर्मसंयोगाने त्याला त्याची नायिकाही(जी त्याच्या खऱ्या आयुष्यातली पत्नी आहे)  वारंवार ह्या ना त्या कारणाने भेटत राहते.. तिच्या हृदयात आपलं स्थान मिळवण्यासाठी तो अचाट मार्ग शोधत राहतो..



अखेर आपला भोळाभाबडा, जिंदादिल नायक तिचं मन जिंकून घेतो आणि एका अत्यंत नाट्यमय प्रसंगातून तिला पळवून नेत तिच्याशी लग्नही करतो..

नायिकेच्या आईला आपल्या मुलीचं एका कफल्लक, ज्यू माणसाशी झालेलं लग्न कदापि मान्य नसतं.
कथेच्या हा पहिला भाग जरी हलका फुलका असला तरीही आपल्याला अधून मधून इटलीत उसळलेली ज्यू द्वेषाची चुणूक पहायला मिळते. रॉबेर्तोचे करुण रसात्मक विनोदी प्रसंग आपल्याला चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटांची आठवण नक्कीच करून देतात.

 चित्रपटाचा आत्मा हा कथेचा दुसरा भाग आहे.
रॉबेर्तोच्या लग्नानंतर थेट आपल्याला त्याचा छोटा मुलगा भेटतो. कथेच्या ह्या भागेत वडील-मुलाच्या नात्यातले हळुवार पदर उलगडले जातात. मुलाच्या सुखासाठी जीवाचं रान करणारा रॉबेर्तो आपल्याला भेटतो.



नायिकेची आई कपटी चाल खेळते आणि रॉबेर्तो, त्याचा मुलगा, काकाची ज्यू असल्या कारणाने छळछावणीत रवानगी होते. आपली नायिका, जन्माने ज्यू नसली तरीही, हट्टाने त्यांच्यासोबत आगगाडीत चढते.

चित्रपटाच्या ह्या भागात रॉबेर्तो त्याच्यातल्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यातले अत्युच्च कौशल्य दाखवतो.
जेव्हा एक नाझी ऑफिसर कैद्यांना सूचना द्यायला येतो तेव्हा रॉबेर्तो त्याला जर्मन येतं अशी बेलामूम थाप मारतो आणि त्याच्या मुलासमोर त्या ऑफिसरच्या सुचनांचं ढळढळीत खोटं भाषांतर करत खेळाचे नियम सांगतो..

आपण एक खेळ खेळायला जात असून जो कोणी सर्वप्रथम हजार पॉईंट्स मिळवेल त्याला एक खराखुरा टॅंक बक्षीस म्हणून मिळेल अशी रॉबेर्तो कथा त्याच्या मुलासमोर रचतो.
हा प्रसंग म्हणा किंवा शॉवर घेण्याच्या नावाखाली लहानग्या ज्यू मुलांना यमदसनी धाडण्यात येते आणि रॉबेर्तो स्वतःच्या मुलाला कसे वाचवतो तो प्रसंग म्हणा किंवा संधी मिळाल्यावर स्पीकरवरून लेडीज सेक्शनमध्ये असलेल्या बायकोशी रॉबेर्तो कशा प्रकारे संवाद साधतो तो प्रसंग म्हणा असे अनेक काळजाला भिडणारे प्रसंग चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आहेत.

आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलंय हे जरी रॉबेर्तोला माहीत असले तरी तो आपल्या लहानग्या, कोवळ्या मुलाला येऊ घातलेल्या भीषण परिस्थितीची जाणीव न करून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

शेवटी रॉबेर्तो, त्याचा मुलगा आणि बायको ह्यांची सहीसलामत सुटका होते की त्यांचं आयुष्य छळछावणीत संपुष्टात येतं हे पडद्यावर पहाणचं योग्य ठरेल..



हा चित्रपट रुबिनो सलमोनिच्या "आय बीट हिटलर" ह्या पुस्तकावर आणि रॉबेर्तोच्या वडिलांच्या जर्मन छावणीत 2 वर्ष काढलेल्या अनुभवावर आधारीत आहे.

लाईफ ईज ब्युटीफुलला जशी लोकमान्यता मिळाली तशी राजमान्यतही मिळाली. ह्या चित्रपटाने 4 ऑस्कर अवॉर्डस मिळवले.

