Sunday, March 20, 2016

कॉलेज रियूनियन

माझ्या एका मैत्रिणीला कॉलेज रियूनियनसाठी एक राईट-अप लिहून हवं होतं.. कॉलेज लाईफ आठवून मग हे लिहिलं -

एक नेहेमीसारखीच संध्याकाळ.... दिवसभराच्या कामानी तुम्हाला जाम शीण आलाय.. तेवढ्यात बाहेर अंधारून येतं, ढग कडाडू लागतात, विजा चमकू लागतात आणि पाऊस सुरू होतो.. ओल्या मातीचा धुंद करणारा सुगंध तुम्ही डोळे बंद करून, मोठ्ठा श्वास घेत, छातीभर भरून घेता..  आणि अचानक तुम्हाला कॉलेजच्या ग्रुप सोबत धो धो पावसात खाल्लेली कांदा/मिर्ची-भजी आणि  सोबतीने फुंकर मारत पिलेला गरमागरम, वाफाळलेला आल्याचा चहा आठवतो.. आठवतो ना?

ऑफिसमधे नेहमीसारखीच कंटाळवाणी मीटिंग चालु आहे.. बॉसच्या समोरच बसल्याने तुम्हाला मोबाईलवर पण टाईमपास करता येत नाहिये. जांभया देत, कशीबशी झोप आवरत तुम्ही बळच माना डोलवत बसलाय आणि अचानक तुम्हाला कॉलेजमधलं लेक्चर आठवतं. सर/मैडम फळ्यावर लिहायला वळाले की एकमेकांना खाणा-खुणा, इशारे करायचे...कागदाचे, खडुचे छोटे तुकडे हळूच आपल्या मित्र/मैत्रीणीला  फेकून मारायचे...बाजूच्याशी नोटबुकमधे '0'आणि 'X' चा गेम खेळायचा आणि सर/मैडमची पाठ वळाली की हसू दाबत गंभीर चेहरा करायचा.. बरोबर ना?

तुम्हाला एक दिवसाची सुट्टी हवी आहे.. तुम्ही बॉसकड़े जाता.. मार्च-एंड आहे, प्रोजेक्ट डेडलाइन आहे इथपासून तर थेट अशी कशी एकदम सुट्टी मागता रे तुम्ही लोकं, प्रि-प्लांड लीव असेल तरच मी अप्रूव करणार अशी उत्तरं मिळतात.. तुमचा हिरमोड होतो आणि डेस्ककड़े परत जाताना एकदम तुम्हाला कॉलेजचे दिवस आठवतात... मैटिनी शो बघण्यासाठी सगळ्या ग्रुपनी ठरवून केलेला मास बंक आठवतो आणि प्रोफेसर्सला घाबरणाऱ्या मित्र/मैत्रिणिना - घाबरू नका रे, एक दिवस लेक्चर्स नाही केले तर काही फरक पडत नाही असा दिलेला दिलासा आठवतो... आठवतो ना?

तुम्ही तुमच्या गाडीतून घरी येत असताना तुमचा गाणी ऐकण्याचा मूड बनतो... मग तुम्ही रेडियो लावता तर (as usual) झाडून सगळ्या रेडिओ स्टेशन्सवर  एकाच वेळी जाहिराती लागलेल्या...  अस्वस्थ होऊन तुम्ही दोन चारदा सगळे स्टेशन्स बदलून बघता पण नो लक.. वैतागून तुम्ही रेडियो बंद करणार तेवढ्यात एका स्टेशनवर 'पुरानी जीन्स और गिटार' गाणं लागतं.. तुम्ही गाड़ी स्लो करता... गाणं जसजसं पुढे जात राहातं तसतसं तुम्ही कॉलेजच्या आठवणीत गुंग होत जाता... विशेषत: "पहुचना कॉलेज हमेशा लेट, वो केहेना सर का गेट आऊट फ्रॉम द क्लास... वो बाहर जाके हमेशा केहेना यहाँ का सिस्टम ही है ख़राब" ह्यावर तुम्ही स्वतःशीच हसता...हसता ना?

ऑफिसची पार्टी चालू आहे.... सूप, सैलड, पापड, रायत्यापासून तर डेझर्टपर्यन्त मुबलक पदार्थांची रेलचेल आहे.. तुम्ही सगळं थोडं थोडं घेत खायला बसता... अचानक तुम्हाला कॉलेजच्या कैंटीनमधे गैंग सोबत चार पाच फ्रेंड्समधे प्रत्येकी एखाद दोन चमचे खाल्लेली मिसळ किंवा सात आठ फ्रैंडसमधे खाल्लेले 4 वडापाव आठवतात आणि मग तुम्हाला समोरचं, एकसे एक पदार्थानी भरलेलं, ताट - मिसळ आणि वडापावपुढं फिकं वाटू लागतं...खरंय ना?

👆🏽 कॉलेज लाईफच्या ह्या आणि अशा अनेक आठवणी येऊन तुम्ही नक्कीच नॉस्टॅल्जिक होत असणार..

चला तर मग, ह्या आठवणीना ऊजाळा देऊ या... खुप हसू या, धमाल करुया आणि कॉलेज लाइफ पुन्हा एकदा एन्जॉय करू या