हा चित्रपट का पहावा? ह्याची अनेक कारणं आहेत. तुमच्याकडे जर विनोदबुद्धी आणि जीवनाकडे पहायचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अत्यंत प्रतिकूल आयुष्यालाही तुम्ही सुसह्य बनवू शकता. रॉबेर्तो आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीवघेण्या संकटांसमोर आपल्याला स्वतःचे प्रश्न अगदी क्षुल्लक वाटू लागतात.

जेव्हा आपल्या आयुष्यात मनासारखं घडत नसेल, नकारात्मक विचारांनी आपला ताबा घेतला असेल तेव्हा हा चित्रपट नक्कीच दिपस्तंभासारखं मार्गदर्शन करेल ह्यात शंका नाही.

Sunday, July 9, 2017

मी टाईपरायटर बोलतोय

माझ्या प्रिय मित्र/मैत्रिणींनो,

मी टाईपरायटर बोलतोय.. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ह्या निर्जीव टाईपरायटरला अचानक वाचा कशी फुटली? दिवा विझण्याआधी जसा अचानक मोठा होतो ना तसाच तुम्हां सगळ्यांचा शेवटचा निरोप घेण्याआधी परमेश्वराने मला वाचा बहाल केली असावी...

तसा मी दीर्घायुषी बरंका.. जेव्हा तुमचे आजोबाही जन्मले नसतील त्या काळात, साता समुद्रापलिकडे, अमेरिकेत माझा जन्म झाला.. सगळं जग पादाक्रांत करत करत भारतात यायला मला जरा उशीरच झाला..
पण तुम्ही लोकांनी मला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला तो आश्चर्यकारकच होता...
रेमिंगटन, गोदरेजसारख्या मोठमोठ्या कंपनीज मला तयार करायला पुढे सरसावल्या.. आधी फक्त इंग्लिश मग मराठी, हिंदी अशा तुमच्या स्थानिक भाषांकरीताही माझे कीबोर्ड बनू लागले...

न्यायालयात, शासकीय कार्यालयांत, सार्वजनिक, खाजगी क्षेत्रात अशा सगळीकडे माझा बोलबाला सुरू झाला आणि मग हळू हळू प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात, गावात टंकलेखन संस्थांचा उदय झाला.. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, दहावी/बारावी झालं की टायपिंग शिकायला मुला/मुलींची झुंबड उडू लागली.. नोकरीच्या मुलाखतीसाठी टायपिंगचं सर्टिफिकेट अनिवार्य होऊन गेलं.. आणि काय सांगू, मला ह्या जगाचा अनभिषिक्त सम्राट असल्याची जाणीव व्हायला लागली...

खरं सांगू, माझी जन्मभूमी जरी अमेरिका असली ना तरीही मला तुम्हां भारतीयांकडूनच भरभरून प्रेम मिळालंय.. तुम्ही लोकं तुमची मुलं दमून भागून अस्ताव्यस्त झोपली की हळूच त्यांच्यावर मायेचं पांघरूण घालायचे ना तसंच तुमच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये लोकांनी दिवसभर मला यथेच्छ वापरलं की शेवटी तुम्ही मला मायेने कव्हर घालायचे.. तुमच्या मुलांसारखंच मग मीही गाढ झोपी जायचो... आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवायचे ना तसंच मलाही कव्हर काढून, व्यवस्थित पुसून पहिल्या बॅचसाठी तयार करायचे...

मी वरकरणी जरी निर्जीव यंत्र वाटत असलो ना तरी माझ्याही अंगावर रोमांच उभे रहायचे, आनंदानी मीही बहरून जायचो..
तुमच्या कोणत्यातरी एका सणाला तुम्ही लोकं हळद, कुंकू, फुलं वाहून माझी पूजा करायचे... त्यावेळी माझा ऊर अभिमानाने भरून जायचा.. त्यावेळी कदाचित तुम्हाला माझ्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू दिसले नसतील.. पण खरंच सांगतो मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं..

आज मागे वळून पाहताना जाणवतंय की तुम्हां सगळ्यांच्या प्रत्येक सुख दुःखाचा मी साक्षीदार राहिलो आहे..
इन्स्टिट्यूट/जॉबवर्क सुरू केल्यानंतरचा तुमचा संघर्षाचा काळ, लग्नकार्य, नव्या घरात प्रवेश, मुलांची शिक्षणं अशा प्रत्येक प्रसंगी तुमच्या घरातलाच एक सदस्य असल्याची जाणीव होत राहिली... तुमच्या यशापशयात आपण दोघेही एकमेकांना घट्ट धरून वाटचाल करत राहिलो, अजून काय पाहिजे?

टायपिंगच्या परीक्षांच्या वेळी तुम्ही मला हातगाडी, रिक्षा, टेम्पो जे साधन मिळेल आणि मुख्य म्हणजे परवडेल त्यात घालून परीक्षा केंद्रात न्यायचे...तेव्हा मला हादरे बसायचे, हाडं खिळखिळी व्हायची पण केवळ तुमच्या प्रेमाखातर मी सगळं सहन करत आलो आहे... नाही नाही तक्रार करत नाहीये पण आजची ही शेवटची संधी समजून माझं मन मोकळं करतोय..

asdf ;lkj पासून ते थेट लेटर, स्टेटमेंट, स्पीड पॅसेज पर्यंतची माझ्या मित्र मैत्रिणींची प्रगती पाहिली की सगळे कष्ट विसरायला व्हायचे...मला हात असते ना तर मी नक्कीच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असती..

मी यशाच्या शिखरावर होतो आणि मग संगणक क्रांती झाली...
घराघरात, गावागावात संगणक पोहोचले आणि मला कळून चुकलं की ह्या झंझावतात माझा फार काळ निभाव लागणार नाही..
बदल हा सृष्टीचा नियमच आहे म्हणा...जिथे अवाढव्य, सर्वशक्तिशाली डायनासोर पृथ्वीच्या उदरात गडप झाले तिथे माझ्यासारख्या एका छोट्या यंत्राचं काय घेऊन बसलात..

आता ही येणारी परीक्षा संपली की माझाही खडखडाट थांबणार..आणि मग माझं काय करायचं हा प्रश्न तुमच्यापुढे उभा राहील.. तुमच्यातले काही जण मला कवडीमोल भावात विकून टाकाल...काहीजण ओळखीच्या लोकांत वाटून टाकाल...काही जणांना मला निरोप देणं जड जाईल, काही प्रॅक्टिकल (माझ्या अमेरिकेत आहेत तशी) लोकं म्हणतील एवढं काय मनाला लावून घ्यायचं? निर्जीव यंत्रच होतं ना ते.. ते ऐकून कदाचित मला वाईट वाटेल.. तुमच्या आठवणींत तरी मला जिवंत ठेवाल ना? असा विचारायचा मोहसुद्धा होईल..

बघा, तुम्ही भारतीयांसोबत राहून मीही इमोशनल बनलो आहे.. संगत का असर, दुसरं काय? :-) अलविदा!!!!

Friday, August 26, 2016

हजारो ख्वाहिशें ऐसी....

काही महिन्यांपूर्वीच  मी माझा 35 वा बड्डे धुमधडाक्यात साजरा केला. आयुष्याच्या ह्या स्टेजला खरंतर मी (आणि माझे बव्हतांशी समवयस्क मित्र/मैत्रिणी) खुश असायला हवेत..... आर्थिक, सामाजिक, इत्यादी इत्यादी सगळं स्वातंत्र्य कमावलं आहे... आयुष्याच्या जहाजाचं सुकाणू आपल्या हातात आहे..त्याला आपण जिथे पाहिजे तिथे घुमवू शकतो.... आहे कि नाही मजा?

पण दुर्दैवाने माझे काही दोस्त ह्या स्टेजला "आलिया भोगासी असावे सादर", "आता उरलो उपकारापुरता", "आता काय राहिलंय आयुष्यात", "चाळीशी जवळ आलीये' अशा टाईपचा निराशावादी विचार करतात तेव्हा मला आश्चर्यचकित व्हायला होतं...

माझ्यापुरतं म्हणाल तर मी थोडंफार कमावलंय, थोडं फार शिकलोय आणि अजून खूप काही मिळवायचंय असाच विचार येतो.. मुलं किती मोठं झालीयेत, पुढे खर्च किती आहेत, शरीराला काय काय व्याधी जडल्यायेत हे क्षुल्लक विचार आहेत..

आता बघा हां,  अजूनही मला पोहता येत नाही...उगीच चार पाच फुटात डुंबत राहून इतरांनी मारलेले सूर बघत बसण्यात काय हशील आहे??
मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या आम जनतेलासुध्दा समजणाऱ्या भाषांशिवाय कुठली नवीन भाषा शिकलोय?
बाथरूम सिंगर आणि इतरांच्या गाण्याला टेबलावर धरलेल्या ठेक्याशिवाय संगीतातलं काय ज्ञान मी मिळवलंय?
क्रिकेट हा आपला अघोषित राष्ट्रीय खेळ सोडला तर मला इतर खेळांविषयी कितपत माहिती आहे?
स्वयंपाक हा काही फक्त बायकांसाठी राखून ठेवलेला प्रांत नाही.. चहा आणि मॅगीशिवाय दुसरं काय बनवायला शिकलोय?

मारे स्वतःला पट्टीचा वाचक समजतो मी पण विशिष्ट लेखक/लेखिका सोडले तर काय वाचलंय मी?
मराठीत अजूनही नामदेव ढसाळ, दया पवार, इत्यादींचं दलित साहित्य वाचायचंय....संत साहित्यातलं रा.चिं ढेरे, सदानंद मोरेंचं लिखाण अजून वाचायचं बाकी आहे.. समग्र ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव,  रामदास, चोखामेळा, एकनाथांचं लिखाण वाचायचंय...

इरावती कर्वे, दुर्गा भागवत, गोनी दांडेकरांच्या एकाही पुस्तकाला अजून हात लावलेला नाही...बऱ्याच आधी नेमाडे, श्याम मनोहरांची पुस्तकं वाचायचा, समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न केला होता... पण तेव्हा काही केल्या ती झेपली नव्हती... काय हरकत आहे आता पुन्हा वाचून बघायला? कदाचित गेल्या काही वर्षांत माझ्या जाणिवा समृद्ध झाल्या असतील आणि ती पुस्तकं आता कदाचित नव्याने उमगतीलही...

 मराठी कविता/गझलांमध्ये  कुसुमाग्रज, सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर, संदीप खरे, थोड्या प्रमाणात केशवसुत, बा.सी. मर्ढेकर, दा.सु. वैद्य, बा.भ. बोरकर, विं.दा., इंदिरा संत, बहिणाबाई, वसंत बापट सोडले तर बरेचसे कवी/कवयित्री आणि त्यांच्या कविता मला अनभिज्ञ आहेत....

नाटकांचं म्हणाल तर शांतेचं कार्ट, तरुण तुर्क, यदाकदाचित अशी लोकप्रिय विनोदी नाटकं, प्रशांत दामलेची नाटकं सोडली तर अजूनही मी विजया मेहता, सतीश आळेकर, चेतन दातार, तेंडुलकर, एलकुंचवार, अतुल पेठे, दुबे इत्यादींच्या महासागरात प्रवेश केलेलाच नाही


इंग्रजी साहित्याबद्दल म्हणाल तर चेतन भगत, रॉबिन शर्मा आणि तत्सम व्यवस्थापन किंवा सेल्फ-हेल्प कॅटेगरीतली पुस्तकं, खालीद हुसेनी, फौंटनहेड, शेरलॉक होम्स अशी तुटपुंजी यादी वगळता अजून बरंच काही वाचायचं बाकी आहे...

चित्रपटांचं म्हणाल तर मराठी, हिंदी आणि निवडक लोकप्रिय इंग्लिश चित्रपट वगळता अजून बरंच काही एक्सप्लोर करायचं बाकी आहे....जगभरातल्या उत्कृष्ट अशा डॉक्यूमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स अजून बघायच्या बाकी आहेत....

पंढरीची वारी, नर्मदा परिक्रमा, लेह-लडाख मध्ये बाईकवर प्रवास, मनाली ट्रेक, कैलाश-मानसरोवर, महाराष्ट्रातले बहुतांश गड-किल्ले, गिरनार अशा अनेक अनुभूती घ्यायच्या बाकी आहेत.. भारतात मध्य प्रदेश, हिमाचल, गोवा वगळता अनेक प्रदेश पादाक्रांत करायचे बाकी आहेत...तेव्हा  जगप्रवास तर पुढची पायरी आहे...

ही यादी न संपणारी आहे... डन पेक्षा टू डू लिस्ट फार मोठी आहे... ह्यातल्या कितपत गोष्टी साध्य होतील हा भाग अलहीदा पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

ह्या निमित्ताने, मिर्झा गालिबच्या खालील ओळी आठवल्यावाचून रहात नाहीत

"हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले"

Saturday, July 2, 2016

मधुसूदन

अंगाला उन्हाचे तीव्र चटके बसू लागले, वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतल्या कुंड्याना घातलेलं जास्तीचं पाणी ओघळून जेव्हा अंगावर ठिबकू लागलं, आतून रेडिओचा आवाज जरा जास्तच मोठा झाला आणि बापाने "मध्या गाढवा ऊठ" असा आवाज दिल्यावर मधुसूदनने डोळे उघडले...

किलकिल्या डोळ्यांनी त्यानी रस्त्यावर एक नजर टाकली...  भगभगतं ऊन, रस्त्यावरची गर्दी, लोकांची धावपळ आणि पुन्हा एकदा जाणवलेलं स्वतःचं रिकामपण डोळ्यांत साठवत त्याने डोळे गच्च मिटले... चहा ढोसायला ये अशी आईची हाक आल्यावर त्यानी त्याचे शुष्क डोळे उघडले आणि आत येऊन भिंतीला टेकला...कानतुटका कप आणि टवके उडालेल्या बशीचा दाणकन आवाज आल्यावर त्यानी समोर बघितलं... आईने नेहेमीप्रमाणे जोरात कपबशी पुढ्यात आदळल्याने अर्धाअधिक चहा बशीतच सांडला होता..

नावापुरतं दूध, अर्धा चमचा साखर असलेला तो कडू चहा त्याने दोन घोटात गिळला... "मन्याकाकाच्या कंपनीत सेक्युरिटी गार्डची पोस्ट खाली आहे.. तिकडे जाणारेस की बापाला म्हातारपणात तंगडतोड करायला लावणारेस?" असा कोपऱ्यातून आवाज आल्यावर मधू उठला आणि त्या एका रूमच्या आडोशाला केलेल्या न्हाणीघरात घुसला.. चतकोरच्याही अर्ध्या उरलेल्या साबणाला अंग घासत दोन तांब्यात त्याने आंघोळ उरकली.. कळकट झालेला शर्ट आणि पॅन्ट अंगावर चढवत मधू घराबाहेर पडला

चाळीतल्या लोकांच्या टोचणाऱ्या नजरांकडे दुर्लक्ष करत तो बस स्टॉपपाशी पोहोचला.. "हा मध्याच ना ग? बापाच्या पेन्शनवर आयतं खाणारा"? "हो तोच आहे हा".. ह्या नेहेमीच्या कुजबूजीकडे दुर्लक्ष करत तो बसची वाट पाहू लागला...212 नंबरची बस आल्यावर मधू नेहेमीप्रमाणे दाराशी जाऊन लटकला..कंडक्टर तिकिटाचे पैसे गोळे करत त्याच्या अगदी हातभर अंतरावर आला तेव्हा मधू घाईघाईत 2 स्टॉप अलीकडेच उतरला... फुकटे, चोर साले ह्या कंडक्टरच्या चिरपरिचित आवाजाकडे दुर्लक्ष करत तो झपझप पावले टाकू लागला...ठाकूरदास सांस्कृतिक हॉल ही पाटी दिसताच तो आत घुसला...

तो पोहोचला तेव्हा हॉल बऱ्यापैकी भरला होता... ओल्ड इज गोल्ड ऑर्केस्ट्रा ऑडिशन अशी गिचमीड्या अक्षरात एक पाटी स्टेजवर लावली होती.. सिंथेसाईजरवर वयस्कर अमरदा बसले होते... स्टेजवर माईक घेऊन एक पोरसवदा मुलगा "मेरे सपनों की रानी कब आयेगी तू" किंचाळत होता...
तेवढ्यात अमरदांची नजर मधूवर गेली.. सिंथेसाईझर मधेच थांबवत ते मधूकडे गेले आणि त्याला ओढत नरेशभाईंकडे गेले... "नरेशभाई, ये लडके का गाना सुनो, आप बाकी सबको भूल जाओगे" अस म्हणत त्या स्टेजवरच्या पोराकडून माईक हिसकावत त्यांनी मधूकडे दिला...

मधू माईक हातात घेत स्टेजवर चढला... अमरदांना तो कोणतं गाणं गाणारे हे पक्क ठाऊक होतं... मधूनी डोळे मिटले आणि "ओ मांझी रे" सुरु केलं.. क्षणभरात संपूर्ण हॉल चिडीचूप झाला...  "साहिलों पे  बेहेनेवाले"ला जेव्हा त्याने सूर लावला तेव्हा सगळ्यांच्या अंगावर काटा आला.... गाणं संपल्यावर काही क्षण भयाण शांतता पसरली आणि मग सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला

त्या कडकडाटात नकळतपणे मधुसूदन भूतकाळात गेला.. कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी जेव्हा त्याने हेच गाणं गायलं होतं तेव्हा पहिल्या रांगेत बसलेली अवंतिका त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊन एकटक पहात राहिली... गाणं संपल्यावर तिनी स्वतःहून त्याच्याशी ओळख करून घेतली... आणि नंतर तर त्याच्या आवाजावर फिदा होत ती त्याच्या प्रेमातच पडली...

चांदण्या रात्री, नदीकाठी हातात हात गुंफून चालत असताना दोघांनी मिळून गायलेलं "ये रातें, ये मौसम नदीका किनारा" आठवलं.. "कहा दो दिलोने के, मिलकर कभी हम ना होंगे जुदा" हे एकसुरात गात अवंतिकानी त्याच्या खांद्यावर हलकेच ठेवलेलं डोकं आठवलं...कॉलेज संपल्यावर ऑडिटोरियमच्या पायऱ्यांवर बसून तिच्यासाठी गायलेलं "छुकर मेरे मनको किया तुने क्या इशारा" आठवलं.... अवंतिकाच्या नजरेतील व्याकुळता आणि तेव्हाच घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका आठवल्या...

तेवढ्यात त्याच्या पाठीवर नरेशभाईंची थाप पडली आणि तो भानावर आला... "हिरा आहे रे तू हिरा, इतके दिवस कुठे लपून बसला होतास रे? अमरदा इसको नवरात्री के लिये फायनल कर दो"....
मग बराच वेळ मधू अमरदांबरोबर गाणी सिलेक्ट करत बसला... रात्री बऱ्याच उशिरा तो घरात शिरला..
बल्बचा अपुरा पडणारा उदासवाणा प्रकाश, त्यात माणसांच्या, वस्तूंच्या पडलेल्या अनावश्यक सावल्या,  स्टोव्हची भगभग ...
मधू येऊन भिंतीला टेकला... बाप तिरिमिरीत येऊन मधूचे दोन्ही खांदे पकडून जोरजोरात हलवत म्हणाला  "नालायका, कुठे तडफडला होतास दिवसभर?? मन्याकाकाच्या कंपनीत का नाही गेलास? अरे बांडगुळा अजून किती दिवस जगशील बापाच्या पैशावर?" संतापाचा उद्रेक होऊन मधूचा बाप हमसून हमसून रडायला लागला.. आईनी नेहेमीसारखं बाप-लेकाकडे हतबल होऊन पाहिलं आणि डॊळ्याला पदर लावला...
बराच वेळ कुणी काहीच बोललं नाही आणि मग मधू सावकाशीने उठला आणि पेलाभर पाणी पिऊन गॅलरीत झोपायला गेला. अरे जेवण..... , आईचे शब्द अर्धवटच राहिले...

पुढचे काही दिवस मधू गाण्याच्या सरावाच्या निमित्तानी बाहेरच राहू लागला.. "इशारो, इशारोमें दिल लेनेवाले"च्या वेळी त्याच्या आवाजातल्या हरकती पाहून सीमा आश्चर्यचकित झाली... "वो शाम  कुछ अजीब थी"च्या वेळचा त्याच्या आवाजातला हळुवारपणा जाणवून अख्खा ऑर्केस्ट्रा ग्रुप निःशब्द झाला..

मधू सुरांच्या साम्राज्यातला राजा होता.. डोळे बंद करून एकदा गाणं सुरु केलं कि त्याला आयुष्यातलं अपयश, बेकारी, भकास चाळ, तुटका कप, कडवट चहा,  भिंतींचे पोपडे, गॅलरीतलं ते अंग मुडपून झोपणं, बल्बचा पिवळट, उदासवाणा उजेड, हतबल आई, पिचलेला बाप सगळं सगळं विसरायला व्हायचं...

असाच एकदा सराव चालू होता.. "हम खो चलें, चांद है या कोई जादूगर है" म्हणत असतानाच दरवाजा खाडकन उघडला गेला... नरेशभाई घाईघाईने आत आले आणि थेट अमरदांकडे गेले.. "अमरदा, आपला प्रोग्राम थोडा चेंज करावा लागेल... अभी ये नये लोगोंको रफी, लता, मुकेश, किशोर ज्यादा पता नहीं है... तो आधा टाईम ओल्ड इज गोल्ड और बाकीका आधा न्यू इज फन करना पडेगा... मिका, हनी सिंग ह्या लोकांची गाणी सिलेक्ट करून टाका.." अमरदांनी होकारार्थी मान डोलावली.... तो होकार नरेशभाईंच्या प्रपोजलपेक्षाही कितीतरी पटीने अधिक त्यांच्या स्वतःच्या अगतिकतेमुळे होता.. वन रूम किचनचा हप्ता, पोराला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिपायाची नोकरी लावण्यासाठी द्यावे लागणारे पैसे, बायकोचं आजारपण सगळं सगळं डोळ्यांसमोरून तरळून गेलं..ह्याच अगतिकतेमुळे त्यांनी आधीही गणपतीतल्या, नवरात्रातल्या आरत्यांना फिल्मी गाण्यांच्या चाली लावल्या होत्या..

तेवढ्यात नरेश भाई मधू कडे वळून म्हणाले, " अरे सुपरस्टार, जरा आता माझी सटकली ऐकव यार..."
हे ऐकताच मधूनी जळजळीत नजरेनी पाहिलं... नरेशभाईना त्याच्या नजरेतला अंगार जाणवला असावा, "क्या प्रॉब्लेम है रे तुझे?"

"असली गल्लाभरू गाणी गाणं शक्य नाही मला... रफी, किशोर मुकेशच्या सुरांवर पोसलोय मी... फक्त गायकच नाही तर संगीतकार, गीतकारही तेवढ्याच ताकदीचे होते.. आरडी, ओपी, एसडी, मदनमोहनसारख्या दिग्गजांच्या चाली ओठावर आहेत आणि साहिर, शैलेंद्र, मजरूह, गुलजारसारख्यांचे शब्द मनात... ही अशी थिल्लर गाणी गाणं शक्य नाही मला"

हे ऐकताच नरेशभाईंचा राग अनावर झाला आणि ते मधूला ओरडून म्हणाले "दिडदमडीचा गायक तू आणि दुसऱ्याच्या गाण्याची लायकी काढतोस?? अरे तुझ्यासारखे पन्नास गायक पडलेत बाजारात, पैसा फेकला तर वाट्टेल ते गातील माझ्यासाठी... आणि काय रे स्वतःच्या बापाच्या पेन्शनवर जगतो तू.. चार पैसे कमवायची अक्कल नाही आणि मला शहाणपणा शिकवतोस? चल हो बाहेर, परत तोंड नको दाखवूस मला"

…..........

अंगाला उन्हाचे तीव्र चटके बसू लागले, वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतल्या कुंड्याना घातलेलं जास्तीचं पाणी ओघळून जेव्हा अंगावर ठिबकू लागलं, आतून रेडिओचा आवाज जरा जास्तच मोठा झाला आणि बापाने "मध्या गाढवा ऊठ" असा आवाज दिल्यावर मधुसूदनने डोळे उघडले...